सेन्सेक्स, निफ्टीने सर केले नवे विक्रमाचे शिखर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |

सेन्सेक्स ३८ हजार ७०० बिंदूंच्या पलीकडे, निफ्टी ११ हजार ७०० बिंदूंवर
निफ्टी येत्या तीन ते चार महिन्यात १२ हजार बिंदूंची पातळी गाठणार?

 
 
रुपयाच्या अवमूल्यनामुळे टीव्ही, फ्रिज व एसी महागणार
जीएसटी घटल्याने झालेल्या लाभावर फिरणार पाणी?
 
मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) यांनी आज सोमवारी २७ रोजी नवे विक्रमाचे शिखर सर केले! सेन्सेक्स शुक्रवारच्या बंद ३८ हजार २५१ बिंदूंवरुन सकाळी ३८ हजार ४७२ बिंदूंवर उघडत दिवसभरात ३८ हजार ७३६ बिंदूंची सार्वकालिक सर्वोच्च पातळी गाठली. निफ्टीनेही आधीच्या बंद ११ हजार ५५७ बिंदूंवरुन सकाळी ११ हजार ६०५ बिंदूंवर उघडत ११ हजार ७०० बिंदूंची विक्रमी सर्वोच्च पातळी गाठली.
 
 
बँक निफ्टीनेही २८ हजार ३१७ बिंदूंची मजल गाठली होती. मिडकॅप व स्मॉलकॅप इंडेक्सही वधारले होते. बँकिंग, स्वयंचलित वाहने (ऑटो व्हेईकल्स), माहिती तंत्रज्ञान (आयटी), धातू, ग्राहक व्यवहार, उर्जा व तेल आणि नैसर्गिक वायु क्षेत्रातही मोठी खरेदी दिसून आली. दिग्गज शेअर्समध्ये ग्रासिम, यस बँक, हिंडाल्को, टाटा स्टील, भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक व भारती एअरटेल यांच्यात तेजी आली.
 
 
चांगल्या जागतिक संकेतांमुळे बाजारात उत्साह दिसून राहिला आहे. या चांगल्या संकेतांमुळे बाजार उसळला आहे. यापुढेही चांगल्या तेजीची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारल्याने बाजारात तेजीचे वातावरण राहणार आहे. २०१९ मधील निवडणुकांवर अजूनही बाजाराची नजर गेलेली नाही.
 
 
बाजाराची रेंज बदलली असून निफ्टीला खालच्या बाजूने ११ हजार बिंदूंच्या पातळीवर तगडा आधार(सपोर्ट) निर्माण झालेला आहे. तेजीचे असेच वातावरण कायम राहिले तर निफ्टी येत्या तीन ते चार महिन्यात १२ हजार बिंदूंची पातळी गाठू शकतो असा तज्ञांचा अंदाज आहे. रुपयात कमजोरी येऊनही बाजाराचे त्यापुढे न झुकणे हे चांगल्या संकेताचे लक्षण होय. बाजारात विदेशी गुंतवणुकीचा प्रवाहदेखील वाढता राहिलेला आहे.
 
 
तज्ञांच्या मते भारतीय रिझर्व बँक व्याजदरामध्ये आणखी वाढ करु शकते. रुपयाची कमजोरी व येत्या तीन ते चार तिमाहींपर्यंत औषधनिर्मिती क्षेत्रा(फार्मास्युटिकल्स)तील कंपन्यांची कामगिरी चांगली होऊ शकते.
 
 
बाजारात येत्या दोन ते तीन वर्षात खूपच वाढ पाहावयास मिळणार आहे. तेजीच्या बाजारा(बुल मार्केट)तही थोडी घसरण होऊ शकते. २०२१ पर्यंत निफ्टी १७ हजार बिंदू तर सेन्सेक्स ५० हजार बिंदूं(पुरे पचास हजार!)पर्यंत मजल गाठू शकतो. बाजारातील घसरणीमुळे घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. सद्य काळात व्यापारी बँका व सार्वजनिक क्षेत्रातील बँका तेजीत आलेल्या आहेत. गुंतवणुकदारांनी बाजाराच्या कला(ट्रेंड)कडे लक्ष द्यावे व चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवावेत असाही सल्ला तज्ञांनी दिलेला आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ट्रेडिंग करावे तर खाजगी बँकांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करावी असेही तज्ञांचे मत आहे. याशिवाय ग्राहक व्यवहार क्षेत्रातही गुंतवणुकीच्या संधी आहेत. त्यात वस्त्रोद्योग, खाद्य पदार्थ, फार्मा यांचा समावेश आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे आयटी शेअर्सही आकर्षक आहेत.
 
 
ऐन सणांच्या हंगामात टीव्ही. फ्रिज व इतर गॅजेट्स (मोबाईलसह) महाग होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. याचे कारण म्हणजे डॉलरची दिवसेंदिवस वाढू लागलेली किंमत व रुपया कमकुवत होत जाणे हे आहे.डॉलरच्या तुलनेत पडत जाणारा रुपया ग्राहकांच्या खिशावरही भारी पडणार आहे. जर आपण टीव्ही, फ्रिज, एसी(वातानुकूलन यंत्रणा) व लॅपटॉप घेणार असाल तर त्यासाठी आपणास खिसा थोडा ढिला करावा लागणार आहे! त्यांच्या किंमतीत तीन ते पाच टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे त्यांच्या किंमती ७०० ते ३००० रुपयांपर्यंत वाढू शकतात. कंपन्या लवकरच म्हणजे या महिनाअखेर किंवा उशिरात उशिरा सप्टेंबरमध्ये नवे भाव जाहीर करण्याची शक्यता आहे.
 
 
रुपयाच्या कमजोरीमुळे आयात महाग होत चालली आहे. त्यामुळे जे ब्रॅण्ड आणि रिटेलर आपला माल आयात करीत आहेत त्याचे भावही वाढत जाणार आहेत. कंपन्यांच्या म्हणण्यानुसार डॉलरचा भाव ७२ रुपयांच्या वर गेल्यास त्यांना पुन्हा एकदा किंमती वाढवाव्या लागणार आहेत. गेल्या जुलैत वस्तू व सेवा कर २८% वरुन १८ % पर्यंत घटल्याने कंपन्या व ग्राहक यांना फायदा झालेला होता. पण रुपया घटल्याने त्यावर आता ‘पाणी फिरणार’ आहे!
 
 
सोन्यात तेजी, साखरेच्या निर्यातीस मुदतवाढ
सोन्यात आज तेजी आली असून त्याचे भाव गेल्या एका महिन्यातील सर्वात वरच्या स्तरावर पोहोचले आहेत. जागतिक बाजारात सोने प्रति औंसामागे १२०० डॉलरपेक्षा जास्त वाढले आहे. सध्या सोने प्रति दहा ग्रॅममागे २९ हजार ९८० रुपयांवर आले होते. दरम्यान साखर कारखान्यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीस येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सध्या मोठ्या मुश्किलीने पाच लाख टनच साखर निर्यात होऊ शकलेली आहे. कारखान्यांच्या म्हणण्यानुसार सध्या जागतिक बाजारात रॉ शुगर(कच्ची साखर)लाच जास्त मागणी असून त्यांच्याकडे मात्र कच्ची साखरच उरलेली नाही. देशात सध्या साखरेचे उत्पादन ३ कोटी २० लाख टन इतके झालेले असून गेल्या वर्षी ते अवघे दोन कोटी टनच झाले होते. देशातील साखरेचा खप अडीच कोटी टन इतका आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@