राहुलबाबांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018   
Total Views |



 

राहुल गांधी यांचा हा विदेश दौरा हा त्यांची स्वत:ची आणि काँग्रेस पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी होता, हे उघडच आहे. त्यात त्यांना किती यश मिळाले ते त्यांनाच माहीत! पण, स्वत:स ‘शॅडो प्राइम मिनिस्टर’ समजून चालणाऱ्या राहुल गांधी यांचा वकूब काय आहे, हे या निमित्ताने जनतेला कळून आले. केवळ दुसऱ्याला नावे ठेवली की, आपण चांगले ठरत नाही.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी जर्मनी आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले असता, त्यांनी तेथे एकच काम प्रामुख्याने केले आणि ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची जितकी बदनामी करता येईल तितकी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या परदेश दौऱ्यांमध्ये तेथील भारतीयांनी त्यांना जो प्रचंड प्रतिसाद दिला तो लक्षात घेऊन, स्वत:ची आणि काँग्रेस पक्षाची प्रतिमा उजळविण्यासाठी त्यांचा हा दौरा होता, हे उघडच आहे. पण, आपल्याच देशाच्या पंतप्रधानांची विदेशात बदनामी करून राहुल गांधी यांनी आपली पातळी दाखवून दिली आहे. इतरांपुढे आम्ही एकशे पाच आहोत, याचे दर्शन त्यांनी घडविले असते, तर त्यांचे सर्वांनी कौतुक केले असते! पण, राहुल गांधी यांची तशी मनीषा नव्हती, हे त्यांनी ज्या अनेक विषयांना स्पर्श केला त्यावरून दिसून येते. आपल्या अकलेचे आणखी तारे न तोडता डोकलामसारख्या मुद्द्याचा आपला विशेष अभ्यास नसल्याचे कबूल करून त्यांनी वेळ मारून नेल्याचेही दिसून आले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्ली आणि अन्यत्र शीख समुदायाचा जो नरसंहार झाला, त्यात काँग्रेसचा सहभाग नसल्याचे सांगून त्यांनी खोटारडेपणाचा कळस केला. याद्वारे शीख समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला.

 

राहुल गांधी यांनी आपल्या विदेश दौऱ्यात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. एका कार्यक्रमात शीखविरोधी दंगलीसंदर्भात त्यांना विचारले असता, त्या दंगलीत काँग्रेसचा हात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण, याच राहुल गांधी यांनी चार वर्षांपूर्वी, “काही काँग्रेसजन यात सहभागी असू शकतात, काही काँग्रेसजनांना त्याबद्दल शिक्षा झाली आहे,” असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. मग एकदम असे घूमजाव करण्याचे कारण काय? एकदा चूक कबूल करता, दुसऱ्या वेळी कानावर हात ठेवता, हे नक्कीच न शोभणारे आहे. शीखविरोधी दंगली कोणी घडविल्या? कोणकोणत्या काँग्रेस नेत्यांनी त्यासाठी लोकांची माथी भडकविली, हे जनता आणि विशेष करून शीख समाज विसरलेला नाही. राहुल गांधी त्यावेळी लहान असले तरी त्यांचे वडील राजीव गांधी यांनी त्यावेळी काय म्हटले होते, हे लक्षात घेऊन त्यांनी बोलायला हवे होते. राजीव गांधी यांनी, “जेव्हा एखादा मोठा वृक्ष कोसळतो, त्यावेळी जमिनीला हादरे बसतातच,” असे म्हणून अप्रत्यक्षपणे त्या हिंसाचाराचे समर्थनच केले होते. असे सर्व असताना राहुल गांधी यांनी एवढा धादांत खोटारडेपणा कशासाठी केला?

 

आपल्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी भाजप आणि संघावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही, पण त्या टीकेला काही आधार तरी हवा? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना या महाशयांनी थेट ‘मुस्लीम ब्रदरहूड’शी करून संघाला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचा अत्यंत हीन प्रयत्न केला. संघ आणि ‘मुस्लीम ब्रदरहूड’ यांच्यात कमालीचे साम्य आहे. “दोघेही सत्ता मिळविण्यासाठी लोकशाही प्रक्रियेचा मार्ग अवलंबितात,” असे ते म्हणाले. राहुल गांधी काय बोलत आहात आपण? आपल्या जिभेला काही हाड आहे की नाही? संघाची एका दहशतवादी संघटनेशी तुलना करून राहुल गांधी यांनी अक्षम्य अपराध केला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केली. या प्रकाराबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

आपल्या या विदेश दौऱ्यात राहुल गांधी यांनी लोकसभेतील अविश्वास ठरावावर बोलताना जे मुद्दे मांडले होते तीच ‘टेप’ परत तेथील मंडळींना ऐकवली. राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष आपल्या ‘कर्तृत्वा’ने आज रसातळाला गेला आहे. जनतेने त्या पक्षास आपली जागा दाखवून दिली आहे. एकेकाळी संपूर्ण देशावर सत्ता गाजविणाऱ्या या पक्षाची अवस्था आज केविलवाणी आहे. संघ परिवारास लाखोली वाहून काँग्रेसच्या शिडात हवा भरली जाणार नाही, हे राहुल गांधी यांना कोणीतरी सांगायला हवे! आपल्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी आगामी निवडणुकीत भाजपला हरविण्यास आपले प्राधान्य असेल, असे म्हटले. भारतातील लोकशाही संस्थांवर जे हल्ले होत आहेत ते रोखण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असेल, असेही ते म्हणाले. पंतप्रधानपदी असताना त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी लोकशाही संस्थांवर कसा घाला घातला होता, हे राहुल गांधी यांनी जरा आठवावे. लोकशाही संस्थांवर घाला घातल्यामुळेच ‘सिंहासन खाली करो, की जनता आयी है,’ अशी गर्जना करणाऱ्या लोकशाहीप्रेमी जनतेच्या झंझावातापुढे इंदिरा गांधी यांचा टिकाव लागला नाही आणि त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. राहुल गांधी, आपण हा सगळा इतिहास विसरलात का? लोकशाही वाचविण्यासाठी त्यावेळी कोण आघाडीवर होते? संघ परिवारातील नेते आणि कार्यकर्ते यांनी केलेले परिश्रम. भोगलेल्या यातना, सोसलेला कारावास यांमुळे देशात लोकशाहीची पुनर्स्थापना झाली, हे देशातील सर्व जनता जाणून आहे. त्यामुळे आपण, ’साप साप’ म्हणून उगाच भुई थोपटत आहात, हे जनता जाणून आहे. हातात सत्ता नसल्याची अस्वस्थता आपल्या अशा मळमळीतून बाहेर पडते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना आपल्या सरकारने केलेल्या कामाची आधीच्या काँग्रेस राजवटीशी केलेली तुलना काँग्रेसला चांगली झोंबलेली दिसते. गेल्या ७० वर्षांत विकास झाला नाही, असे म्हणणे हा देशातील प्रत्येक व्यक्तीचा अपमान असल्याचे सांगून त्यांनी सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात असे कोणी म्हटले होते का? मोदी यांनी चार वर्षांत जे काम केले, ते पाहून जी अस्वस्थता काँग्रेस नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे, ती राहुल गांधी यांच्या मुखातून बाहेर पडली, इतकेच या बाबतीत म्हणता येईल. लंडन दौऱ्यात त्यांनी नेहमीच्या आरोपांबरोबरच देशातील न्यायसंस्था, निवडणूक आयोग आणि रिझर्व्ह बँक या घटनात्मक संस्थांच्या चिंध्या करण्यात आल्याचा आरोप केला. खरेच अशी स्थिती आहे? का उगाच काहीही आरोप करीत सुटायचे?

 

राहुल गांधी यांचा हा विदेश दौरा हा त्यांची स्वत:ची आणि काँग्रेस पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी होता, हे उघडच आहे. त्यात त्यांना किती यश मिळाले ते त्यांनाच माहीत! पण, स्वत:स ‘शॅडो प्राइम मिनिस्टर’ समजून चालणाऱ्या राहुल गांधी यांचा वकूब काय आहे, हे या निमित्ताने जनतेला कळून आले. केवळ दुसऱ्याला नावे ठेवली की, आपण चांगले ठरत नाही. त्यासाठी काही ठोस करून दाखवावे लागते. काही कर्तृत्व न दाखविता बडबड केली की, त्याद्वारे केवळ बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन होते!

9869020732

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@