स्वयंसेवक अटलजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2018
Total Views |




 


अटलजींची संघाबद्दलची आत्मियता मी पाहत होतो. सत्तरच्या दशकात बालस्वयंसेवक असताना आणि २००६ साली प्रांत प्रचारक असताना मला अटलजींचा स्वयंसेवकाचा भाव अनुभवता आला. जनसंघाचे अध्यक्ष असताना, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाजपची उभारणी करताना आणि पंतप्रधानपद भूषविल्यानंतरही अटलजींच्या ठायी संघाबद्दल आत्मीयता भाव होता. ते स्वयंसेवकच होते.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान झाले. १९९८ साली पोखरण येथे अणुचाचण्या करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. या अणुचाचण्या म्हणजे देशाच्या आण्विक सामर्थ्याची गर्जना होती. अण्वस्त्रांची क्षमता म्हणजे लष्करी सामर्थ्याची निर्णायक क्षमता. भारताचे बळ जगाला दाखवून देण्याचा हा निर्णय होता. अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत देशाच्या अर्थव्यवस्थेला नवे वळण मिळाले. देशाने जागतिक आर्थिक सत्ता होण्याच्या दिशेने भक्कम पावले टाकली. इतक्या मोठ्या सत्तापदावर पोहोचलेले अटलजी निस्सिम स्वयंसेवक होते. राजकारणात अफाट यश मिळविले, जनसंघ सांभाळला आणि भारतीय जनता पक्षाला यशस्वी केले तरी त्यांचा पिंड स्वयंसेवकाचाच राहिला१९३७-१९४३ या काळात ग्वाल्हेरमध्ये प्रचारक म्हणून काम करणार्‍या नारायणराव तरटे यांनी अटलजींना संघाच्या संपर्कात आणले. नारायणरावांच्या प्रयत्नांमुळे अटलजींसोबत वाजपेयी बंधू संघशाखेवर येऊ लागले आणि अटलजी संघाचे निष्ठावंत बनले. अटलजींच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत आणि विविध क्षेत्रातील लोकांना ते आपले वाटतात, कारण त्यांचा पिंड स्वयंसेवकाचाच होता, असे मला अनुभवावरून वाटते.

 

प्रसंग सत्तरच्या दशकातला आहे. अटलजी त्यावेळी जनसंघाचे अध्यक्ष होते. तेव्हा मी आठवीत असेन. अटलजी नागपूरला शिवाजीनगरला जनसंघाच्या नेत्यास भेटण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. संध्याकाळची वेळ होती. तेव्हा नागपूर जनसंघाकडे जीप होती. त्या जीपने ते आले. जीपचे चालक आमच्या गांधीनगर संघ शाखेत आले. प्रार्थना झाल्यावर आम्हा बाल-किशोरांजवळ आले व त्यांनी विचारले की, “तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी यांना भेटायचे आहे का?” आम्ही “हो” म्हणालो. आमच्या पैकी आठ-दहाजणांना त्यांनी निवडले व ते सोबत घेऊन गेले. घरासमोर जीप उभी होती, तिथे आम्हाला उभे केले. ते स्वतः आत गेले व लगेच बाहेर आले आणि म्हणाले, “जीपला धक्का मारा.” लांबपर्यंत धक्का मारल्यानंतर जीप सुरू झाली. घरापुढे आणून चालू स्थितीत उभी केली व आत गेले. जीप सुरू करण्याची चालकाची युक्ती अनोखी होती. चालक बाहेर येताना अटलजी सोबत आले. अटलजींना पाहून आम्हाला खूप आश्चर्य व आनंद वाटला. चालकाने त्यांना सांगितले की, “हे गांधीनगर शाखेचे स्वयंसेवक आहेत.” त्यांनी प्रत्येकाला नाव विचारले. लहान-थोर असा भेद न करता संघ स्वयंसेवक सर्व स्वयंसेवकांशी आपुलकीने वागतो, त्याच आपुलकीने अटलजींनी आमची विचारपूस केली, ती त्यावेळी अनुभवली. किशोर असतानाचा तो प्रसंग आजही जसाच्या तसा माझ्या स्मरणात आहे.

 

अटलजींची संघाबद्दलची आत्मियता जाणवली, असा आणखी एक प्रसंग मला आठवतो. १९८५चे साल होते. अकोल्याला भाजपची जाहीर सभा होती. त्यासाठी अटलजी आले होते. संघाचे अ. भा. व्यवस्था प्रमुख स्व. लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव ‘लक्ष्मण स्मृती’ अकोला संघ कार्यालयाला देणे व त्यांच्या फोटोचे अनावरण करणे, असा कार्यक्रम अटलजींच्या हस्ते व्हावा, अशी सर्व स्वयंसेवकांची इच्छा होती. अकोला नगर संघचालक शंकरलालजी खंडेलवाल यांनी डॉ. प्रमिला टोपलेंमार्फत तो विषय अटलजींपर्यंत पोहोचवला. व्यस्त कार्यक्रमातही ते म्हणाले, “वकिलसाहब! ये कार्यक्रम के लिये हम को समय निकालनाही होगा.” लक्ष्मणराव इनामदारांना गुजरातमध्ये ’वकीलसाहब‘ म्हणत. अटलजींनी या कार्यक्रमासाठी तीस मिनिटे वेळ दिला. अकोल्याचे मध्यवर्ती संघ कार्यालयाचे सभागृह खचाखच भरले होते. बाहेर स्पीकर लावला होता. तो संपूर्ण परिसर लोकांनी भरून गेला होता. मुंगीलाही जागा मिळणार नाही, अशी परिस्थिती झाली होती. अटलजी दुपारी ठीक तीन वाजता आले. फोटोचे अनावरण झाल्यावर ते पंचवीस मिनिटे मा. वकीलसाहेबांविषयी बोलले. “वकीलसाहेबांचा जन्म ऋषी पंचमीचा होता, ते खरोखर ऋषी होते,” असे उद्बोधक वर्णन अटलजींनी केले. साडेतीनला पुढील कार्यक्रमासाठी बाहेर पडले. यावेळी मी संघाचा अकोला विभाग प्रचारक म्हणून या कार्यक्रमाचा साक्षी होतो. खरे तर १९८४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने अटलजी नव्याने पक्ष उभारण्यात व्यस्त होते. तरीही संघाचा कार्यक्रम म्हटले की, धावपळीच्या कार्यक्रमातूनही वेळ काढून ते संघ कार्यालयात आले, एखाद्या निष्ठावंत स्वयंसेवकासारखे!

 

अटलजी पंतप्रधान असताना उड्डाणासाठी सज्ज असलेले विमान थांबवून विभाग संघचालकाला भेटल्याचाही एक अनोखा प्रसंग घडला आहे. २००४ साली अटलजी पंतप्रधान असताना लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू होती. अकोल्याला त्यांची जाहीर सभा होती. शहरात आल्यानंतर ते प्रथम संघ चालकांच्या घरी येतील, चहा घेतील व नंतर सभास्थानी जातील, असे नियोजन होते. सभेच्या गर्दीपेक्षा संघचालकांच्या घरीच अटलजींना भेटावे, असा विचार प्र. ग. उर्फ भैय्याजी सहस्त्रबुद्धे यांनी केला. ते अकोला विभाग संघचालक होते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी ग्वाल्हेर येथे संघ प्रचारक म्हणून काम केले होते व अटलजींवर कवितेचे आणि लेखनाचे संस्कार त्यांनीच केले होते. अटलजींना भैय्याजींविषयी अपार आदर होता. त्या दिवशी निवडणुकीच्या धामधुमीत अटलजी अकोल्यात विमानाने आल्यानंतर थेट सभास्थानी गेले. संघचालकांच्या घरी जाणे रद्द झाले. भैय्याजी सहस्त्रबुद्धे त्यांची वाट पाहत राहिले, पण भेट झाली नाही. अटलजी परत जायला विमानतळाकडे निघाले. भैय्याजींना आपल्या लाडक्या शिष्याला भेटायचेच होते. तेसुद्धा विमानतळाकडे गेले. तिथल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही म्हणून निरोपासाठी जमलेल्या घोळक्यातच थांबले. विमान उड्डाणासाठी सज्ज होते. विमानात प्रवेश करण्यापूर्वी अटलजींनी उपस्थितांना निरोपासाठी हात दाखविला त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, गर्दीत भैय्याजी सहस्त्रबुद्धे आहेत. त्यांनी सोबत असलेल्या खा. भाऊसाहेब फुंडकर यांना विचारले, “भैय्याजी दिख रहे है?” फुंडकरांनी होकार दिल्यावर तत्काळ अटलजी म्हणाले, “मुझे बताया नही भैय्याजी आनेवाले है।” ताबडतोब अटलजी परत फिरले, निरोपासाठी जमलेल्या घोळक्याजवळ आले. भैय्याजी सहस्त्रबुद्धे यांच्याजवळ गेले व त्यांना वाकून नमस्कार केला. देशाचा पंतप्रधान विमान थांबवून ८० वर्षांच्या संघ प्रचारकाला भेटण्यासाठी परत येतो, हे पाहून उपस्थित अवाक झाले. अटलजींनी भैय्याजींची चौकशी केली. त्यांच्याशी दहा मिनिटे बोलले व नंतर गेले. देशातील सर्वोच्च सत्तापदावर पोहोचल्यावरही अटलजींची संघ स्वयंसेवक आणि प्रचारकांबद्दलची आत्मियता कायमच होती.

 

पंतप्रधानपदावरून अटलजी २००४ साली पायउतार झाले. त्यानंतर ते फारसे कार्यक्रम करत नसत. २००६ साली पु. श्री. गोळवलकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रम नागपूरला होणार होता. या कार्यक्रमासाठी अटलजी येण्याचे निश्चित झाले. मी प्रांत प्रचारक असल्यामुळे स्वाभाविकच कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात सहभाग होता. कार्यक्रम संपल्यावर अटलजींनी जेवण करूनच जावे, असे सर्वांना वाटत होते. तसे बोलणे विलास फडणवीसांनी अटलजींच्या साहाय्यकाशी केले. त्यांनी सांगितले की, लगेचच निघावे लागेल. विलासजींनी सांगितले की, कार्यक्रमानंतर पाच-सहा लोकांची स्वतंत्र व्यवस्था वेगळी करू व जेवणात अटलजींना आवडणारी पुरणपोळी आहे. तसा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला. अटलजी माजी पंतप्रधान असल्याने त्यांना विशेष सुरक्षाव्यवस्था होती. त्यांचा मोठा लवाजमा होता. पूज्य गुरुजींविषयी आदर असल्याने ते जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी आवर्जून आले. नंतर सर्वांसोबत भोजनाला थांबतील की नाही, साशंकता होती. पण, त्यांनी होकार दिल्याचा निरोप आला. कार्यक्रम संपल्या संपल्या स्मृतिभवनच्या स्वागत विभागात विशेष व्यवस्था करण्यात आली. अटलजी सर्वांसोबत जेवले व पुरणपोळीची तारीफ केली. सर्वांना खूप आनंद झाला.

 

अटलजींची संघाबद्दलची आत्मियता मी पाहत होतो. सत्तरच्या दशकात बालस्वयंसेवक असताना आणि २००६ साली प्रांत प्रचारक असताना मला अटलजींचा स्वयंसेवकाचा भाव अनुभवता आला. जनसंघाचे अध्यक्ष असताना, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाजपची उभारणी करताना आणि पंतप्रधानपद भूषविल्यानंतरही अटलजींच्या ठायी संघाबद्दल आत्मीयता भाव होता. ते स्वयंसेवकच होते.
 
- प्रा. रविंद्र भुसारी 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@