सलसाडी आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा शॉक लागून मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |

तळोदा तालुक्यातील घटना, संतप्त जमावाचा प्रकल्प अधिकार्‍यांवर हल्ला

 
तळोदा :
तालुक्यातील सलसाडी गावात सोमवारी सकाळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या जमावाने घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेले सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विनय गौडा यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या तहसीलदार योगेश चंद्रे, यांच्यासह काही पोलीस कर्मचारी व महसूल कर्मचार्‍यांनाही दुखापत झाल्याचे समजते.
 
 
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तळोदा तालुक्यातील गडीकोठला येथील सचिन चंद्रसिंग मोरे (वय १२) हा मुलगा सलसाडी गावातील आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास विद्यार्थी आंघोळीसाठी जात असताना त्याला विजेचा शॉक लागून दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान शाळेतील वॉचमन रवींद्र राजाराम ठाकरे यांनासुद्धा विजेचा शॉक लागला. त्यांना पुढील उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर सदर शासकीय आश्रमशाळेत असुविधा असल्याचे सांगत जमलेल्या जमावाने घटनास्थळी ठिय्या मांडला. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत मृत विद्यार्थ्यांचा मृतदेह येथून हलविणार नाही, असा पवित्रा घेतला. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विनय गौडा, तहसीलदार योगेश चंद्रे काही काळानंतर घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संतप्त जमावाने विनय गौडा यांना जाब विचारत धक्काबुक्की करून मारहाण झाल्याची घटना घडली. यात ते जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान यावेळी विनय गौडा यांच्या बचावासाठी पुढे आलेल्या तहसीलदार योगेश चंद्रे, तसेच पोलीस कर्मचार्‍यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान बालकाच्या मृत्यूबाबत चंद्रसिंग खातर्‍या मोरे यांच्या खबरीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महेंद्र जाधव करीत आहेत.
 
 
मृत बालकाचा वडिलांकडून संबंधित अधिकारी व कर्मचारी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे लेखी निवेदन सायंकाळी कौशल्या चंद्रसिंग मोरे या मयत विद्यार्थ्याच्या आईने पोलीस प्रशासनाला दिले. भविष्याचा आधारच गेल्याने कुटुंबाला आदिवासी विकास खात्यामार्फत २० ते-२५ लाख रुपये मदतीची मागणी केली आहे.
 
 
घटनेनंतर महसूल विभागाने काम केले बंद
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच, तळोदा तालुका महसूल कर्मचारी संघटना, तळोदा तालुका तलाठी संघटना तसेच धुळे व नंदुरबार महसूल कर्मचारी संघटनेतर्फे काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. दिवसभर त्यांनी कामकाज बंद ठेवले. तसेच तळोदा महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी याबाबतचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.
 
 
अतिरिक्त पोलीसबळ मागविण्यात आले
घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस फोर्स मागविण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश मेढे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे पी. आय. किशोर नवले, तळोद्याचे पी. आय. नितीन चव्हाण, धडगावचे पी. आय. संजय भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश नायदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ४८ पोलीस कर्मचारी इतर ठिकाणावरून मागविण्यात आले होते.
 
 
तळोदा तालुक्यातील सलसाडी येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घडलेल्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अतिरिक्त पोलीस निरीक्षक यांच्यासह अतिरिक्त पोलीस दलाला पाचारण करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील तपास सुरु आहे.
- चंद्रकांत गवळी, अप्पर पोलीस अधीक्षक
 
@@AUTHORINFO_V1@@