श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे नंदुरबारला गुरुवारी रथयात्रा सोहळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |
 
 
नंदुरबार :
शहरात सुमारे १३० वर्षांची परंपरा असलेल्या श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे नवीन रथ श्रींना अर्पण करण्यानिमित्त भव्य रथयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सव्वाशे वर्षांनंतर मंडळातर्फे प्रथमच बाबा गणपती रथाची गुरुवार, ३० रोजी संकष्ट चतुर्थीला शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
 
 
नंदनगरीसह जिल्ह्यातील भाविकांचा मानाचा व नवसाला पावणार्‍या श्रीमंत बाबा गणपतीची ख्याती सर्वत्र आहे. मंडळातर्फे गतवर्षी नवीन रथाचा केलेला संकल्प यंदा पूर्ण झाला असून मंडळाने स्वखर्चाने तब्बल १३ लाख रुपयांचा रथ कर्नाटक येथून नुकताच आणला आहे. यानिमित्त रथयात्रा सोहळ्याचे आयोजन केले आहे. बुधवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वास्तुशांती व गणेशयाग प्रारंभ तर पूर्णाहुती गुरुवार, ३० रोजी सकाळी ९ वाजता होईल. त्यानंतर ९:३० वाजता महाआरती होईल. नवीन संगमरवरी रथावर बाबा गणपतीचे दर्शन मिरवणुकीद्वारे यंदा प्रथमच भाविकांना होणार आहे. त्यानुसार संकष्ट चतुर्थीला गुरुवार, सकाळी १० वाजता नवीन रथाची मिरवणूक वाजत-गाजत निघणार आहे. मिरवणूक मार्ग सोनार गल्ली, जळका बाजार, शिवाजी रोड, सिद्धिविनायक मंदिर, मंगळ बाजार, तूप बाजार, गणपती मंदिर, सोनार खुंट, सराफ बाजार, टिळक रोडमार्गे पुन्हा बाबा गणपतीजवळ समारोप होईल. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून खा.डॉ.हीना गावीत, आ.चंद्रकांत रघुवंशी, आ.डॉ. विजयकुमार गावीत, आ.शिरीष चौधरी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, नगरसेविका जागृती सोनार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमंत बाबा गणपती गणेशोत्सव मंडळ, उत्सव समिती, रथयात्रा सोहळा समिती व सर्व सभासदांनी केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@