बुडत्याचा पाय खोलात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018   
Total Views |


 


राष्ट्राध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यापासून ट्रम्प आणि वाद हे एक सूत्रच होऊन बसलं आहे. आतातर म्हणे, त्यांच्यावर लवकरच महाभियोग आणला जाऊ शकतो. ट्रम्प यांची गेल्या 20 महिन्यातील कारकीर्द पाहिली तर लक्षात येईल की, याला कारणीभूत स्वतः ट्रम्प आणि त्यांचे विश्वासू सहकारीच आहेत...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 

साधारण 20 महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या राजकारणात सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी घटना घडली. 45 वे ‘प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स’ म्हणून बिगर राजकीय, व्यावसायिक आणि अनेक वादांमध्ये अडकलेले डोनाल्ड ट्रम्प बहुमताने निवडून आले. खरेतर जगभरातील राजकीय विश्लेषकांना हा धक्काच होता, कारण अमेरिकन जनता ट्रम्पसारख्या व्यक्तीला निवडून देतील, अशी सुतराम शक्यता नव्हती. मात्र, ट्रम्प यांनी ‘करून दाखवले’ आणि अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. ट्रम्प अध्यक्ष झाल्याचे अनेकांना बघवले नसल्याने त्यांच्या खुर्चीला नजर लागली की काय? याची शक्यता नाकारता येत नाही कारण, खुर्चीवर विराजमान झाल्यापासून ट्रम्प आणि वाद हे एक सूत्रच होऊन बसलं आहे. आतातर म्हणे, त्यांच्यावर लवकरच महाभियोग आणला जाऊ शकतो. ट्रम्प यांची गेल्या 20 महिन्यातील कारकीर्द पाहिली तर लक्षात येईल की, याला कारणीभूत स्वतः ट्रम्प आणि त्यांचे विश्वासू सहकारीच आहेत.

 

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी मिळाल्यापासून आपल्या बेताल आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिले. सध्या ते चर्चेत आहेत त्यांच्या सहकाऱ्यांवरील आरोप सिद्ध झाल्याने. ट्रम्प यांचे माजी प्रचारप्रमुख पॉल मॅनफोर्ट यांना करचुकवेगिरी, बँक घोटाळा, परदेशी बँक खात्यांची माहिती न देणे या आरोपांखाली दोषी ठरविण्यात आले आहे, तर ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत मौन पाळण्यासाठी दोन महिलांना अध्यक्षीय निवडणुकीआधी पैसे दिल्याची आणि ट्रम्प यांनी निवडणुकीत अफरातफरी करायला सांगितल्याची कबुली माजी वकील मायकेल कोहेन यांनी न्यायालयात दिली आहे. या प्रकरणात आपला काहीही संबंध नसून जे घडले ते अत्यंत वाईट असल्याची प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली असली तरी यामुळे त्यांचे पाय आणखीनच खोलात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणांमुळे त्यांच्यावर लवकरच महाभियोग आणला जाऊ शकतो. यासाठी अमेरिकन सिनेटमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. तसा दुजोरादेखील राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचार अभियानादरम्यान ट्रम्प यांचे सल्लागार राहिलेले मायकल कॅप्युटो यांनी दिला आहे.

 

ब्रेड शेरमेन आणि अल ग्रीन यांनी गेल्यावर्षी ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा ठराव आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो फेटाळला गेला. सध्याची अमेरिकन राजकीय परस्थिती मात्र वेगळी आहे. सध्या अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुका चालू आहेत. यात जर विरोधी पक्षाला मताधिक्य मिळाले तर ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा फास आवळला जाण्याची शक्यता कॅप्युटो यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्याविरोधात होत असलेल्या आरोपाविरोधात विरोधक आक्रमक होताना दिसून येत असले तरी ट्रम्प यांच्या कामाच्या पद्धतीवर व राजकारणावर नाराज असलेल्या स्वकीय सदस्यांचादेखील ट्रम्पविरोध उफाळून आला आहे. त्यामुळे अमेरिकी कायद्याप्रमाणे महाभियोगासाठी दोन तृतीयांश बहुमत जरी अपेक्षित असले तरी रिपब्लिकन पक्षाचे स्वकीय विरोधक आणि डेमोक्रॅटिक आणि इतर पक्षातील ट्रम्प विरोधक एकत्र येऊन हा महाभियोग ठराव आणू शकतात. कायद्याच्या कचाट्यात सापडलेले ट्रम्प यांचं भविष्य काय? त्यांच्यावर महाभियोग आणला जाऊ शकतो का? यासाठी मात्र आपल्याला डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

 

महाभियोग आणि अमेरिका

 

कोणत्याही देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीवर ठेवलेल्या आरोपाच्या सुनवणीसाठी भरलेला खटला चालवण्याच्या प्रक्रियेस ‘महाभियोग’ असे म्हटले जाते. अमेरिकेच्या इतिहासात त्यांच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात अशा प्रकारचा महाभियोग तब्बल आठवेळेस चालवला गेला आहे. यामध्ये सर्वप्रथम 1843 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन टेलर यांना जॉन बॉट्स यांनी मांडलेल्या महाभियोगाला सामोरे जावे लागले होते. मात्र, त्यावेळी जॉन टेलर यांनी हा महाभियोग ‘127 विरुद्ध 43’ असा जिंकला होता. अमेरिकेचा अलीकडचा इतिहास पाहावयास गेल्यास 1998 साली बिल क्लिटंन यांनादेखील महाभियोगाला सामोरे जावे लागले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@