प्राचीन शिवमंदिर नामशेष होण्याच्या मार्गावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |


 

शासन व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

उल्हासनगर : उल्हासनगर आणि अंबरनाथ या दोन्ही शहराच्या सीमेवर अति प्राचीन शिवमंदिर आहे. दर वर्षी येथे महाशिवरात्री व श्रावण महिन्यात मोठया प्रमाणात भक्तांच्या रांगा लागतात. हे मंदिर देशातील हिंदू मंदिरां पैकी सर्वात जुने असल्याचे बोलले जाते. परंतु या मंदिराकडे शासन व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष असल्याने मंदिर भग्न होण्याच्या मार्गावर आहे. शिवमंदिराची शासनाच्या संबंधीत विभागाने डागडुजी करावी अशी मागणी उल्हासनगरातील शिवभक्त विजय चाहू पाटील यांनी केली आहे.

 

शिवमंदिराच्या शिलालेखामध्ये हे मंदिर श.के. ९८२ इ.स. १०६० मध्ये शिलहार राजा महामंडलेश्वर माम्वानी राजदेव यांचे कारकिर्दीत बांधले असा उल्लेख केला आहे.हे शिवमंदिर महाराष्ट्र व कोकण भागात साधारणपणे १३०० च्या अगोदर बांधण्यात आलेल्या कलापूर्ण हिंदु मंदिरांपैकी सर्वात जुने आहे. देव-देविकांच्या अप्रतिम शिल्पांनी व कलाकुसरींनी या मंदिराचे बहीरंग व अंतरंग फारच चित्ताकर्षक बनवले आहे. गेल्या चौदा वर्षांपासून उल्हासनगरातील प्रसिद्ध शिवभक्त विजय चाहु पाटील व त्यांचे धाकटे बंधू रवी चाहू पाटील हे वर्षातील प्रत्येक श्रावण महिन्यात हिंदू संस्कृती संवर्धन महोत्सव करतात. श्रावण महिन्यात महिनाभर येथे भजन, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन पाटील बंधू कडून करण्यात येते.

 

या मंदिराच्या मूर्त्यांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी गवत ,झुडपे उगवली आहेत , पावसाचे पाणी मंदिरातून गळत असून मंदिरातील खांब आणि छत कोसळू नये म्हणून लोखंडी खांबांचा टेकू देण्यात आला आहे. मंदिराच्या लगतचे कुंड भग्न झाले आहेत. मंदिराच्या पडझडकडे लक्ष देण्याची गरज असतांना लाखो - करोडो रुपये खर्च करून दरवर्षी या मंदिराच्या परिसरात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने शिवमंदिर फेस्टिव्हल केला जातो. परंतु मंदिराच्या दुर्दशेकडे त्यांचे लक्ष जात नाही ही खेदाची बाब आहे. शिवभक्त विजय पाटील यांनी मंदिराच्या विषयाबाबत चिंता व्यक्त केली असून मंदिराच्या डागडुजी साठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करणार आहे. हा आपला सांस्कृतिक ठेवा असून त्याचे जतन करणे हे प्रत्येक हिंदूंचे कर्तव्य याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@