...‘त्या’ कर्जबुडव्या ७० कंपन्यांवर आता कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2018
Total Views |

समस्या सोडविण्यासाठीची २७ ऑगस्टची अंतिम मुदत समाप्त, पण कार्यवाही नाही.
केंद्रीय उर्जा मंत्रालय या प्रकरणी घेणार लवकरच बैठक

 
 
अनेक कंपन्यांनी मारला कर्मचार्‍यांच्या प्रॉव्हिडंट फंड रकमेवर डल्ला!
तक्रार अधिकारी नियुक्त न केल्याने व्हॉट्स ऍपला न्यायालयाची नोटीस
बँकांची लाखो कोटी रुपयांची कर्जे जाणूनबुजून बुडविणार्‍या (विलफुल डिफॉल्टर्स) ७० कंपन्यांवर आता कारवाई केली जाणार आहे. या कंपन्यांनी बँकांचे सुमारे चार लाख कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे. या कंपन्यांना आपली कर्जप्रकरणे मिटवण्या साठी काल सोमवार दि. २७ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. पण कंपन्यांनी या संदर्भात कुठलीही कार्यवाही केली नसल्याने त्यांना नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी)मध्ये पुढील कारवाईसाठी नेले जाईल.
 
मोठ्या प्रमाणावरील रकमांची कर्जे बुडाल्याने या बँकांच्या अनार्जित मालमत्ता(एनपीए) वाढू लागलेल्या आहेत. उर्जा क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या एनपीए संदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही. तसेच एनपीएची समस्या सोडविण्या साठी न्यायालयाने या कंपन्यांना सहा महिन्याची मुदत दिलेली होती. ती देखील आता संपलेली आहे. या उर्जा कंपन्यांनी भारतीय रिझर्व बँकेच्या आदेशाला आव्हान दिले होते. नैसर्गिक वायुवर आधारित उर्जानिर्मिती कंपन्यांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या प्रकरणी केंद्रीय उर्जा मंत्री लवकरच बैठक घेणार असून तीत या प्रश्नावर चर्चा होऊ शकते.
 
 
अवंता झाबुआ पॉवर, कोस्टल एनर्जन, जेपीव्हीएल, एसकेएस पॉवर, जीएमआर राजामुंद्री, जीएमआर छत्तीसगढ, बल्लारपूर इंडस्ट्रीज, सुप्रीम इंफ्रास्ट्रक्चर, मॅटिक्स फर्टिलायझर, बॉम्बे रेयॉन, हिंदुस्तान नॅशनल ग्लास व सुरत हजीरा यांची प्रकरणे एनसीएलटी बाहेर सुटण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. तर अदानी पॉवर महाराष्ट्र, आधुनिक पॉवर, दामोदर व्हॅली, डीबी पॉवर, जीएमआर कामलंगा, कांति बिजली व जीव्हीके इंडस्ट्रीज यासारख्या उर्जा कंपन्यांची एनपीए प्रकरणे मिटली आहेत.
 
 
जिंदल इंडिया थर्मल पॉवर, रतन इंडिया, लवासा कॉर्प, एस्सार पॉवर गुजरात आणि सिमपुरी एनर्जी यांची प्रकरणे एनसीएलटीत गेलेली आहेत. याबरोबरच रोहित फेरोटेक, जेबीएफ इंडस्ट्रीज, गार्डन सिल्क मिल्स, आयएसएमटी, गीतांजली जेम्स, स्पेनडिड मेटल आणि बीएमएम इस्पात यांचीही प्रकरणे एनसीएलटीत दाखल होणार आहेत.
 
 
आपण भविष्य निर्वाह निधी(प्रॉव्हिडंट फंड)त यासाठी पैसे गुंतवितो की कुठल्याही आणीबाणीच्या वेळी किंवा सेवा निवृत्तीनंतर आपल्याला कुणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही. पण काही कंपन्या तर अशा आहेत की ज्या कर्मचार्‍यांचा पैसा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(इपीएफओ)मध्ये जमा करण्याऐवजी तो स्वत:च फस्त करीत आहेत! त्यामुळे कर्मचार्‍यांना कपात झालेल्या पैशांवरील व्याज मिळणे तर दूरच, त्यांचा जमा झालेला पैसा देखील परत मिळणे मुश्किल होणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार या ‘पीएफ चोरी’ त प्रति वर्षी वाढच होत राहिली आहे.
 
 
एका कंपनीने तर कर्मचार्‍यां च्या प्रॉव्हिडंट फंडासाठी कपात केलेल्या २६२ कोटी रुपयांपैकी अवघे १३२ कोटी रुपयेच इपीएफओकडे जमा केले होते. उर्वरित १३० कोटी रुपयांचे काय झाले याच्या नोंदीच ठेवलेल्या नव्हत्या. आयकर विभागानेही या कंपनीच्या ११६ कोटी रुपयांच्या कर चोरीचा प्रकारही उघडकीस आणला होता.
 
 
असे असले तरी पीएफवर डल्ला मारण्याचे हे पहिलेच उदाहरण नाही. सरकारी आकडेवारीनुसार २०१७ मध्ये कंपन्यांनी पीएफसाठी म्हणून कर्मचार्‍यांच्या पगारातून कापलेले ४११२ कोटी रुपये जमाच केले नव्हते! पीएफचे पैसे जमा न करण्याचा हा प्रकार गेल्या पाच वर्षांपासून सर्रास सुरु असल्याचे दिसून आले आहे.
 
 
सरकार आता या प्रकरणी कारवाई करीत आहे. म्हणून नोकरीपेशातील लोकांनी आपल्या भविष्यातील जमा रकमेच्या बाबतीत चौकस राहणे जरुरीचे आहे. याबरोबरच आवाजही उठविला पाहिजे. तसे केल्यास कुठलीही कंपनी जमा रकमेच्या बाबतीत ‘हेराफेरी’ करु शकणार नाही. तक्रार अधिकारी नियुक्त करण्यात आला नसल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्स ऍपला फटकारले असून माहिती तंत्रज्ञान व अर्थ मंत्रालया ला नोटिसही पाठविली आहे. या नोटिसीवर व्हॉट्स ऍपला चार आठवड्यांच्या आत उत्तर द्यावे लागणार आहे. गूगल व फेसबुक यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर तक्रार अधिकारी नियुक्त केलेला आहे. पण व्हॉट्स ऍप अजूनही याबाबतीत ‘मूग गिळून’ आहे.
 
शेअर बाजारातील तेजीच्या बैलांची दौड सुरुच, निर्देशांकात विक्रमी वाढ
सोमवारी २७ रोजीची शेअर बाजारातील तेजीच्या बैलां(बुल्स)ची जोरदार दौड आज मंगळवारीही सुरुच राहिली. तसेच त्याच्या दोन्ही महत्वाच्या निर्देशांकांत विक्रमी वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) सकाळी ३८ हजार ८१४ बिंदूंवर उघडून ३८ हजार ९३८ बिंदूंच्या सार्वकालिक उच्च पातळीवर जाऊन पोहोचला. दिवसअखेरीस तो २०२ बिंदूंनी वाढून ३८ हजार ८९६ बिंदूंवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक(निफ्टी) सकाळीच ११ हजार ७५० बिंदूंची पातळी ओलांडीत ११ हजार ७६० बिंदूंच्या सार्वकालिक उच्चांकापर्यंत गेला होता. दिवसअखेरीस तो ४६ बिंदूंनी वाढून ११ हजार ७३८ बिंदूंवर बंद झाला. सोनेदेखील या तेजीच्या प्रवाहात ‘आपले हात धुवून घेत’ प्रति दहा ग्रॅममागे १८५रुपयांनी वाढून ३० हजार १८७ रुपयांवर आले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@