चीन वृद्ध होतोय!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |



मनुष्यबळ ही चीनची ताकद जरी असली तरी हे मनुष्यबळ आज कुठेतरी कमकुवत होत चालले आहे की काय, असा प्रश्न चीनपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणारा चीन, सर्व क्षेत्रात प्रगती करू पाहणारा चीन, जागतिक खेळांमध्येही अग्रेसर असणारा चीन आता कुठेतरी थकतोय, दमतोय... यावर भाष्य करणारा हा लेख...
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 

 

चीन हा देश नेहमीच सामूहिक विकासाला प्रोत्साहन देत आला आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीन जगातीप अग्रेसर देश आहेच, परंतु चीनचे हे मनुष्यबळ हळूहळू चीनसाठी घातक ठरू लागले आहे. कारण, चीनमधील वृद्धांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे, असे एका सर्वेक्षणातून समोर आले. चीनमधील या ज्येष्ठ नागरिकांना एका ठराविक वयोमर्यादेनंतर निवृत्तीवेतन मिळत नाही. त्याचा गंभीर परिणाम आता चीनच्या अर्थव्यवस्थेला भोगावा लागणार असल्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. देशातील वृद्धांची संख्या वाढल्यामुळे देशात प्रभावी व शारीरिकदृष्ट्या सक्षम मनुष्यबळाची कमतरता भासू लागते. याचा थेट परिणाम मग देशाकडे येणाऱ्या संपत्तीच्या ओघावरही दिसून येतो. परिणामी, देशाच्या अर्थव्यवस्थेचे संतुलन बिघडते. अर्थव्यवस्थेची ही बिघडलेली घडी पुन्हा व्यवस्थित बसविण्यासाठी पुढील अनेक वर्षे वाट पाहावी लागते. त्यासाठी नुसता देशातील जन्मदर वाढणे अपेक्षित नसते, तर मृत्युदरातही वाढ व्हावी लागते. कारण, भावनिकदृष्ट्या नव्हे तर आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला असता, कुठल्याही देशासाठी वृद्धांची संख्या कायम राहणे, हे अर्थव्यवस्थेला घातक ठरु शकते. जपानमध्येही सध्या हीच परिस्थिती दिसून येते.

 

चीनची लोकसंख्या 1 अब्ज 40 लाख असून त्यापैकी 17.3 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. देशातील वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे देशाच्या वैचारिक प्रगतीवरही त्याचा परिणाम होतो. नवे विचार, नव्या कल्पनांना वाव मिळत नाही. त्यामुळे जागतिक पातळीवर तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपला देश कुठेतरी कमी पडेल, अशी भीती चिनी नागरिकांमध्ये निर्माण झालेली दिसते. सद्यस्थितीत चीनमधील ज्येष्ठांची संख्या 24 कोटी 10 लाख आहे. 2050 पर्यंत ही संख्या 48 कोटी 70 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनच्या ‘नॅशनल वर्किंग कमिशन’ने ही शक्यता वर्तवली आहे. पण, ही स्थिती कधी ना कधी निर्माण होणारच होती. त्याला कारणही चीनची अवास्तव लोकसंख्याच. मनुष्यबळ ही चीनची ताकद जरी असली तरी हे मनुष्यबळ आज कुठेतरी कमकुवत होत चालले आहे की काय, असा प्रश्न चीनपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणारा चीन, सर्व क्षेत्रात प्रगती करू पाहणारा चीन, जागतिक खेळांमध्येही अग्रेसर असणारा चीन आता कुठेतरी थकतोय, दमतोय... जगात क्रमांक एक ठरण्याच्या या अट्टहासात कुठेतरी स्वल्पविराम घेण्याची वेळ आता चीनवर आली आहे.

 

चीनमध्ये होणारे हे बदल व त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी त्याला किती कालावधी लागेल, हे सांगता येणे तसे कठीणच. कारण, चीनपुढे असणारे आणखी एक संकट म्हणजे बदलते तंत्रज्ञान! सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी चीनमधील ज्येष्ठ नागरिक कितपत जुळवून घेतात, हे चीनसाठी फार मोठे आव्हान आहे. यावर उपाय म्हणजे, चीनला एकतर आपल्या वृद्ध लोकसंख्येला डोळ्यासमोर ठेवून तंत्रज्ञानात बदल करावे लागतील किंवा या ज्येष्ठ नागरिकांना बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वत:लाच बदलावे लागेल. हे सारे होईल तेव्हा होईल, पण भारताने यावरून चार फायद्याच्या गोष्टी शिकायला हव्यात. भारत हा तरुणांचा देश आहे, असे मानले जाते. भारतही लोकसंख्येच्या बाबतीत चीनच्या पावलावर पाऊल ठेवायच्या तयारीत आहे. पण, भारतालाही हे लोकसंख्यावाढीचे आणि त्यातही ज्येष्ठांची संख्या वाढल्यास मनुष्यबळसंबंधी परिणाम भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

चीनला आगामी काळात स्वत:मध्ये काही आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. देशहितासाठी कोणताही निर्णय घेताना आधी देशातील वृद्धांच्या दृष्टीने विचार करावा लागणार आहे. तसेच देशात स्थानिक पातळीवरही ज्येष्ठ नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने काही लहानसहान बदल करावे लागणार आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या दुकानातील रांगेत उभ्या असणाऱ्या नागरिकांमध्ये ज्येष्ठांना प्रथम प्राधान्य द्यावे, ही नियमवजा शिस्तच चीनला आपल्या नागरिकांना लावावी लागणार आहे. आता त्यानंतर चीनमधील नागरिकांमध्ये यांसारख्या नियमांची कितपत अंमलबजावणी होते, यावरही चीन सरकारला विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. तसेच आपल्या या वृद्ध लोकसंख्येचे हित पाहताना देशातील तरुण दुखावले जाणार नाहीत किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याचा विचारही चीनला करावा लागणार आहे.

 
- साईली भाटकर
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@