दोन पैशांचा तमाशा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2018
Total Views |


 

 

एका राष्ट्रीय पक्षाचा मिळालेला वारसा पूर्ण तयारीनिशी नेस्तनाबूत करण्याच्या कामात पुढे पुढे चाललेल्यांकडून निराळे काही होणार नाही, हेही खरेच म्हणा! राहुल गांधींची बेताल बडबड अजूनही थांबलेली नाही, तर ती पुढे- पुढे जात शेजारच्या चिनी राजवटीचे गोडवेही गाऊ लागली.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राहुल गांधींची वाचाळतासातवें आसमानपर गेल्याचे दिसते. सध्या जर्मनी आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी आपला पप्पूगिरीचा तमाशा तिथेही चालवला आणि भलतीसलती विधाने करत चर्चेत राहण्याचा खेळही खेळला. राहुल गांधींनी एखादी पुडी सोडावी आणि ती इथल्या लोकांनी डोक्यावर घेऊन मिरवावी, अशी परिस्थिती मग चार-पाच दिवस निर्माण झाली. “अनिल अंबानींना कर्जातून बाहेर काढण्यासाठी रिलायन्सला राफेलचे कंत्राट”, “सुषमा स्वराज मोदी सरकारमध्ये बेरोजगार”, “डोकलाममध्ये चिनी सैन्याचा अजूनही तळ”, “ रा. स्व. संघाचे मुस्लीम ब्रदरहूड या दहशतवादी संघटनेशी साम्य”, “नोटाबंदी, जीएसटी आणि बेरोजगारीमुळेच मॉब लिंचिंगच्या घटना”, “अल्पसंख्याकांना, मागासवर्गीयांना रोजगार मिळाल्याने इसिसप्रमाणे अवस्था”, अशी अचाट अन् अतर्क्य विधाने राहुल गांधींनी तिकडे परदेशात केली आणि इकडे गांधी कुटुंबाच्या खुशमस्कऱ्यानी त्यांची व्यवस्थित तळी उचलली. एका राष्ट्रीय पक्षाचा मिळालेला वारसा पूर्ण तयारीनिशी नेस्तनाबूत करण्याच्या कामात पुढे पुढे चाललेल्यांकडून यापेक्षा निराळे काही होणार नाही, हेही खरेच म्हणा! पण राहुल गांधींची बेताल बडबड एवढ्यावरच थांबलेली नाही, तर ती याच्याही पुढे जात शेजारच्या चिनी राजवटीचे गोडवेही गाऊ लागली. हो! नावापुरती लोकशाही अस्तित्वात असलेल्या कम्युनिस्ट चीनची शासनप्रणाली राहुल गांधींना आवडली आणि त्यांनी चीनकडून सरकार कसे चालवावे, याचे शिक्षण घेण्याची गरजही व्यक्त केली.

 

हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या पंडित नेहरूंचा विश्वासघात करत भारतावर युद्ध लादणाऱ्या चीनशी राहुल गांधींची जवळीक काही नवीन नाही. राहुल गांधींनी मागे एकदा चिनी राजदूताची गुप्तपणे भेट घेण्याची कामगिरीही केली होतीच. अर्थात राहुल गांधी आणि काँग्रेसी भाटांनी ती भेट कितीही गुप्त ठेवण्याची कसरत केली तरी त्याची माहिती चव्हाट्यावर आलीच. त्यानंतर या भेटीबद्दल राहुल गांधी आणि त्यांच्या भाटांनी मारलेल्या कोलांटउड्याही सर्वश्रुत आहेतच. आता मात्र राहुल गांधींनी लंडनमध्ये जाऊन चिनी राजवटीचा महिमा गायला असून भारताच्या पंतप्रधान कार्यालयाने त्यापासून धडा घेण्याची इच्छाही व्यक्त केली. भारतातील पंतप्रधान कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात ताकद एकवटली असून चिनी शासनप्रणालीप्रमाणे या ताकदीचे विकेंद्रीकरण व्हावे, अधिकार नष्ट व्हावेत, असे राहुल गांधींना आपल्या विधानांतून म्हणायचे आहे. मुळात ज्या राहुल गांधींना स्वतःच्या देशाचीच पुरेशी माहिती नाही, त्यांनी चीनबद्दल मतप्रदर्शन करणे म्हणजे बावळटपणाशिवाय दुसरे काय असू शकते? वर पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चिनी सत्तेचा आदर्श घेण्याची भाषा करणे म्हणजे, स्वतःच्या तोंडाने स्वतःच्याच खुळेपणाचे प्रदर्शन करणे होय. राहुल गांधी या खुळेपणाचे दर्शन देशात घडवतातच पण आता त्यांनी जगाच्या वेशीवरही ते घडवले. विशेष म्हणजे राहुल गांधींनी बोललेला शब्द झेलण्यासाठी बसलेल्या अन्गांधी घराणे कधी चुकू शकतच नाहीचा अगम्य विश्वास बाळगणाऱ्यानी त्यांची ही चिनी सरकारच्या महिमामंडनाची विधाने दाखवलीच नाहीत. असे का? दुसरीकडे ज्या चिनी सत्तेची राहुल गांधी स्तुती करताना दिसतात, त्या चिनी सत्तेच्या प्रमुखाने काही महिन्यांपूर्वीच देशातल्या सत्तेचे आणि पक्षाचेही सर्वाधिकार स्वतःच्याच हाती एकवटावेत, अशा तरतुदी केल्या आहेत, हे राहुल गांधींना माहिती नाही का? शी जिनपिंग यांच्याकडे चिनी सरकारच नव्हे तर चिनी कम्युनिस्ट पक्षाबाबत निर्णय घेण्याचेही अधिकार एकवटलेले आहेत, राहुल गांधींना भारतानेही हाच आदर्श घ्यावा, असे म्हणायचे आहे का? एवढेच नव्हे तर चीनमधील राज्य सरकारे, उद्योगधंदे, लष्कर आदी सर्वच ठिकाणी फक्त शी जिनपिंग यांचाच बोलबाला आहे, राहुल गांधींना भारतातही असेच व्हावे, असे वाटते का? राहुल गांधींना असे वाटत असेल तर ते कोणत्या लोकशाहीच्या बाता दरवेळी मारत असतात, याची कल्पनाच केलेली बरी. शिवाय अशा व्यक्तीला पंतप्रधानपदी पाहण्यास उत्सुक असणारे लोकही नेमके कोणत्या कुवतीचे असतील, हेही लक्षात येते.

 

वेडसरपणाने एखाद्या व्यक्तीला ग्रासले की, ती व्यक्ती काहीही बरळत राहते. राहुल गांधींची विधाने पाहिली की अशाच काहीही बरळणाऱ्या लोकांची आठवण येते. कारण लंडनमध्येच राहुल गांधी म्हणाले की, “भारतातील उद्योग जगताला मोदींकडून खूप काही अपेक्षा होत्या पण त्या भागवण्याऐवजी मोदींनी त्यांच्यावर सीबीआय, ईडी आदी संस्थांचा दबाव निर्माण केला.” राहुल गांधींचे हे विधान आक्षेपार्ह तर आहेच पण परदेशातील उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्यापासून परावृत्त करणारेही आहे. भारतात उद्योग-व्यवसाय सुरू केल्यास तुमच्यामागे सीबीआय, ईडीचा ससेमिरा लावण्यात येतो, असे राहुल गांधींना यातून सुचवायचे आहे. यातून जागतिक पटलावर भारताची बदनामी तर होतेच पण या खोट्या प्रचारामुळे उद्योजक, व्यावसायिकांनी भारतापासून लांबच राहावे, अशी राहुल गांधींची सुप्त इच्छा असल्याचेही जाणवते. म्हणजे असे झाले की, पुन्हा राहुल गांधी आणि त्यांचे गुलाम मोदींच्या, भाजपच्या नावाने बेरोजगारी, रोजगार आदी मुद्द्यांवरून गळे काढायला मोकळे. असा हा कावा. त्यामुळे आता खरे तर या लोकांचा हा कावा जनतेसमोर नेण्याचे, त्यांचा खरा चेहरा उघडा पाडण्याचे ध्येयच प्रत्येकाने बाळगले पाहिजे. शिवाय मोदींवर हे उद्योगधार्जिणे सरकार असल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी आपलेच शब्द खोटे ठरविल्याचेही त्यांच्या या विधानातून स्पष्ट होते. हे सरकार उद्योगधार्जिणे असते तर त्यांच्यावर सीबीआय वा ईडीमार्फत कारवाई करण्याची वेळच आली नसती, पण हे सरकार काँग्रेसी शिरस्त्याप्रमाणे उद्योगधार्जिणे नसून उद्योगानुकूल आहे आणि जो चुकेल त्याच्यावर कारवाई करणारेही आहे. त्यामुळे राहुल गांधींनी ही खूणगाठ मनाशी बांधून ठेवलेली बरी.

 

१९४७ साली स्वतंत्र झालेल्या भारतात हजारो लोकांनी काही संस्थांची उभारणी केली आणि आज त्यांच्यावरच हल्ले होत आहेत, हे आणखी एक राहुल गांधींच्या अकलेची दिवाळखोरी दाखविणारे विधान. गेल्या काही काळापासून देशातल्या निरनिराळ्या संस्थांवर स्वतःची खाजगी मालमत्ता समजून वेटोळे घालून बसलेल्यांना सरकारने बाहेरचा रस्ता दाखवला. गांधी कुटुंबीयांनी फेकलेल्या तुकड्यांवर जगणाऱ्याना हा खरे तर धक्का होता, कारण वर्षानुवर्षे मोक्याच्या जागा अडवून बसणाऱ्या आणि कर्तृत्वाच्या नावाने बोंब असणाऱ्याना अशा प्रकारे आपली हकालपट्टी होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण वेळोवेळी भारताला, भारतीय संस्कृतीला, इतिहासाला नावे ठेवणाऱ्याचे दिवस भरले आणि त्या जागी इथल्या मातीतला विचार सांगणाऱ्या, इथल्या मातीचे गुण गाणाऱ्या, इथल्या सोनेरी इतिहासाचा अभिमान बाळगणाऱ्याना स्थान देण्यात आले. हे झाले नाही तोच राहुल गांधींना हे या संस्थांवरील हल्ले वगैरे वाटू लागले. उलट नव्या नियुक्त्यांतून ७० वर्षांत आपली अक्कल गहाण टाकून काहीबाही लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या, छापणाऱ्या संस्थांना आता खरेतर आपल्या मूळ मार्गावर नेणारे इथल्या मातीशी नाळ जोडणारे नेतृत्व मिळाल्याचे स्पष्ट होते पण राहुल गांधींसारख्यांना ते कसे समजणार? ते समजत नाही म्हणूनच कदाचित राहुल गांधींना त्याविरोधात परदेशात जाऊन वाचाळपणा करण्याची लहर आली असावी, ती त्यांनी भागवली. पण या लहरींवर देश चालवता येत नसतो की, निवडणुकाही जिंकता येत नसतात. पण ते राहुल गांधींना कधी कळणार? आज राहुल गांधी वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन तिथेही रा. स्व. संघ, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच टीका करताना दिसतात. पण राहुल गांधींनी सद्यस्थितीत स्वतःच्या पक्षाची चिंता वाहण्याची गरज आहे. काँग्रेसकडे सध्या फक्त कर्नाटक आणि पंजाब या दोनच मोठ्या राज्यांची सत्ता आहे, पण राहुल गांधींना त्याची अजिबात फिकीर नसल्याचे त्यांच्या कृतीवरून दिसते. कर्नाटकात कुमारस्वामी काय करतायत, पंजाबात अमरिंदर सिंग काय करतायत, आगामी निवडणुकीला काँग्रेस कशी सामोरी जाणार याची रणनीती राहुल गांधींनी ठरवणे अपेक्षित आहे. पण हा इसम इकडे-तिकडे फिरून फक्त केंद्र सरकारची निंदानालस्ती करण्यातच मग्न आहे, त्यांना सल्ला देणारेही गांभीर्याने या गोष्टींचा विचार करताना दिसत नाहीत. राहुल गांधींना संघ-भाजपवर तोंडसुख घेण्यातून वेळ मिळाला तर त्यांनी याचा नक्कीच विचार करावा; अन्यथा पराभवाची दारे त्यांच्यासाठी सताड उघडी असतील, हे नक्की.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@