शिव इतिहास जगणारे ‘आप्पा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2018
Total Views |


 

 

कोणताही तर्कवितर्क न लावता, केवळ शिवकालीन पत्रे व पुराव्यांच्या आधारांवर आप्पा इतिहास सांगतात. त्यांच्या तोंडून शिवशौर्य ऐकताना ते चित्रच जणू आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते.
 

गिरणी कामगार ते शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक असा संघर्षात्मक प्रवास बाळकृष्ण परब उर्फ आप्पा यांनी केला. कोहिनूर मिलमध्ये ते कारकून म्हणून कार्यरत होते. त्या काळात झालेल्या गिरणी कामगारांच्या संपामुळे आप्पांना आपली नोकरी गमवावी लागली. पण वयाच्या दहाव्या वर्षापासून आप्पांना गड-किल्ल्यांचे प्रचंड आकर्षण होते. शिवरायांबद्दल त्यांना नितांत आदर असल्याने त्यांनी गडभ्रमंतीच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले. तसेच गिर्यारोहण करण्यास सुरुवात केली. त्याकाळी आजच्याएवढे तरुणांमध्ये  'ट्रेकिंगचे फॅड' नव्हते. पण आप्पांमुळे अनेक तरुणांमध्ये गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

शिवाजी महाराजांविषयीच्या प्रेम आणि आदरामुळे आप्पांनी हळूहळू शिवकालीन इतिहासाचा अभ्यास सुरू केला. ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन सुरू केले. गड-किल्ल्यांवर आप्पांनी शिवस्तुती गायला सुरुवात केली. त्या-त्या गडावर गडाचा इतिहास माहिती सांगण्यास सुरुवात केली. गड-किल्ले अभ्यासायला त्यांनी अनेकांना शिकवले. लोकांमध्ये एकप्रकारे शिवरायांच्या कार्याविषयी जनजागृतीच त्यांनी घडवून आणली. त्यांची ही गडभ्रमंती केवळ इथेच थांबली नाही, तर पुढे जाऊन आप्पांनी आपल्या लिखाणातून शिवचरित्राचे अष्टपैलू उलगडण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील रानडे रोडवर आप्पा स्वत: शिवकालीन पुस्तकांच्या विक्रीसाठी बसायचे. तेथे आप्पांना भेटण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी अनेकजण यायचे. आप्पांच्या या जनजागृतीचा परिणाम असा झाला की, त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून लोकांना गडसंवर्धन करावेसे वाटले. कित्येक गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी आप्पा हे प्रेरणास्थान ठरले.

 

शिवकालीन नाण्यांविषयीही आप्पांचा खूप गाढा अभ्यास आहे. परंतु ही नाणी जोपासणे खूप खर्चिक असल्याने उत्पन्न कमी असल्याने आप्पांना हा अभ्यास पुढे सुरू ठेवता आला नाही. आज आप्पा ७९ वर्षांचे आहेत. आजवर तीन पिढ्यांना आप्पांनी गड-किल्ल्यांविषयी माहिती दिली आहे. आप्पांच्या मते, शिवाजी महाराज हे एक स्वयंप्रकाशित सूर्य आहेत. असा लोककल्याणराजा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला, याचा आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा. आप्पा आज अनेकांचे आदर्श बनले आहेत. परंतु त्यांचा आदर्श शिवराय आहेत. सर्वांनी आपल्या उभ्या आयुष्यात किमान एकदा तरी शिवचरित्र वाचावे, असा सल्ला आप्पा देतात.

 

शिवाजी महाराजांनी नेहमीच स्त्रियांचा सन्मान केला आहे. या गोष्टीमुळे त्याकाळी शत्रूलाही शिवाजी महाराजांचे कौतुक करण्याचा मोह आवरला नव्हता. शिवकाळात जशी हिरकणी होती, आपल्या बाळासाठी जीवाची बाजी लावणारी, शूर धाडसी व्यक्तिमत्वाची तसेच आजच्या स्त्रियांनीही शूर व्हायला हवे, त्यांना स्वत:चे संरक्षण स्वत: करता यायला हवे. असे विचार आप्पा मांडतात. आप्पा कधीच लोकांना त्यांनी काय करावे? कसे वागावे? हे सांगत नाहीत, तर ते स्वत:च्या वर्तणुकीवर जास्त भर देतात. ”काही घ्यायचे असेल, तर शिवाजी महाराजांचे विचार घ्या!“ असे त्यांचे आजच्या युवापिढीला सांगणे आहे

 

एक राजा आपल्या ५० वर्षांच्या आयुष्यात काय करू शकतो? याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांनी त्याकाळी एकूण ५०० लढाया लढल्या. त्यापैकी २२० लढायांमध्ये ते स्वत: जातीने रणांगणावर लढले होते. शिवाजी महाराजांनी कधीही धर्म, जात-पात या बाबतीत भेद केला नाही. पण आज जातीच्या मुद्द्यांवरून लोक आपापसात भांडतात, हे मात्र पाहावत नाही, अशी खंत आप्पांनी बोलून दाखवली. शिवाजी महाराजांनी वापरलेली युद्धनीती, गनिमीकावा यांचा अभ्यास आज परदेशातील लोक करत आहेत. मग आपण महाराजांकडून काहीच शिकवण घेऊ नये का? असा सवाल आप्पा आवर्जून करतात.

 

आप्पांना त्यांच्या स्वत:विषयी बोललेले, त्यांच्या कार्याची स्तुती केलेली अजिबात आवडत नाही. स्तुती करायचीच असेल, तर शिवस्तुती करा! आदर्श ठेवायचा असेल, तर तो शिवाजी महाराजांचा ठेवा. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वातील एक जरी गुण आपण घेऊ शकलो, तरी आपले आयुष्य हे सुकर होईल. हेच ते वेळोवेळी सांगत आले आहेत.

 

कोणताही तर्कवितर्क लावता, केवळ शिवकालीन पत्रे पुराव्यांच्या आधारांवर आप्पा इतिहास सांगतात. त्यांच्या तोंडून शिवशौर्य ऐकताना ते चित्रच जणू आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. आप्पांनी आजवर शिवगाथा सांगणारी ३० पुस्तके लिहिली आहेत. शिवाजी महाराजांनी घडवलेला इतिहास आप्पा स्वत: जगले आहेत.

 

- साईली भाटकर

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@