भांडुपमध्ये गांजाची लागवड करणारा अटकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2018
Total Views |


 

मुंबई: भांडुपमध्ये बागेतील फुलझाडांआड गांजासारख्या अंमली पदार्थाची लागवड होत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत भांडुपच्या खिंडीपाडा भागात राहणाऱ्या नसीम शेख या तरुणाला पोलिसांनी अटक केली. शेख याने घराबाहेर बाग फुलवली आणि त्याआड गांजाची लागवड केली होती.
 

भांडुपमधील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आदेश पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिले आहेत. पोलिसांनी सर्वप्रथम अमली पदार्थ विक्रेत्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. साहाय्यक आयुक्त अरुण सोंडे यांना खिंडीपाडा, डक लाइनच्या साईबाबा चाळीत गांजाची लागवड असल्याची माहिती मिळाली. सोंडे यांनी कांजूरमार्ग पोलिसांना साईबाबा चाळीत कारवाईचे आदेश दिले. कारवाईत एका घरासमोर बागेत झुडुपांत सुमारे पाच फूट उंचीची गांजाची रोपटी आढळली. चौकशीत ही रोपटी शेख याने लावल्याचे समजले. पथकाने शेख याला अटक केली. पुढील तपासात शेख अमली पदार्थ विक्रीत सराईत असून त्याला या गुन्ह्यात आधी अटक करण्यात आली होती. शेखकडून हस्तगत रोपट्यांमधून सहज एक किलो किंवा त्याहून जास्त गांजा तयार होऊ शकला असता, त्याने गांजाची रोपटी आणि त्याचा दर्प दडपण्यासाठी हेतुत: अवतीभवती उंच वाढणारी फुलझाडे लावली होती.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईत तीन रोपटी सापडली, मात्र कारवाईआधी शेख याने बागेतील उर्वरित गांजाची रोपटी काढून त्यापासून गांजा तयार करून विकल्याचा संशय आहे. सध्या शेख न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, भांडुपच्या डोंगराळ भागातल्या विशेषत: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवरील वस्त्यांमध्ये गांजाची लागवड सहज शक्य आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली असून सध्या त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@