'सोशल मीडिया' आणि 'सामाजिकता'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2018
Total Views |



 

भारतात सोशल मीडियामध्ये सक्रीय राहणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या आंदोलन आणि चळवळींमधून ते स्पष्टपणे दिसून आले. वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रांती घडून आली, हे आपण जाणतोच.

 
इजिप्तमध्ये झालेली क्रांती आणि त्यानंतर संपूर्ण मध्यपूर्व देशांमध्ये झालेली क्रांती ही सोशल मीडियाचाच परिपाक होती. महाराष्ट्रातही मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनांमध्येही सोशल मीडियामधील प्रचार-प्रसार प्रकर्षाने दिसून आला. फेसबुक, व्हॉट्सअॅप व्यतिरिक्त स्नॅपचॅट किंवा लाईव्ह चॅट आणि इतरही वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून युजर्स एकमेकांशी जोडलेले असतात आणि त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढविण्यास हातभार लागतो. त्यातही पुन्हा आंदोलनाची दाहकता वाढविण्यासाठी सोशल मीडियावर भीतीदायक वातावरणाची निर्मिती करणे, अफवा पसरविणे हे आता नित्यनियामाचे झाले आहे. मात्र, यामुळे समाजात एका प्रकारची अराजकता आणि धार्मिक-सामाजिक तेढ निर्माण होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

वेगवेगळ्या जातीसमुदायाचे वेगवेगळे गट हे पूर्वीपेक्षा अधिक सक्रीय झालेले आता दिसतात आणि हेच भारतासारख्या विविध धर्म, भाषा, प्रांत, जात, वंशाने नटलेल्या देशासमोर मोठं आव्हान ठरू शकते, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे एकूणच ‘सोशल मीडिया’ आणि ‘सामाजिकता’ असा थोडासा विचार या संदर्भात होणे आवश्यक आहे.
 

सोशल मीडिया किती ‘सोशल’?

 

जागतिकीकरणानंतर सर्वार्थाने माध्यम क्षेत्रात आमूलाग्र क्रांती झाली. त्यात भर घातली, ती माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीने. त्याचेच नवीन रूप किंवा अपत्य म्हणजे सोशल मीडिया. जगातील अविकसित-विकसनशील राष्ट्रांमध्ये सोशल मीडिया विषयीची उत्सुकता आता प्रत्यक्ष वापरामध्ये बदलली आहे. अर्थातच, त्याला स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे माध्यम तंत्रज्ञान हे ही तितकेच कारणीभूत आहे. एकूणच आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमध्ये या सोशल मीडियाला खूप महत्त्व आले आहे, असे आपण म्हणू शकतो.
 

सोशल मीडियाचा वापर करणारा उपभोक्ता

 

पूर्वी माध्यम साक्षरता’ हा एक खूप मोठा महत्त्वाचा विषय होता. अनेक अशी माध्यमे होती की, ज्यांचा वापरच सर्वसामान्य लोकांना सहजासहजी करता येत नसे. त्यात भारतासारख्या देशात जिथे पूर्वी साक्षरतेचेच मुळात प्रमाणही कमी होते, तिथे साहजिकच माध्यम साक्षरतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतेच. पण, कालांतराने यात खूप झपाट्याने बदल झाले. ‘माध्यम क्षेत्रा’च्या क्रांती बरोबरच ‘माध्यम साक्षरते’च्या बाबतीतही क्रांती घडून आली, असे आपण म्हणू शकतो. पूर्वी काही विशिष्ट वर्गांपर्यंत मर्यादित असणारे माध्यमांचे ज्ञान आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. पूर्वी जेव्हा टीव्ही आला, तेव्हा तो फक्त श्रीमंतांच्या घरी होता. कलर टीव्ही तर नक्कीच केवळ श्रीमंतांच्याच घरचाच केवळ भाग होता. मात्र, आता अगदी गोरगरिबांच्या घरीसुद्धा कलर टीव्ही आढळतो. टेलिफोन ज्यावेळी भारतात आला, तेव्हा तो सुरुवातीला केवळ श्रीमंतांच्या घरी आणि नंतर उच्च मध्यमवर्गीय आणि नंतर मध्यमवर्गीय असा फोनचा प्रवास... मोबाईल फोनचीही कथा ही काही वेगळी नाही. मात्र, आता या सगळ्याच गोष्टी समाजातील सर्वच स्तरांतील लोकांना सहज उपलब्ध झाल्या आहेत. त्यात पुन्हा युवा वर्ग हा अशा प्रकारच्या माध्यमांची हाताळणी करण्यामध्ये अग्रेसर असायचा. मोबाईलची हाताळणी ही आजही चांगल्या पद्धतीने किंवा व्यापक प्रमाणात केली जाते. त्याच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा वापरसुद्धा युवा वर्गाकडून होतो, यात काही शंका नाही. आता प्रत्येक वयोगटातील माणूस मोबाईलचा आणि पर्यायाने सोशल मीडियाचा वापर करता आहे, असे आपण म्हणू शकतो. मोबाईल नेटवर्कच्या क्षेत्रामध्ये काही कंपन्यांनी आता मोफत 4-जी तंत्रज्ञान आणि नंतर अल्प दरात 4-जी तंत्रज्ञान पोहोचवल्यामुळे आता अनेक लोकांपर्यंत या माध्यमांची पोहोच वाढली आहे. त्यामुळे त्याचा समाजावर होणारा परिणामदेखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढलोला दिसतो. म्हणजे, काही दिवसांमध्ये भारतामध्ये सोशल मीडियाचा वापर करणार्‍यांमध्ये झपाट्याने प्रगती झाली आहे. तंत्रज्ञानविषयक बातम्या देणारी वेबसाईट ‘द नेक्स्ट वेब’ यांनी गेल्या वर्षाच्या जुलैमध्ये त्यांच्या एका अहवालामध्ये असे सांगितले की, फेसबुकचा वापर करणार्‍यांमध्ये भारताने अमेरिकेला ही मागे टाकले आहे आणि हे खरे आहे. भारतामध्ये २५ कोटींपेक्षा जास्त लोक आता फेसबुकचा वापर करतात. अर्थात, त्यातले बरेचजण दैनंदिन फेसबुकचा वापर करतात असे नाही. म्हणजे जवळपास २० कोटी भारतीय हे महिन्यातून एखाद-दुसऱ्या वेळी फेसबुक वापरतात. मात्र, या संख्येमध्येसुद्धा बदल होत चालले आहेत. आकडेवारी सोडल्यास आपल्या सर्वसामान्य माणसांच्यासुद्धा निरीक्षणातून लक्षात येते की, भारतामध्ये सोशल मीडियाचा वापर करणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यापैकी फेसबुक आणि व्हॉट्सअॅप तर आपल्या दैनंदिन जीवनाचा अनिवार्य-अविभाज्य भाग झाले आहेत. फक्त महानगर नाही, तर अगदी छोट्या-मोठ्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांपर्यंत याची पोहोच आणि उपलब्धता वाढली आहे.

 

सोशल मीडियाचे वापरकर्ते, त्यांचे महत्त्व आणि वास्तव

 

आता ज्यावेळी आपण असे म्हणतो की, भारतामध्ये २५ कोटी लोक फेसबुकचा वापर करतात, तेव्हा समजा अगदी एक चर्तुर्थांश लोक हे दैनंदिन फेसबुकचा वापर करतात. तरी ही संख्या पण काही कमी नाही. त्याखेरीज फेसबुकवरती जुळलेले लोक, हे त्याच्याबरोबर जुळलेल्या लोकांबरोबरसुद्धा आपले अनुभव, त्यावरची माहिती इतरांबरोबर शेअर करतात हेदेखील महत्त्वाचे आहे. म्हणजे, आकडेवारीप्रमाणे समजा सहा-सात कोटी भारतीय दैनंदिन फेसबुकचा वापर करतात तरी या सहा-सात कोटी लोकांचे कुटुंबीय जे स्वतः फेसबुक वर नाहीत तेसुद्धा अप्रत्यक्षपणे त्याचा उपभोग घेत असतात किंवा त्यांनासुद्धा त्याचा फायदा होत असतो, असे आपण नक्कीच म्हणू शकतो. स्वत:चा व्यवसाय, कार्यालय, महाविद्यालय, शाळा, विशिष्ट जाती, धर्म, भाषा, विचार, राजकीय पक्ष इत्यादींशी निगडीत असे वेगवेगळे समूह किंवा कम्युनिटी यासुद्धा सोशल मीडियावर विकसित झालेल्या असतात आणि ज्याप्रमाणे आपण एखाद्या कॉलनीत राहतो आणि विचारांचे, माहितीचे आदानप्रदान होत असते, वैयक्तिक गोष्टी कळत असतात अगदी तसेच या कम्युनिटीवरून ही विचारांचे आदानप्रदान होते. भारतासारख्या देशात लोकतंत्राचा विकास झालेला नाही, अशा देशामध्ये अजून सर्वसामान्य नागरिकांची ओळखसुद्धा पूर्णतः शाश्वत असेल का, याची अजून पूर्ण खात्री देता येत नाही. त्यानंतरही येथील व्यक्ती स्वतःची धार्मिक, जातीय, सांस्कृतिक, भाषिक किंवा भौगोलिक ओळख हीच आपली प्राथमिक ओळख समजतो आणि त्यानुसारच तो कार्य करतो. ज्याला आपण ‘भारतीय’ असा समाज म्हणतो, तर तो हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या समुदायांमध्ये विभागणी झालेला आहे, असे आपण म्हणू शकतो. अनेक धर्म, वंश, जात, वर्ण, पंथ या सगळ्यांचे वेगवेगळे असे गट भारतीय समाजात दिसतात. त्यामुळे सोशल मीडियावरसुद्धा अशा प्रकारचे गट दिसून येतात आणि हे त्यामागचे एक खूप मोठे वास्तव आहे, असे आपण म्हणू शकतो.
 
 
सोशल मीडिया संवाद

 

सोशल मीडियाने एक महत्त्वाचे कार्य हे केले आहे की, या वेगवेगळ्या अशा समुदायात संवादाचे एक सशक्त माध्यम उपलब्ध करून दिले आहे आणि ज्यामुळे भौगोलिकदृष्ट्या विभागणी असलेले लोक एकत्र येतात. अर्थात, त्यामुळे आधीपासून असलेली वेगवेगळी जाती-प्रथा आणखी जास्त सशक्त होते, असेसुद्धा आपण म्हणू शकतो. पूर्वी लग्नासाठी हे लोक ओळखीमध्ये, नात्यागोत्यांमध्ये किंवा मित्रांना सांगून नाती आणली जायची आणि त्यामुळे त्या नात्याला एक विशिष्ट मर्यादा होती आणि आंतरजातीय विवाहसुद्धा मोठ्या प्रमाणावर होत होते. कारण स्वतःच्या जातीत योग्य स्थळ मिळाले नाही, हे कारण असायचे. आता थेट कम्युनिटीवर आधारित ज्या साईट असतात ते किंवा स्वतःच्या जातींच्या हितांना घेऊन राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर वेगवेगळे समूह तयार होऊन त्यांची वेगवेगळी आंदोलनसुद्धा उभी राहतात आणि त्यामुळे कोणत्याही देशाच्या लोकशाहीत तुम्हाला तुमच्याच जाती समूहाशी निगडीत लोकांशी बोलायचे असेल किंवा त्यावरच गर्व बाळगायचा असेल, तर ते त्या लोकशाहीसाठी तारक ठरतो, असा इतिहास आहे. भारतामध्ये आधीच आपला समाज जाती आणि धर्माच्या आधारावर खूप मोठ्या प्रमाणावर विभागलेला आहे, हे आपल्याला माहिती आहेच. त्यामुळे सोशल मीडियावरती जाऊन आपण आपल्या प्रतिगामी विचारांनाच जर आणखीन विकसित करीत आहोत किंवा ते इतरांपर्यंत पोहोचवत आहोत, तर त्यामुळे लोकं जास्त आक्रमक होऊन आणि जाती किंवा धर्माशी आणखीन जास्त जोडले जाण्याची भीती आहे. त्यामुळे देशात अराजकता, अशांतता निर्माण होऊ शकते असा नक्कीच धोका दिसून येतो. विचारांची लोकशाही ही तेव्हाच यशस्वी होऊ शकते, ज्यावेळी फक्त माहितीच्या संबंधी लोकशाही नाही, तर प्रत्येकाकडे आणि योग्यरित्या पोहोचवाला हवी, तरच ‘विचारांची लोकशाही’ निर्माण होईल.
- प्रा. गजेंद्र देवडा 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@