‘संस्कारभारती’ आयोजित राज्यस्तरीय भारूडगायन स्पर्धा संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018   
Total Views |


 

या स्पर्धेमुळे विविध भागांतील गायक, वादक, परीक्षक, श्रोते एकत्र आले. ते एकमेकांशी रक्षाबंधनाच्या पवित्र बंधनांना जोडले गेले.(यावेळी सर्वांना राखी बांधण्यात आली!)विविध विषयांवरील प्रबोधन, थोड्यावेळात गाऊन,बोलून आपण सर्वांनी जे भारूड तयार केले आहे, त्याचा उपयोग वस्तीवस्तीवर जाऊन व्यसनमुक्ती, प्लॅस्टिक वापर इ. बाबीत जनजागृतीसाठी आहे. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाला काय हवंय, याचा विचार करून ते देण्यासाठी कुशलतेने कार्य करणे, हा संस्कारभारतीचा उद्देश आहे. त्यामुळे आपण संस्कारभारतीचे अवश्य सभासद व्हावे, आपली कला चांगल्या रीतीने प्रकट होण्यासाठी संस्कारभारतीचे व्यासपीठ मोलाचे आहे.

- माधुरी शेबेकर-संस्कारभारती, मुंबई

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

‘संस्कारभारती’ नावाप्रमाणेच भारतीय संस्कार आणि संस्कृतीचे दिव्यत्व जपून त्याचे संवर्धन करणारी संस्था आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रहित चिंतन आणि कार्य ही भूमिका आपल्या विविध उपक्रमांतून जागवातना संस्कारभारतीने आपली वैभवशाली संस्कारसंपन्न प्रतिमा जपली आहे. कला प्रतिभाच्या माध्यमातून भारतीय संस्कार कलेचे खर्‍या अर्थाने श्रीमंत रूप समाजासमोर यावे, यासाठी संस्कारभारतीचे वर्षभर सहा मुख्य उपक्रम होतात. पण त्याव्यतिरीक्त विविध सण-उत्सव, प्रासंगिक यांचा समन्वय साधत संस्कारभारती काळानुरूप आणि कालसापेक्ष कार्यक्रमाचे आयोजन करते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संस्कारभारतीने आयोजित केलेली दि. २६ ऑगस्ट रोजीची दादरमधील श्री. विठ्ठल मंदिराच्या सभागृहातील राज्यस्तरीय भारूडगायन स्पर्धा.

मायानगरी आणि भौतिकसागरात आकंठ बुडालेली मुंबई असे काहीसे मुंबईबद्दल लोकांना वाटत राहते. मुंबई म्हटले की, ते रोजगार, ती चौपाटी आणि सर्वांना खुणावणारे बॉलीवूडवाल्या नटनट्या. पण संस्कारभारतीने मुंबादेवीचे नाव ल्यायलेल्या मुंबईची धार्मिकता तीही सामाजिकरूपात समाजासमोर आणली. माध्यम होते ‘भारूड स्पर्धा.’ या स्पर्धेमध्ये सांगली, सोलापूर, नाशिक येथील संघांबरोबर मुंबई, ठाणे विभागांमधील एकूण २२ संघांचा सहभाग होता. यात ९ वर्षांपासून ९१ वर्षांपर्यंतचे कलाकार सहभागी झाले होते. लोककला अभ्यासक आणि संस्कारभारती कोकणप्रांताचे कलामार्गदर्शक डॉ.प्रकाश खांडगे आणि मुंबई महानगर विभागाचे अध्यक्ष सुनील बर्वे (अभिनेता,दिग्दर्शक,निर्माता)यांनी स्पर्धेचेउद्घाटन केले.

ज्येष्ठ कलागुरू म्हणून डॉ. प्रकाश खांडगे यांचा सत्कार ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक आणि संस्कारभारतीचे कलामार्गदर्शक राजदत्तजींच्या हस्ते करण्यात आला. ९१व्या वर्षीही स्पर्धेत सहभागी झालेल्या गोरेगावच्या शांता गोखले यांना सन्मानीत केले. जयराज साळगावकर (लेखक,वक्ता,उद्योजक) आणि प्रा. विसुभाऊ बापट यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी दरवर्षी श्रावण महिन्यात असा भक्तिरसांवर आधारित लोकसंगीत महोत्सव करण्याचंं डॉ. प्रकाश खांडगे यांनी मान्य केलं आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. किशोर खुशाले, शाम भगत, सुभाष दाबके, अरविंद जोशी, सुगंधा दाबके, डॉ. चारू सावरीकर, वीणा सामंत, प्रतिभा करंदीकर, माधुरी शेंबेकर यांनी मेहनत घेतली. सर्व कार्यक्रमाचे योग्य सूत्रसंचालन नीला लिमये यांनी केले.

२२ संघाच्या अटीतटीच्या स्पर्धेत ३ स्पर्धकांना निवडणे तसे अवघड काम होते. त्याच बरोबर दोन उत्तेजनार्थ पारितोषिकही होती. सर्वच स्पर्धकांनी भारूड सादर करताना सांघिकरित्या आपला जीव ओतला होता. तरीही नियमांनुसार स्पर्धकांना निवडायचे होते. त्यामध्ये मुलुंडच्या डॉ. सुचेता सावंत आणि सहकारी यांनी स्वरचित ‘जाडी वाढली हो...’ हे भारूड सादर करून प्रथम क्रमांक व सात हजार रुपये अधिक मानचिन्ह मिळवले. द्वितीय क्रमांक स्वरधारा कलामंच, सांगली यांनी ६ हजार रुपये अधिक मानचिन्ह यांसह पटकावला. स्वरांजली कलामंच, नेरळ यांनी ५ हजार रुपये अधिक मानचिन्ह मिळवले. कस्तुरीचा संघ, गोरेगाव आणि संत एकनाथ भारूड मंडळ,सोलापूर यांना प्रत्येकी एक हजार रुपये बक्षिस मिळून उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

उत्स्फूर्तपणे पोवाडा, गवळणगायन सादरीकरणाचा आनंद उपस्थितांबरोबर राजदत्तजी, खांडगे, अनंत भालेकर यांनी घेतला. संस्कार भारतीचे ब्रीदवाक्य आहे की, ‘या कला सा विमुक्तये।’ या ब्रीदवाक्याची प्रचिती उपस्थितांना आली.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@