सरसंघचालक येती घरा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |



रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे शिर्डीहून मुंबईकडे जाताना दि. २२ ऑगस्ट रोजीचे वास्तव्य दिलीप क्षीरसागर यांच्या घरी होते. सरसंघचालकांच्या आगमनाने अवघ्या नाशिक शहरामध्ये चैतन्याचे वातावरण होते. सरसंघचालकांच्या सहवासादरम्यान मनात उंचबळून आलेल्या भावना, आठवणींना प्रत्यक्ष दिलीप क्षीरसागर यांनी या लेखातून उजाळा दिला आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

एखादी मान्यवर व्यक्ती घरी येणे, ही खरेतर त्या घराची व त्या विशिष्ट मान्यवरांची व्यक्तिगत बाब असते. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी निवासाला जातात, तेव्हा हे त्यांचे वास्तव्य त्या कुटुंबाला, घराला, परिसराला व गावालादेखील चैतन्य देणारे असते. हा अनुभव अनेक संघ कार्यकर्त्यांनी घेतलेला असतो. कारण रा. स्व. संघ ही संघटना सर्व समाजाला आश्वासक व आपली वाटते. त्यामुळे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे शिर्डीहून मुंबईकडे जाताना दि. २२ ऑगस्ट रोजीचे नाशिकमधील वास्तव्य आमच्या घरी करायचे असा स्थानिक संघ कार्यकर्त्यांनी निर्णय आम्हाला सांगितला, तेव्हा आमचा आनंद शब्दात व्यक्त करण्यापलीकडचा होता. अनेक वर्षे संघाच्या शहर-जिल्हा-विभाग कार्यवाह पदाची जबाबदारीत राहिलेलो असल्याने या वास्तव्याचा निर्णय करताना आवश्यक व्यवस्थांचा किती विचार करावा लागतो, याचा अनुभव होता. तथापि, स्वत:च्या घरी असा सुखद प्रसंग येईल, असे वाटले नव्हते. मा. सरकार्यवाह भैय्याजी जोशी तसेच सुनीलराव देशपांडे व रविजी जोशी असे केंद्रीय कार्यकर्ते यापूर्वी आमच्या घरी निवासास राहिलेले आहेत. परंतु, आज रा. स्व. संघाच्या सरसंघचालकांचा देशभरात व आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील प्रभाव वाढलेला असल्याने काहीसे दडपण निश्चित होते.

 

‘झेड प्लस’ सुरक्षा

सरसंघचालकांच्या ‘झेड प्लस’ सुरक्षेच्या यंत्रणेमुळे येणारे निर्बंध खूप असतात. अनेक स्वयंसेवक-कार्यकर्ते तसेच समाजातील अनेक मान्यवर व्यक्तींना त्यांना भेटावेसे वाटणे, हे अगदी स्वाभाविक असते. मी स्वत:च प्रांत प्रचार प्रमुख असल्याने प्रसार माध्यमांची अशा प्रसंगी असणारी अपेक्षा मला दिसत होती. एरवी सामान्यत: दिवाळीपूर्वी घरातील सर्व आवराआवर करण्याची सवय असते. पण, ही तर आमच्या दृष्टीने श्रावण महिन्यात येणारी दिवाळी होती. त्यामुळे तशी आवराआवरीची लगबग सुरू झाली. सरसंघचालकांचा नजीकच्या आप्तेष्टांसह परिचय व संवाद करायचा असल्याने तसे तातडीचे निरोप पाठवले गेले. जसजसा नियोजित दिवस जवळ येऊ लागला, तशी ‘झेड प्लस’ सुरक्षेच्या यंत्रणेची लगबग सुरू झाली. या यंत्रणेतील अनेकांना एवढी मोठी व्यक्ती आपल्या कार्यक्षेत्रात येते याचे अप्रूप जाणवत होते. एवढ्या मोठ्या संघटनेचे प्रमुख सामान्य कार्यकर्त्याकडे मुक्कामी येतात, हा त्यांच्या दृष्टीनेदेखील औत्सुक्याचा विषय होता. सर्व स्तरांवरील पोलीस अधिकारी आपल्या जबाबदारीच्या भूमिकेतून कामास लागल्याचे आम्ही अनुभवत होतो.

 

‘वंदना पार्क’चे सहकार्य

‘झेड प्लस’ सुरक्षेत सर्वात मोठा भाग म्हणजे ५५ फ्लॅट्सच्या आमच्या वंदना पार्क अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकांची होणारी पार्किंग व येणे-जाणे यावरील निर्बंध, पोलिसांकडून त्यांची स्वाभाविक होणारी चौकशी हे सर्व त्यांच्या गैरसोईचे होणार हे दिसत होते. पण, संघकामातील अनुभवांमुळे सर्वांची सपरिवार भेट घेतल्यावर समाजाच्या चांगुलपणाचे विशाल दर्शन घडले. सर्वांनी एवढे मोठे व्यक्तिमत्व आपल्या परिसरात मुक्कामी येणार याचा आनंद व्यक्त केला. पुढे तर आपण होऊन अनेकांनी काय मदत पाहिजे, अशी विचारणा केली. प्रत्यक्षात सरसंघचालकांच्या आगमनाच्या दिवशी तर सगळेच सजावट व स्वागतासाठी धावपळ करत होते. त्यांच्या आगमनाची वेळ साडेआठची होती, पण सर्वचजण सायंकाळी सहापासून तयार होते. आमच्या वंदना पार्कमधील सर्व लहान-थोर-प्रौढ सर्व बंधु-भगिनींनी अत्यंत उत्स्फूर्त स्वागत केले. मोहनजींनी देखील अत्यंत आनंदाने हे स्वागत स्वीकारले. ‘झेड प्लस’ सुरक्षेमुळे झालेली अडचण सर्वांनी अत्यंत आनंदाने सहन केली.

 
 
 

घरातले डॉ. मोहनजी

डॉ. मोहनजींच्या घरातील सुहास्य मुद्रेने झालेल्या प्रवेशाने घरातील अवघे अवकाश आनंदाने कसे भरून पावणार आहे, याची प्रसादचिन्हे दिसली. शिर्डी येथील दिवसभराच्या कार्यक्रमांची धावपळ व प्रवासाची दगदग, थकवा त्यांच्या बोलण्यात, संवादात कुठेही जाणवला नाही. त्यांच्या एकादशीच्या फराळाची तयारी स्वयंपाकघरात केली होती. तेथेच त्यांची बसण्याची व्यवस्था केली होती. त्यांच्या सहज संवादाने घरातील महिला वर्गावर आलेले किंचितसे दडपण अलगद नाहीसे झाले. मोहनजींनी त्यांना हवे ते मागून घेतले. त्यांच्या फराळासाठी केलेल्या भगर-आमटीचीदुसर्‍या दिवशी बातमी झाली. त्यावरून ‘न्यूज’ कशी होते, याचे छोटेसे प्रशिक्षण सर्वांनी अनुभवले.

 

सर्वांच्या भोजनानंतर सर्वांचा परिचय झाला. सर्वांशी मोहनजींचा अनौपचारिक संवाद झाला. वयाने सर्वात लहान अशी माझी नात चि. मिहिकाशी त्यांचा मजेशीर संवाद सुरू होता. त्यामुळे सर्वचजण तो आनंद अनुभवत होते. तिला काय आवडते? असे विचारताना तिला संभाजी महाराजांवरील टीव्हीवर सुरू असलेली मालिका आवडते, हे कळल्यावर संभाजी महाराजांची एक छोटीशी गोष्ट त्यांनी तिला सांगितली. आपण नेहमी नाशिकला आल्यावर ज्या खोलीत झोपतो, तिथे आज या नवीन आजोबांची मुक्कामाची व्यवस्था केलेली तिने पाहिलेली होती. त्यामुळे सर्व गप्पा मारत असताना तिने त्यांच्यादेखतच “आई, आता आपली रूम?” असे विचारल्यावर सर्वांनाच हसू आले. मोहनजींनीदेखील त्यात सहभागी होताना, "तू येतेस का रूममध्ये? म्हणजे मला भीती वाटणार नाही," असे गमतीने तिला विचारले आणि त्या संवादात गंमत आणली.

 
 

खरेतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मोहनजींचे आगमन झालेले होते. त्यामुळे जेवण, गप्पा, फोटोसेशन यात दोन तास कसे निघून गेले ते कळलेच नाही. संघाच्या प्रेमापोटी व मोहनजींवरील श्रद्धेमुळे फोटो काढण्यासाठी आलेले ‘Restoration of Ajanta’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मिशन म्हणून घेतलेले राष्ट्रीय स्तरावरील फोटोग्राफर प्रसाद पवार यांनी मोहनजींना ग्रुपफोटोसाठी जसे सांगितले तसे ते सहजपणे बसले. प्रसाद पवार यांच्या अजंठा प्रकल्पाची त्यांनी आस्थेने चौकशी केली. सतत सावलीसारखे वावरणार्‍या कमांडोजच्या सुरक्षेत राहणार्‍यात एवढ्या महान व्यक्तिमत्वाचा घरातील एखाद्या वडीलधार्‍या व्यक्तीसारखा सहज वावर व संवाद हे सर्व घरातील सर्वांना खूपच भावणारे होते.

 

दुसर्‍या दिवशीचा सकाळचा दीड तास फक्त ते आमच्याबरोबर राहणार होते. कारण, पुढील प्रवासाचे तसे नियोजन होते. तरीसुद्धा यातील प्रत्येक क्षण आपण त्यांच्या सहवासात राहावे, असेच सर्वांना वाटत होते. सकाळच्या भेटींमध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायकराव गोविलकर हे त्यांचे नवीन पुस्तक ‘मोदीनॉमिक्स’ भेट देण्यासाठी आले. त्यांच्याबरोबर मोहनजींनी विविध राष्ट्रीय व आर्थिक विषयांवर चर्चा केली. माझी नात चि. मिहिकाला संभाजी महाराजांची गोष्ट सांगणारे सरसंघचालक व विविध राष्ट्रीय व आर्थिक विषयांवर विविध राष्ट्रीय व आर्थिक विषयांवर चर्चा करणारे सरसंघचालक अशी अत्यंत विलोभनीय रूपे आम्ही अनुभवली.

 

आस्थेचे प्रतीक

मोहनजींच्या सहवासातील हा वेळ संपूच नये, असे वाटत होते. पण, संघ कार्यकर्त्याला पुढील कार्यक्रमांची वेळ खुणावत असते. त्याप्रमाणे आमच्या घरून प्रस्थानची वेळ आली. सर्वांचा प्रेमाचा निरोप घेऊन ते खाली उतरले, तर आमच्या वंदना पार्कमधील त्यांना भेटण्यासाठी व निरोपासाठी अनेकजण येऊन थांबले होते. त्यांचा प्रेमाने निरोप घेऊन मोहनजी घराजवळील शाखेत प्रार्थनेसाठी रवाना झाले. खरेतर केवळ चोवीस तास आधी शाखेत जाण्याचा निर्णय झाला होता व केवळ दहा मिनिटेच थांबणे शक्य होणार होते. कारण, पुढे रेल्वे स्टेशनवर पोहोचायचे होते. तरीदेखील एवढ्या अल्पावधीत अडीचशे स्वयंसेवक, नागरिक, महिला तिथे जमले होते. आपल्या परिसरात सरसंघचालक मुक्कामी येणार, पण वेळेची व सुरक्षेची मर्यादा यामुळे आपण त्यांना भेटू शकत नाही, हे सर्वांना माहिती होते. परंतु, त्यांचे शाखेवर दर्शन होणार यासाठी सर्वजण जमले होते. सरसंघचालक स्टेशनकडे रवाना झाल्यावर तेथे जमलेल्या सर्वांशी बोलताना हा आनंद आम्ही अनुभवत होतो.

 

शाखेवरून घरी आल्यावर थोड्यावेळाने माझ्या विवाहित मुलीच्या वयाची एक महिला आमचा पत्ता विचारात आली. तिला मी प्रथमच बघत असल्याने परिचय झाला. परिचयात लक्षात आले की, आमचे सातपूर येथील संघ कार्यकर्ते अप्पा दीक्षित यांची ती विवाहित कन्या असून ती आमच्या घराजवळच राहते. तिला मोहनजी यांचा कार्यक्रम खूप उशिरा कळल्याने ती शाखेवर पोहोचू न शकल्याने ती आमचे घर शोधत आली होती. सरसंघचालकांची आपली भेट अथवा दर्शन होऊ शकत नाही, तर निदान ज्या घरी त्यांचे काहीकाळ वास्तव्य होते, त्या घराचे दर्शन घ्यायला ती आली होती. हे तिने सांगितल्यावर आम्ही सर्वचजण थरारलो. संघाबद्दलची श्रद्धा व आस्था किती खोल असते आणि त्यामुळे ‘सरसंघचालक मुक्कामी राहिलेले घर’ म्हणूनदेखील आपली जबाबदारी किती वाढलेली आहे हे जाणवले.

 

संघ कार्यकर्त्याच्या जीवनात अनेक प्रांत-क्षेत्र-केंद्रीय कार्यकर्ते यांचा सहवासाचा लाभ होत असतो. तो अनुभव अनेक वर्षे घेत आहे. त्यातून संघकामाची होणारी उकल, सहज चर्चेतून मिळणारे मार्गदर्शन हे दीर्घकाळ कामासाठी एक टॉनिक असते. परंतु, सरसंघचालकांचे काहीकाळ सान्निध्य कुटुंबासाठी मिळणे, हा एक भाग्याचाच प्रसंग असतो. नंतर अनेकांचे येणारे फोन व प्रत्यक्ष भेटीतून अधिक अधोरेखित झाले. संघकामातील काही उत्कट क्षणांपैकी हा सर्वोत्कट अनुभव होता. तो अविस्मरणीय आहे. त्याचबरोबर त्यानंतर भेटलेल्या संघ कार्यकर्ते आणि परिचित यांच्याशी या अनुभवांविषयी बोलताना नकळत आपली जबाबदारी किती वाढली आहे, याची जाणीव झाली. संघाकामातील कोणत्याही गोष्टी काही विशिष्ट हेतू ठेवून करण्याचा व त्यातून काहीतरी घडवण्याचा प्रयत्न असतो. सरसंघचालकांचा मुक्काम कार्यकर्त्याच्या घरी ठेवण्याचा असाच प्रयत्न प्रांत-विभाग-शहर कार्यकर्त्यांचा असणार यात शंका नाही!

 - दिलीप क्षीरसागर

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@