अभिनय क्षेत्रात मेहनतीबरोबर नशिबाची साथ महत्त्वाची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |

सिनेअभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची ‘तरूण भारत‘शी दिलखुलास बातचित...

 
 
जळगाव :
आजच्या तरुणांना कुठल्याही सल्ल्याची गरज नसून आजचा तरुण हा स्वयंभू आहे. आजच्या युगात यश कसे मिळवायचे हे त्यांना माहीत असून यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न करून आपले लक्ष्य गाठून आपल्या क्षेत्राकडे वाटचाल करावी, हे बोल आहेत सिनेअभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचे. जळगावात होत असलेल्या नवरा असावा तर असा या एका खासगी मराठी वाहिनीवरील मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या जळगावात आल्या असताना त्यांनी ‘तरूण भारत’शी संवाद साधला.
 
 
त्या म्हणाल्या की, मी प्रथमच खान्देशात आली असून याठिकाणी असलेल्या आदरातिथ्याने मी भारावली आहे. त्याचप्रमाणे येथील लोक हे प्रेमळ असून यांच्यासोबत राहताना मला खूप चांगले वाटत आहे. याठिकाणच्या भाषेत एक गोडवा आहे, आणि तो गोडवा जपत मी काही शब्दही शिकले आहे. मी करत असलेल्या या कार्यक्रमात हे काही शब्द मी वापरणार असून जळगावात काम करताना मला मनापासून आनंद होत आहे. जळगावातील तरूणांमध्ये खूप ऊर्जा असून ती त्यांनी आपल्या क्षेत्रात सत्कारणी लावावी. दरम्यान मुंबईसारख्या ठिकाणी काम करत असताना बंदिस्त ठिकाणी मालिकेचे चित्रीकरण होतं, ते काही काळाने नकोसे वाटायला लागतं. मात्र, जळगावात होत असलेल्या वातावरणात मन प्रसन्न राहून काम करण्यात एक वेगळाच उत्साह संचारत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, तीन दिवस त्या जळगावात असून तीनही दिवस मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्या जळगावातील दाम्पत्यांशी संवाद साधणार असल्याचे कळले. आजचे तरुण हे मुंबई येथे जाऊन काम करतात, पण ते काम करत असताना त्यांनी कसोशीने आपले लक्ष्य गाठावे. आपल्याला काही महिने, वर्ष काम नाही मिळाले तरी अपयशाने खचून न जाता, आपण काम करत राहावे. सिनेसृष्टीत लगेच काम खूप कमी लोकांना मिळते, त्यासाठी बर्‍याच वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागतो, तेव्हा आपल्याला हवे असलेले काम हे करायला संधी मिळत असते. हा शेवटी नशिबाचा भाग असतो. मेहनतीबरोबर जर तुमचे नशीब असले तर दोन महिन्यात तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचतात नाहीतर त्यासाठी २० वर्षही कमी पडतात. दरम्यान, एका खासगी मराठी वाहिनीवरील मालिकेसाठी त्या पहिल्यांदा आपल्या अभिनयाची झलक दाखवणार असल्याने आणि प्रथमच सूत्रसंचालनाची भूमिका निभावणार असल्याने मनात भीती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
दरम्यान, जळगावात बर्‍याच चित्रपटांचे चित्रीकरण होत असून येथील तरुणांनी मुंबईकरांना याठिकाणी चित्रीकरणासाठी बोलवावे, अन्यथा आपल्यात असलेली ऊर्जा वापरून जगात आपल्या भाषेचे लौकिक वाढवावे, असा सल्लाही त्यांनी दिला. महाराष्ट्राला खान्देशी भाषा समजण्यासाठी आधी या भाषेचे चित्रपट येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगून या क्षेत्रात येणार्‍या जळगावातील तरुणांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
 
 
आतापर्यंत मी बर्‍याच मालिकांमध्ये काम करताना खूप ठिकाणी काम केले असून जळगावात काम करण्याचा हा पहिला अनुभव आहे. जळगावकरांचा चेहरा हा जितका सोज्वळ आहे, तितकेच त्यांचे मनही. आधी मुंबईवरून येताना मनात असंख्य प्रश्‍नांचे काहूर माजत होते, पण येथे आल्यानंतर जळगावातील नागरिकांशी बोलून मन खूप प्रसन्न झाले. येणारे तीन दिवस मी येथे असून जो काही येथील नागरिकांच्या प्रेमाचा ठेवा मला मिळणार आहे, तो आयुष्यभर मी जतन करणार आहे.
- हर्षदा खानविलकर, सिनेअभिनेत्री
 
 
नवरा असावा तर असा या मालिकेसाठी आम्ही जळगावात आलो आहोत. नवरे बायकांसाठी खूप काही करतात, पण आपल्याला त्यांची ही भावना समजत नाही. तीच भावना या मालिकेच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा मानस आहे. या मालिकेत नवरे हे केवळ पैसे कमवून आणण्याचे साधन नसून ते आपल्या आयुष्याचा ठेवा आहेत, याची जाणीव या मालिकेद्वारे होणार आहे. हा कार्यक्रम तीन दिवस असून जळगावातील दाम्पत्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.
- चैतन्या मनोज, एक्सिक्युटिव्ह प्रोड्युसर
 
@@AUTHORINFO_V1@@