पुरोगामी पोपटपंची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |



सुप्रिया सुळेही त्याच रांगेतल्या, ज्यांना हिंदू पूजाविधींवर टीका करता येते, पण इतरांवर टीका करण्याची वेळ आली की, मातीत चोच खुपसावीशी वाटते. त्यामुळेच अशा लोकांना काही गोष्टी सांगणे अगत्याचे ठरते.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात सत्यनारायणाच्या पूजा शैक्षणिक संकुलात नव्हे, तर स्वतःच्या घरात घाला,” असा आगाऊ सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. सुप्रिया सुळेंच्या विधानाला संदर्भ होता तो पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात केलेल्या सत्यनारायण पूजेचा. मुळात फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित केलेली सत्यनारायण पूजा ही आजची नाही. गेल्या ४० वर्षांपासून महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडून ही पूजा केली जात असून ती तिथली परंपरा आहे. शिवाय या पूजेत ज्याची इच्छा असेल त्याला सहभागी होण्याची, देवाचे दर्शन आणि तीर्थप्रसाद घेण्याची परवानगी आहे. म्हणजेच, कोणावरही कोणतीही बळजबरी वा जबरदस्ती केली जात नाही. तरीही केवळ मतांच्या राजकारणासाठी सुप्रिया सुळे आणि त्यांच्याच पंगतीतल्या कथित पुरोगामित्वाचा वसा सांगणाऱ्याकडून त्याबाबतचा वाद पसरवला गेला. विरोध करणाऱ्याकडून सत्यनारायण पूजेतून अंधश्रद्धा आणि गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप करण्यात आला. बुद्धीवादाचा, विज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्याचे व्रत अंगीकारलेल्या महाविद्यालयात ही आध्यात्मिक पूजा का?, असा सवालही विचारला गेला. ज्या लोकांना अल्लाचा घोडाही अंधश्रद्धा वाटत नाही, पण सत्यनारायणाची पूजा ही अंधश्रद्धा वाटते, ती लोकं असा विरोध करतच राहणार, हेही खरेच म्हणा. कालपरवा देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप असलेल्या कन्हैय्याकुमारनेही हिंदू धर्मावर टीका का करता?’ या प्रश्नावर हिंदू सहिष्णू असल्याने टीका करतो,’ असे उत्तर दिले होते. म्हणजेच, अन्यधर्मीय कितीही अंधश्रद्धा पसरवत असले तरी त्याला विरोध करण्याची हिंमत आमच्यात नाही, अशी ती कबुलीच होती. सुप्रिया सुळेही त्याच रांगेतल्या, ज्यांना हिंदू पूजाविधींवर टीका करता येते, पण इतरांवर टीका करण्याची वेळ आली की, मातीत चोच खुपसावीशी वाटते. त्यामुळेच अशा लोकांना काही गोष्टी सांगणे अगत्याचे ठरते.

 

सत्यनारायणाच्या पूजेकडे पाहण्याचे निरनिराळे दृष्टिकोन असू शकतात, पण त्यातून कोणाचे काही वाईटही होत नाही. उलट वर्षभर आपापल्या कामात इतस्ततः धावपळ करणाऱ्या माणसांना एकत्र येण्याचे, हितगुज साधण्याचे, ख्यालीखुशाली विचारण्याचे एक व्यासपीठ यातून उपलब्ध होत असते. दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या आयुष्यात अशा पूजाविधींमुळे आनंदाचे, सुखाचे दोन क्षण येत असतील, तर त्यात गैर काय? आयुष्यभर जातीधर्माचे राजकारण करून आपल्या मतपेढ्या भक्कम करणाऱ्या आणि पुन्हा निरपेक्षतेचा आव आणणाऱ्या या लोकांना ते कसे समजणार, म्हणा? सर्वसामान्य माणूस समस्यांनी, अडचणींनी ग्रासलेला आणि सदासर्वकाळ आपल्यापुढेच याचकाच्या रूपात पाहायला मिळावा, अशी इच्छा बाळगणाऱ्याना महाविद्यालयातल्या किंवा कुठल्याही ठिकाणच्या लोकांचा आनंद हिरावण्याचेच सुचणार! सुप्रिया सुळेंनी तेच केले. विशेष म्हणजे, फर्ग्युसन महाविद्यालयातली ही पूजा महाविद्यालय प्रशासनाने वा व्यवस्थापनाने आयोजित केलेली नव्हती, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी केली होती. तरीही सुप्रिया सुळेंनी टीका केली ती महाविद्यालयाच्या, संस्थेच्या संचालकांवर! असे का? राज्यातल्या निरनिराळ्या शैक्षणिक संस्थांवर गेल्या कित्येक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या जाणत्याकी खणत्याराजाच्या हातात आणखी एखादी संस्था यावी म्हणून? शिवाय उद्या जरी ही पूजा महाविद्यालय प्रशासन, व्यवस्थापन वा संचालकांच्या मंजुरीने झाली असती तरी त्याला विरोध करणाऱ्या सुप्रिया सुळे कोण? स्वतः सत्तेत असताना अगदी पोट फुटेस्तोवर इफ्तारच्या पार्ट्या झोडायच्या आणि कोणी सत्यनारायण पूजा केली की विरोधाचा सूर आळवायचा हे कुठले लक्षण?

 

अंधश्रद्धेला विरोध करण्याची सुप्रिया सुळेंना एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी स्वतःच्या बाबांकडे, पक्षाध्यक्षांकडे पाहायला हवे. कारण कुराण हा प्रेषिताचा आदेश आहे, तो मोडता येणार नाही,” असे म्हणणारे साक्षात शरद पवारच होते. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी कधी शरद पवारांना, “बाबा, तुम्ही चुकीचे बोलत आहात,” असे म्हटल्याचे तरी ऐकिवात नाही. कदाचित बाबांनी बोललेली बात अंधश्रद्धानसून श्रद्धाअसेल अन् त्या श्रद्धेच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसची नैय्या तरत असेल! म्हणून सुप्रिया सुळेंची बाबांविरोधात बोलण्यासाठी जीभ वळली नसेल. इतकेच कशाला, शरद पवारांनी मागे एकदा भिमाशंकर की कुठल्याशा देवळात झोपलो असता, आपल्या अंगावरून साप गेला व त्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्याचे अफलातून विधान केले होते. एकतर शरद पवारांनी इथे स्वतःच्याच तोंडाने या अंधश्रद्धेचा बोलबाला केला होता. शिवाय पवारांनी यातून स्वतःच्या पुरोगामित्वाला फाटा दिल्याचेच स्पष्ट होते. सुप्रिया सुळेंनी या अंधश्रद्धाळू विधानावर कधी आक्षेप घेतला का हो? फर्ग्युसनमधील पूजा-विधीवरून विरोध करणारे सरकारी अनुदानित आस्थापनांमध्ये धार्मिक विधी होऊ शकत नसल्याचे तुणतुणे वाजवतानाही दिसले. सुप्रिया सुळेही असेच म्हणाल्या. असेच असेल तर मग गाव-खेड्यांतल्या पोलीस ठाण्यांपासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत इफ्तार पार्ट्या का आयोजित केल्या जायच्या? की तिथे खाल्लेल्या तंगडी-कबाबला जागण्यासाठी या लोकांकडून सत्यनारायणाच्या पूजेला विरोध केला जातो? सरकारी अनुदानावर चालणाऱ्या मदरशात कुराण अन् कॉन्व्हेंट शाळांत येशू वा मदर मेरीची प्रार्थना तरी का केली जाते? मदरशांमध्ये प्रार्थनास्थळे आणि कॉन्व्हेंट शाळांत क्रूसावरच्या येशूला वा हाती बाळ घेतलेल्या मदर मेरीला का पूजले जाते? सरकारी अनुदानावर वा मदतीवर चालणाऱ्या या आस्थापनांतील धार्मिक गोष्टींना सुप्रिया सुळेंनी कधी विरोध का नाही केला? मतांसाठीच ना?

 

दुसरीकडे सुप्रिया सुळेंना एवढीच जनतेवरील अन्याय-अत्याचाराची फिकीर असेल तर त्यांनी त्याची सोडवणूक जरूर करावी. तिहेरी तलाकने पीडित असलेल्या अन्यायग्रस्त महिलांची संख्या देशात कितीतरी आहे. तिथे खरे तर सुप्रिया सुळेंच्या पुरोगामित्वाची नितांत आवश्यकता आहे, पण तिहेरी तलाकचा विषय आला की, सुप्रिया सुळे असो किंवा अन्य कोणीही पुरोगामी या लोकांच्या पुरोगामित्वाला जणू काही लकवा लागून ते मानाच टाकतात. सुप्रिया सुळेंनी तर लोकसभेतही तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला विरोध केला. असे का? म्हणजे ज्या प्रश्नांच्या सोडवणुकीतून समाजाचे काहीतरी भले होणार ते सोडवायचे नाहीत तर ज्यातून समाजाला आनंदाची, एकत्र येण्याची, उत्सव साजरा करण्याची संधी मिळते, त्या गोष्टी बंद करण्यासाठी तोंडाची वाफ दवडायची, अशी ही यांची उफराटी रीती! यामागे मतपेटीचे राजकारण अन् हिंदूद्वेषाव्यतिरिक्त दुसरे काय असू शकते? सुप्रिया सुळेंच्या पक्षातला एक बोलघेवडा इसम म्हणजे जितेंद्र आव्हाड. गगनचुंबी दहीहंड्या उभारून ठाण्यातल्या सर्वसामान्य लोकांना समस्यांच्या खाईत लोटणारा हा इसम सुप्रिया सुळेंना कधी आक्षेपार्ह वाटला का हो? सदान्कदा डॉल्बी अन् लाऊडस्पीकरच्या दणदणाटात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांना त्रास देणाऱ्या आव्हाडांच्या तमाशातून नेमके कोणते पुरोगामी कार्य पार पडत असते? सुप्रिया सुळेंनी याचे उत्तर नक्कीच द्यावे, पण त्या देणार नाहीत. कारण, आव्हाड पडले ओबीसी नेते. छगन भुजबळांच्या विरोधात वापरण्यासाठी योग्य माणूस-पक्षांतर्गत गटबाजी टिकवून ठेवणारा अन् पवारांवर निष्ठा दाखवणारा. म्हणूनच तर या माणसाने दहशतवादी इशरत जहाँच्या जनाजापासून ते तिच्या नावाने अॅम्ब्युलन्स चालवण्यापर्यंत, ‘सेव्ह गाझाच्या नावाने गोंधळ घालण्यापासून ते तुकाराम महाराजांचा खून झाल्याचे बिनडोक विधान करण्यापर्यंत अन् आता तर हा देश राहायला योग्य नसल्याचे तारे तोडण्यापर्यंत मजल मारली तरी सुप्रिया सुळे वा शरद पवारांना त्याविरोधात शब्दही काढण्याची हिंमत झाली नाही. कदाचित आव्हाडांची थेरंही पवार पिता-पुत्रीच्या संमतीनेच सुरू असतील अन् त्यामुळे सत्यनारायण पूजेला विरोध करण्याच्या उठाठेवी केल्या जात असतील.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@