स्वावलंबनाचा संस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2018
Total Views |




 


शिक्षकांच्या एका गटाबरोबर गप्पा मारताना विषय ‘गुरुकुल’ पद्धतीकडे वळला. यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या फायद्यांची चर्चा झाली. वयाच्या आठव्या वर्षी व्रतबंध संस्कार करून मुलांना गुरुगृही पाठवले जाई. त्यानंतर दहा-बारा वर्षे तिथेच राहून विद्यार्थी ज्ञान संपादन करत. परंपरेने चालत आलेले ज्ञान तर मिळतच असे पण त्याचबरोबर ही मुले जीवनावश्यक कौशल्ये किती सहजगत्या शिकत असतील याचाही आम्ही विचार केला. स्वतःच्या दैनंदिन कामांची जबाबदारी घेण्यापासून गुरुगृही पडेल ते काम करण्यातून जे शिक्षण त्यांना मिळत असेल ते किती आवश्यक आहे! धर्म-जातनिरपेक्षित अशा या व्रतबंध संस्कारातील विविध कृती मुलांना खऱ्या अर्थाने विद्यार्थीदशेकडे मार्गस्थ करण्याच्या उद्देशाने योजलेल्या आहेत. आजच्या काळात मुलांना गुरुकुलात पाठवण्याची पद्धत बंद झालेली असली तरी अजूनही मुंज हा संस्कार अनेक कुटुंबांतून केला जातो. त्याला किती उत्सवी स्वरूप द्यायचे हा प्रत्येक कुटुंबाच्या हौसेचा विषय आहे. परंतु केवळ तेवढ्यावरच न थांबता, या संस्काराचा उद्देश काय? त्यानंतर मुलांकडून व पालकांकडून काय अपेक्षित आहे? याची माहिती जाणीवपूर्वक घेणे आणि त्यातील महत्वाच्या गोष्टी कालानुरूप अंगिकारणे आवश्यक आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
 
 
सात वर्षाचा आहे पण भरवल्याशिवाय अजूनही जेवत नाही. आता चौथीत आहे. हिचा होमवर्क मीच करून घेते. मी शेजारी बसल्याशिवाय अभ्यासाला हातही लावत नाही. माझ्या बारा वर्षाच्या मुलाला मलाच घालावी लागते आंघोळ. नाहीतर घाईघाईत चेहेरासुद्धा नीट धूत नाही. दोन चौक ओलांडावे लागतात वाटेत. सहावीत आहे आता, पण शाळेत एकटीला पाठवायला भीती वाटते बाई मला. नववीपासूनच त्याच्या अभ्यासासाठी घरात आम्ही खूप काळजी घेतो. त्याची वेगळी खोली, एसी, लॅपटॉप, इंटरनेट आहे; पाहुण्यांना पण आम्ही शक्यतो बोलावत नाही घरी. अशी अनेक ‘ओव्हरप्रोटेक्टिव्ह’ पालकत्वाची उदाहरणे समुपदेशन करताना समोर येतात. याबरोबर बहुतांश वेळेला ‘इतके करूनही मुले जबाबदारी घेत नाहीत’ हा सूरही लावला जातो. अनेकदा मुलांना ‘बघा आम्ही किती करतो तुमच्यासाठी पण तुम्हाला त्याची किंमत नाही’ हेदेखिल वारंवार ऐकवले जाते. संवादाचा प्रवास याच दिशेने चालत राहिला तर एखादा टीनएजर त्या अवघड वयाच्या टप्प्यावर मी सांगितलं होतं का मला जन्माला घाला म्हणून? असे विचारायला कमी करत नाही. असा प्रश्न पालकांना विचारणे हे नक्कीच उद्धटपणाचे आहे. परंतु त्याची बीजे बालपणापासून पालक मुलांशी ज्या प्रकारे संवाद साधतात त्यात तर नाहीत ना? हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

 
‘The greatest gifts, you can give to your children, are the roots of responsibility and the wings of independence’. हे डेनिस वेटलीचे वाक्य सुंदर संदेश देते. ‘मुलांना पूर्णपणे स्वावलंबी बनवणे’ हे पालकांचे अंतिम उद्दिष्ट आहे. स्वावलंबनाची प्रक्रिया मुलांच्या लहानपणापासून हळूहळू घडत जायला हवी. मुलांचे वय व समज लक्षात घेऊन त्यांना कोणकोणत्या जबाबदाऱ्या घेता येतील हे जाणणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे जबाबदाऱ्या मुलांवर टाकणे, त्यांना लागेल तेवढीच मदत करणे व त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करणे हा प्रवास सातत्याने होत रहायला हवा. मुले सुरुवातीला चुका करत, खूप वेळ लावत, सांडलवंड करत, अर्धवटपणे कामे करतील. पण त्यातूनच स्वावलंबन शिकतील. या माध्यमातून स्वतःच्या शरीराची, दिनक्रमाची, कामांची, वस्तूंची जबाबदारी घ्यायला मुले शिकतात. पुढे जाऊन घराच्या, कुटुंबाच्या, शाळेच्या, समाजाच्या जबाबदारीमध्ये वाटा उचलण्याचे संस्कारही घडत जातात.

 

आम्हाला जे मिळाले नाही ते सगळे आमच्या मुलांना मिळायला हवे.’ हा विचार करून स्वतः खस्ता खात मुलांपुढे भौतिक सुखांच्या राशी ठेवणे ही पालकत्वाची एक बाजू. त्याच्या सोबतीने ‘आम्हाला जे मिळाले ते आमच्या मुलांना मिळायला हवे.’ हा विचारही अंगिकारायला हवा. कमतरतेतून करावी लागलेली काटकसर, एकत्र कुटुंबातील संवेदना, रोज नेमून दिलेल्या कामांचे नियोजन, पाहुण्यांसाठी/शेजाऱ्यांसाठी करावी लागलेली तडजोड अशा गोष्टींतून मिळालेले शिक्षण जीवनावश्यक कौशल्यांना पूरकच नाही का?
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

- गुंजन कुलकर्णी

बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ

नाशिक

@@AUTHORINFO_V1@@