एक वर्षानंतर गोलाणीत पुन्हा दुर्गंधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |

प्रभारी आयुक्तांना जमते, ते पूर्णवेळ अधिकार्‍यांना का जमू नये?
आयुक्त साहेब, जळगावकरांना द्यावे लागतेय समस्यांना तोंड

 
केवळ जिने, पायर्‍यांची स्वच्छता काय कामाची?
जळगाव :
गोलाणी मार्केटमधील अस्वच्छतेबाबत एक वर्षांपूर्वी कथित तक्रारीची दखल घेत प्रभारी आयुक्तांनी धडक कारवाई करीत संपूर्ण मार्केट चकाचक केले होते. पण बरोबर एक वर्षानंतर पूर्णवेळ आयुक्तांचे मात्र, मार्केटमधील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून, येथे पुन्हा एकदा दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या जाणवू लागली आहे.
 
 
गोलाणी मार्केटमधील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेल्या धोक्याबाबत एक वर्षांपूर्वी शरद काळे या व्यक्तीने जळगाव प्रांत अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी धडक कारवाईचे आदेश देत संपूर्ण मार्केटची सफाई केली होती. त्यासाठी महापालिकेची अख्खी यंत्रणा कामाला लावली होती. या कारवाईचे जळगावकरांनी स्वागत केले होते. नंतर मार्केटमधील सफाईचा मक्ता देण्यात आला. या कारवाईला एक वर्ष पूर्ण झाले असून, महापालिकेतही पूर्णवेळ आयुक्त लाभले आहेत. मात्र, प्रभारी आयुक्तांनी मार्केट स्वच्छ करण्यात दाखविलेली तत्परता, संवेदनशीलता आता कुठे तरी हरवल्यासारखी वाटते. केवळ जिने व पायर्‍या झाडून मार्केटची स्वच्छता होते का? असा सवाल उपस्थित होत आहे.
 
 
मार्केटमधील प्रत्येक मजल्यावर महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहे आहेत. पण यातील बहुतेक तुंबलेली वा घाण आहेत. त्यामुळे येणारी दुर्गंधी मार्केटमधील गाळेधारक आणि मार्केटमागील रहिवासी यांना कमालीची हैराण करते. केवळ एका स्वच्छतागृहाचा ठेका देण्यात आलेला आहे. अस्वच्छ असलेल्या स्वच्छतागृहात माशा, डास मोठ्या संख्येने आहेत.
 
 
त्यामुळेही रोगराई पसरण्याचा धोका आहे आणि हाच मुद्दा एक वर्षापूर्वीच्या तक्रारीत शरद काळे यांनी मांडला होता. रहिवाशी गाळ्यांमधील बाथरूम व संडासच्या आऊटलेटचे पाईप फुटलेले आहेत. त्यांची दुरुस्ती आजपर्यंत करण्यात आलेली नाही. त्यामुळे मारुती मंदिराच्या मागे असलेल्या भागात मार्केटमधील जिन्यांवर पाणी साचलेले असते. एक वर्षापूर्वी काढण्यात आलेले जाहिरातीचे अतिक्रमित फलक आज पुन्हा मार्केटमध्ये लागलेले दिसत आहेत. कारवाईत शहाळे विक्रेत्यांना हटविण्यात आले होते. ते गटारीत शहाळी टाकत असल्याने पाणी तुंबत असल्याची तोंडी तक्रार आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनीही केली होती. या विक्रेत्यांचे दुकान पुन्हा सुरू झाले आहे.
 
 
मार्केटच्या मागील बाजूस अग्निशमन कार्यालयाच्या गल्लीत कायमच इतकी दुर्गंधी येत असते की, त्या बाजूने असलेल्या गाळ्यांमध्ये बसणे गाळेधारक व ग्राहकांनाही कठीण होते. येथे ठेवलेल्या कचराकुंडीतील कचरा कुजून त्याची दुर्गंधी सुटते की गटार तुंबलेली आहे की फुटलेल्या आऊटलेटमुळे ही समस्या उद्भवली आहे याचा शोध घेऊन त्यावर आयुक्तांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
 
 
मार्केटमधील लोखंडी रेलिंग तुटलेले आहेत. त्यामुळे एखादी व्यक्ती खाली पडून जखमी झाल्यास अथवा अन्य काही दुर्दैवी घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणावर असेल? गाळेधारक महापालिकेला कर भरताहेत याची जाणीव आयुक्तांना आहे का? थंडगार एसी केबिनमध्ये बसून आयुक्त आणि आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी डुलक्या काढण्यात व्यस्त असल्यानेच वारंवार ही स्थिती उद्भवतेय का? असा प्रश्‍न जनमानसात उपस्थित होत आहे. आयुक्तांनी डोळसपणे मार्केटमधील समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जळगावमध्ये गाळेप्रश्‍नांच्या व्यतिरिक्त इतरही प्रश्‍न आहेत याचे भान महापालिका प्रशासनाने ठेवणे गरजेचे आहे.
प्रभारी आयुक्तांकडे जिल्हाधिकारी पदाचाही कार्यभार होता. त्याअर्थी त्यांचे कार्यक्षेत्र बरेच मोठे होते. संपूर्ण जिल्हा आणि महापालिकेचा कारभारही त्यांना पाहावा लागत होता. तरीही त्यांनी शहरासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आणि ते प्रत्यक्षात आणले. पूर्णवेळ आयुक्तांवर केवळ महापालिकेची जबाबदारी आहे. तरीही शहरवासियांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. त्यामुळे जे प्रभारी आयुक्तांना जमते ते पूर्णवेळ आयुक्तांना का जमू नये, असा सवालही आता जनमानसात उपस्थित होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@