मग ते कत्लेआम कुणी केले?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |



 

“मोठे झाड कोसळले की, धरती जरा हलतेच,” असे राजीव गांधींचे वक्तव्य होते. आठ हजार शिखांच्या हत्यांनंतर राजीव गांधी असे म्हणाले होते, हे ध्यानात घ्यायला हवे. राजीव गांधींनी काय म्हटले होते, हे राहुल गांधींना कुणीतरी रक्त साखळेल, असा कडकडीत चिमटा काढून सांगावे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

सत्तेपासून दूर राहिल्याने डोक्यावर कसा परिणाम होतो, हे पाहायचे असेल तर सध्या राहुल गांधींकडे पाहावे. एरव्ही त्यांचे वयाला न शोभणारे बालसुलभ चाळे देशभरातल्या माध्यमांना मनोरंजनाचा भरपूर मजकूर पुरवित असतात. सध्या राहुल गांधी विदेश दौर्यावर आहेत. स्वत:च्या पक्षाचा पाया सगळ्याच राज्यात डळमळीत होत असताना हा इसम जगभर फिरतो, याला काय म्हणावे हेच कळत नाही. डोकलामबाबत राहुल गांधींनी परदेशात जी विधाने केली त्याचाच परिपाक म्हणून लोकांनी त्यांना विचारले, “मग जर तुम्ही पंतप्रधान असता तर काय केले असते?” यावर ते म्हणाले की, “मला डोकलामविषयी पूर्ण माहीत नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करता येणार नाही.” आता आधीचे राहुल गांधी खरे की नंतरचे, हाच प्रश्न आहे. खरंतर गांधी घराण्याचा लढवय्येपणा इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी आणली तेव्हाच संपला होता. स्वातंत्र्यलढ्यातून आलेली काँग्रेस संघर्ष करूनच आली होती. मात्र, सत्तालोलुपता आणि त्यातून आलेली मग्रुरी इंदिरा गांधींना संपवूनच थांबली. यानंतर सुरू झाला तो मूर्खपणा आणि चापलुसीचाच कालखंड. काँग्रेसचे खरे स्वरूप गांधी परिवार मुळीच नाही. काँग्रेसचे खरे स्वरूप एका बजबजपुरीचे आहे. सत्तेचा फायदा मिळवित राहणारे एक टोळके अमिबाप्रमाणे गांधी घराण्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या भोवती फिरत असते. संधी मिळतात तशी ही मंडळी या परिवारातल्या सदस्यांभोवती आकार बदलून जमा होतात. स्वत:ला ‘गांधी परिवाराचे मित्र’ म्हणविणारे सॅम पित्रोडा सध्या राहुल गांधींचा ताबूत करून जगभर नाचवित आहेत. या नाचात ही मंडळी इतकी मशगुल असतात की, आपण ज्याला खांद्यावर घेऊन नाचतो आहोत, त्याची स्थिती किती केविलवाणी झाली आहे, हेही त्यांना कळत नाही. अहमद पटेलांनीसुद्धा हेच केले. गुजरातमधून नरेंद्र मोदी व अमितभाई शाह ही जोडी इथे येऊन पोहोचली, त्याचे कारण म्हणजे त्यांच्याविरुद्ध खेळली गेलेली षड्यंत्रे. गुजरातची दंगल गोध्य्राला पेटविल्या गेलेल्या रामभक्तांच्या मृत्यूचे पडसाद होती. मात्र, ‘सुडो सेक्युलॅरिजम’चे राजकारण खऱ्या अर्थाने इथेच सुरू झाले. गोध्य्राचे कांड सफाईदारपणे झाकले गेले आणि नरेंद्र मोदींच्या राज्यात कसे नरसंहार झाले, त्याचे आकडे दिले गेले. राजदीप सरदेसाईसारखे संपादक गुजरातच्या गल्ल्यांमध्ये जाऊन इथे परिस्थिती कशी चांगली नाही, हे संपूर्ण जगाला ओरडून सांगत होते. महत्त्वाचे म्हणजे, आजही गुजरातची दंगल राजकीय डावच वाटतो. नरोदा पाटिया, बिल्किस बानो, जाफरी प्रकरण या सगळ्या प्रकारणांची चर्चा होते. गोध्राकांडाची चर्चा मात्र आजही होताना दिसत नाही. हे सगळे सहज घडत नाही तर यामागे एक निश्चित प्रयत्न असतात. एक ठराविक परिवाराची तळी उचलणारे आणि त्या आधारे सत्तेच्या जवळ राहणारे हे लोक आपल्या पोळ्या भाजत राहतात. इतकी सारी पार्श्वभूमी उगाळण्याचे कारण म्हणजे, राहुल गांधींनी शिखांच्या हत्याकांडाविषयी जे विधान केले आहे, ते अत्यंत बेजबाबदार आणि ढोंगीच म्हणावे लागेल. शिखांच्या शिरकाणांच्या भयकथा आजही वाचल्या तर आपल्या अंगावर काटा येतोे. ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’नंतर इंदिरा गांधींच्या अंगरक्षकांनीच त्यांची हत्या केली. ती का केली? कुणी केली? त्यामागे कुणाचा हात होता? हा कट कसा रचला गेला, याविषयी फारशी कुणाला काहीही माहिती नाही. त्यावर नंतर कोणत्याही प्रकारची चर्चाही झाली नाही. याचे कारण राजकारणात दडले आहे. अशा भ्याड हल्ल्यात देशाने आपला एक पंतप्रधान गमावला. काँग्रेसने मात्र हे सारे प्रकरण दडपले, कारण एका राज्यातल्या सत्तेचा प्रश्न होता आणि ते राज्य होते पंजाब. भिंद्रनवाले प्रकरण आधी धार्मिक असल्याने आधी अत्यंत हलकेपणे घेतले गेले. नंतर ते प्रकरण चिघळतच गेले. सैन्यदल प्रार्थनास्थळात उतरविणे अनेकांच्या जिव्हारी लागलेच, त्याचाच परिणाम म्हणून इंदिरा गांधींची हत्या झाली.

 

हा सगळाच प्रकार देशाच्या द़ृष्टीने दुर्दैवी होता, पण या सगळ्यानंतर जे घडले ते त्याहूनही दुर्दैवी होते. इंदिरा गांधींच्या मारेकर्यांचा पंथ शीख होता, म्हणून दिल्ली व परिसरात त्यांचे कत्लेआम करण्यात आले. गुजरात दंगलीत दोन हातात त्रिशूळ घेऊन उभ्या असलेल्या व्यक्तीचे छायाचित्र भरपूर चालविले गेले, मात्र गळ्यात पेटता टायर घालून जिवंत जाळण्यात आलेल्या शिखांची चित्रे माध्यमातूनही पद्धतशीरपणे हटविली गेली. लुटालूट, जाळपोळ, दंगे दिल्लीने खूप पाहिले आहेत. शीखविरोधी दंगलीत दिल्लीने जे काही पाहिले, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. पोलीस व शासकीय यंत्रणांनाही यात कुठलीही भूमिका निभावण्यात काहीही रस नव्हता; उलट शिखांच्या दुकानातून उंची फर्निचर लुटणारी पोलिसांची चित्रे त्यावेळी वर्तमानपत्रात प्रकाशित झाली होती. इंदिरा गांधींच्या अंत्ययात्रेची मोठी छायाचित्रे पाहायला मिळत नाहीत, गांधींची दिसतात, नेहरूंची दिसतात, मात्र इंदिरा गांधींची दिसत नाहीत. त्याचे कारण इंदिरा गांधींच्या अंत्ययात्रेपेक्षा लुटालूट करण्यातच जास्त रस असलेली मंडळी दिल्लीत फिरत होती. “जातीय दंगली माणसांचे सैतान करतात,” हे एक ठरलेले डावे समाजवादी वाक्य. पण, आज राहुल गांधी ज्या पापापासून स्वत:चा पदर झटकायचा प्रयत्न करीत आहेत, त्याच राहुल गांधींचे वडील असलेल्या व नंतर काँग्रेसचा सगळ्यात ‘उमदा चेहरा’ म्हणून प्रसिद्धी मिळविलेल्या राजीव गांधींनी काय म्हटले होते, हे राहुल गांधींना कुणीतरी रक्त साखळेल, असा कडकडीत चिमटा काढून सांगावे.

 

३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या पंधरवड्यात देशातील ४० शहरांतील आठ हजार शिखांचे शिरकाण करण्यात आले. यावर राजीव गांधींचे विधान होते की, “जेव्हा एखादे मोठे झाड कोसळते तेव्हा धरती जरा हलतेच.” आजही ते भाषण पाहाता येते. काँग्रेसचे नेते सज्जन कुमार व ललित माकन यांनी दारूच्या बाटल्या आणि शंभरच्या नोटा वाटून दंगली पेटविल्या. तसे आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आले, खटलेही चालले. महत्त्वाचे म्हणजे, या देशात ज्यांना एकाच घराण्याचे राज्य कायम ठेवण्यात रस आहे, अशी मंडळी अजूनही या प्रकरणावर लिपापोती करण्याचे काम करीतच आहे. ‘राहुल गांधी’ नावाची कठपुतळी जी माणसे चालवित आहेत, त्यांना एकच सांगावेसे वाटते की, तो काळ आता संपला आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@