मार्केटच्या मुद्यावर गाळेधारक आक्रमक होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |
जळगाव :
महापालिका आयुक्तांनी १५ दिवसांत गाळेभाड्याची थकित रक्कम भरण्याची सूचना गाळेधारकांना केल्यानंतर गाळेधारक संघटनेची पुढील धोरण ठरविण्यासाठी बैठक होणार असून, यात अविकसित मार्केटचा मुद्दा मांडला जाण्याची शक्यता आहे.
 
 
महापालिका मार्केटमधील भाडेकराराची मुदत संपलेल्या गाळेधारकांना महापालिका प्रशासनाने बिल देताना पाचपट दंडांसह बिले वितरित केलेली आहेत. यात गाळेधारकांनी ३३४ कोटींच्या विरोधात हरकत कायम ठेवून केवळ २२ कोटी रुपयांचा भरणा केलेला असल्याने हे गाळेधारक डिफॉल्टर ठरलेले आहेत. पाचपट दंड कमी करण्याचा अधिकार हा शासन व महासभेला आहे. यातील एकपट दंड पकडला, तरी जवळपास १५० कोटींचे येणे गाळेधारकांकडे असताना त्यांनी केवळ २२ कोटी महापालिकेत जमा केलेले आहे. म्हणजेच केवळ ७ टक्के रक्कम गाळेधारकांनी भरली आहे. सामान्यपणे शास्ती ही २ टक्के आकारली जात असताना गाळेधारकांना केवळ एकपट दंड आकारला आणि त्यावर ऑडीट निघाले तर त्याला उत्तर कुणी द्यायचे? असा परखड सवाल करीत आयुक्तांनी येत्या १५ दिवसांत उर्वरित रक्कम भरण्याची सूचना गाळेधारकांना केली आहे.
 
 
गाळेधारकांची संघटना असताना केवळ फुले मार्केटमधील गाळेधारकांनी आयुक्तांची भेट घेतली. त्यावरूनही संघटनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी आहे. आयुक्त सांगताहेत पैसे भरा पण फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केट वगळता इतर मार्केटमधील व्यवसायाची स्थिती काय आहे? याची विचारही केला गेला पाहिजे. भास्कर मार्केटमधील गाळेधारक वार्षिक २५ लाख रुपये भाडे देण्यास सक्षम आहेत का? प्रशासनाने राजर्षी शाहू मार्केटमधील डॉ. दमानी यांना भाड्यापोटी ९५ लाख रुपयांचे बिल बजावले आहे. १४ मार्केट अविकसित गटात मोडत असल्याचे मत गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले. सन २०१२ पर्यंत गाळेधारकांना ज्याप्रमाणे भाडेआकारणी होत होती तेच सूत्र सन २०१८ पर्यंत कायम ठेवावे आणि यानंतर प्रशासनाने सुधारित भाडेसूत्र लागू करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. या प्रकरणात राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन तोडगा काढू शकते. ना. गिरीश महाजन यांची लवकरच भेट घेऊन गाळेप्रश्‍न लवकर निकाली काढण्याबाबत त्यांना विनंती केली जाईल, अशी माहिती डॉ. सोनवणे यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@