ऑनलाईन फेसबुकबंदी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |


 

फेसबुक... जगभरातील सोशल मीडिया वापरकर्त्यांचे ताईत. या फेसबुकचे सध्या जगभरात २.२३ अब्ज इतके वापरकर्ते आहेत आणि दिवसागणिक ही संख्याही वाढताना दिसते. जसा या फेसबुकचा जनसंपर्क, व्यवसायवृद्धीसाठी वापर होताना दिसतो, तसाच त्याचा गैरवापरही वेळोवेळी चव्हाट्यावर येतोच. असे काही गैरप्रकार घडल्यास मग फेसबुक संबंधित प्रोफाईल ब्लॉकही करुन टाकते. आता तर चक्क फेसबुकने म्यानमारच्या लष्करप्रमुखाचेच फेसबुक अकाऊंट बंद केले आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 

 
जनरल मिन ऑन्ग हलँग असे या लष्करप्रमुखांचे नाव. फेसबुकवर सतत ‘हेट स्पीच’ अर्थात तिरस्कार व द्वेष पसरविणारा मजकूर पोस्ट केल्यामुळे त्यांचे अकाऊंट फेसबुककडून बंद करण्यात आले. या अकाऊंटवरून खोट्या बातम्यादेखील पोस्ट केल्या जात होत्या. त्यामुळेच फेसबुककडून हे कडक पाऊल उचलण्यात आले. एखाद्या देशाच्या लष्करप्रमुखाचे अकाऊंट असे तडकाफडकी बंद करणे ही काही साधी गोष्ट नव्हे. असे करणे म्हणजे त्या पदाचा एकप्रकारे अपमानच. पण, त्या अकाऊंटवरून जर समाजात द्वेषकारक माहिती प्रसारित होत असेल, इतर सोशल मीडिया युजर्सवर त्याचा नकारात्मक परिणाम होत असेल, तर फेसबुकचा हा निर्णय योग्यच मानायला हवा.
 

मिन ऑन्ग हलँग या लष्करप्रमुखांनी म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांविरोधात याच फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून मोहीम राबवली होती. परिणामी रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमार सोडावा लागला. समाजात जातीयवाद निर्माण होऊ नये, हा उद्देश हे अकाऊंट बंद करण्यामागे होता, असे स्पष्टीकरण फेसबुककडून देण्यात आले.

 

याचाच अर्थ तुम्ही कुठल्याही देशाचे प्रमुख हा असेना, जर तुम्ही फेसबुकच्या नियमावलीचे पालन केले नाही, तर तुमचे अकाऊंट थेट बंद केले जाऊ शकते. कारण, कुठल्याही परिस्थितीत हिंसेला प्रवृत्त करणारा मजकूर करण्यासाठी, समाजात दुफळी माजवण्यासाठी फेसबुकचे व्यासपीठ उपलब्ध नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार, या वर्षाच्या अवघ्या सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत फेसबुकने तब्बल ५८३ दशलक्ष इतकी अकाऊंट्स विविध कारणास्तव बंद केली. यामध्ये आक्षेपार्ह मजकूरापासून ते अगदी पॉर्न मजकूर प्रसिद्ध करणार्या प्रोफाईल्स आणि पेजेसचाही समावेश आहे. त्यामुळे फेसबुकवर काहीही टाकले तरी चालते, आपल्याला कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही, या आविर्भावात कोणीही राहता वावरता कामा नये. मग तुम्ही कुठल्याही देशाचे लष्करप्रमुख का असेना....

 

जगभरात सोशल मीडियाचे जाळे इंटरनेटद्वारे पसरले आहे. मुळात मानवी विचार व्यक्त होण्यासाठीच सोशल मीडिया हे मुक्त आणि प्रभावी व्यासपीठ. पण, या माध्यमातून जर माणसामाणसांतील सलोखा जपला जाणार नसेल, जातीय भेद वाढणार असेल व एकप्रकारे माणसाच्या जीवालाच धोका निर्माण होणार असेल, तर मग खरंच या माध्यमाच्या सीमांना काही मर्यादा असाव्यात.

 

भारतानेदेखील आता सोशल मीडियाच्या मर्यादा अधोरेखित करायला घेतल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताचे माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांची व्हॉट्सअॅपचे सीईओ क्रिस डॅनियल यांनी दिल्लीत भेट घेतली होती. भारतात सोशल मीडियावरून लोकांमध्ये अफवा पसरविण्याचे प्रकार वाढले आहेत. या अफवांमधूनच ‘मॉब लिंचिंगम्हणजेच सामूहिक मारहाणीच्या जीवघेण्या घटना घडल्या आहेत. अफवा पसरू नयेत म्हणून गेल्या काही महिन्यांत व्हॉट्सअॅपमध्ये बरेच बदल करण्यात आले.

 

काही देशांमध्ये तर फेसबुक, व्हॉट्सअॅप व यूट्यूबसारख्या सोशल माध्यमांवर बंदी आहे. उदाहरणार्थ, पाकिस्तानमध्ये यूट्यूबवर बंदी आहे तर चीन, उत्तर कोरियामध्ये गुगल वापरण्यास बंदी आहे. एकीकडे सोशल मीडियावरील ही बंधने पाहायला मिळतात तर दुसरीकडे सोशल मीडियाद्वारे सीरियातील नागरिकांनी देशात क्रांती घडवून आणल्याची आदर्श उदाहरणेदेखील आपल्यासमोर आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारताने आपल्या नागरिकांना सोशल मीडिया वापराचे स्वातंत्र्य दिले आहे. पण अफवा, खोट्या बातम्या यांमुळे कुठेतरी या स्वातंत्र्यावर आता गदा येऊ लागली आहे. त्यामुळे आज देशात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आधी सोशल मीडियाच्या वापराविषयी कायदे तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 - साईली भाटकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@