प्रत्येकाने जीवनात एकदा तरी ’पायी वारी’ करावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |

ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांचे आवाहन

 
जळगाव :
‘पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो...’ या अभंगातून पंढरपूरच्या पायी वारीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. प्रत्येकाने जीवनात पायी वारी एकदा तरी करावी आणि अनुभवावी, असे प्रतिपादन जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती ह.भ.प.मंगेश महाराज जोशी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना केले.
 
 
संस्थानतर्फे आयोजित संत मुक्ताबाई राम पालखीचे ११०० कि.मी.चा प्रवास (जळगाव-पंढरपूर-जळगाव) करून नुकतेच शहरात आगमन झाले. ह. भ. प. मंगेश महाराज यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील संत मुक्ताईची सर्वात जुनी पालखी म्हणून श्रीराम मंदिर संस्थानच्या पालखीची ओळख आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर ३५ वर्षांनी अनुक्रमे संत निवृत्तीनाथ (त्र्यंबकेश्‍वर), संत मुक्ताई राम पालखी व सोपानदेव महाराज (सासवड) पालखी सुरू झाली. सद्गुरू अप्पा महाराजांना मेहरूण शिवारातील वटवृक्षाखाली सन १८७२ मध्ये आषाढीला पंढरीला जा, श्री क्षेत्र आळंदीला जाऊन सद्गुरू नृसिंह सरस्वतींचा अनुग्रह घे असा दृष्टांत झाला. तेव्हा पालखीची परंपरा सुरू झाली.
 
 
वाडी संस्थानच्या (अमळनेर) सद्गुरू सखाराम महाराज दिंडीलाही २०० वर्षे पूर्ण झाली. श्री संत सखाराम महाराजांना मिळालेली पांडुरंगाची मूर्ती संत मुक्ताईला आशीर्वाद देण्यासाठी दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला जळगावला येते.
 
 
पांडुरंगाचे मिठी मारून घेतले जायचे दर्शन
पूर्वी पंढरपूर वारीला जाणार्‍यांची संख्या अतिशय कमी असायची. बहुतेक प्रवास हा पायीच असायचा. संत ज्ञानेश्‍वरांच्या काळात पांडुरंगाला मिठी मारून दर्शन घेतले जायचे. भक्तांचा विठ्ठल मंदिरातील ओसर्‍यांवर मुक्काम असायचा. आज सर्व सुख-सुविधा उपलब्ध झाल्या असून प्रवासही सोपा झाला आहे. परंतु पायी वारी आजही अव्याहतपणे सुरू असल्याचे ह.भ.प. मंगेश महाराजांनी सांगितले
 
 
अहमदनगरमध्ये महापौरांच्या हस्ते सन्मान
पालखीत यंदा ३५० जणांचा सहभाग होता. जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर व सोलापूर या चार जिल्ह्यांतून ११०० कि. मी. प्रवास ५४ दिवसांत पूर्ण करण्यात आला आहे. पंढरपूरला जाताना मार्गात अहमदनगरला महापौरांच्या हस्ते पालखीचा सन्मान केला जातो. तेथे सरपंच असल्यापासून हा प्रघात आहे.
 
 
वारकरी निसर्गभक्तीत दंग
पंढरपूरहून परतीच्या प्रवासात सर्वात शेवटी प्रारंभ स्थळी पोहोचणारी पालखी श्रीराम मंदिर संस्थानची आहे. विद्या फाउंडेशनने दिलेले सीड बॉल्स वारीच्या मार्गात रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकण्याचे काम जळगावमधील भक्तांनी केले असून, सामनेर (ता. पाचोरा) येथे ह.भ.प. मंगेश महाराजांच्या हस्ते वडाचे रोपही लावण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@