हेअरकलर दीर्घकाळ टिकवायचाय? मग 'हे' उपाय करून पहा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2018
Total Views |





आपण सुंदर दिसावे, सगळ्यांनी आपल्या सौदर्यांचे कौतुक करावे, असे प्रत्येक महिलेला वाटत असते. त्यासाठी तिचे तसे प्रयत्नदेखील सुरू असतात. पार्लरला जाणे, विविध सौंदर्य प्रसाधने वापरणे, काही ठराविक महिन्यांनी हेअरकट, हेअरकलर करणे, असे अनेक प्रकार महिला करून पाहतात. पण पार्लरमध्ये जाऊन केसांवर हजारो रुपये खर्च करून सुद्धा केसांना केलेला हेअरकलर काही दिवसांतच फिकट पडू लागतो. म्हणूनच हेअरकलर करताना कोणताही हेअरड्रेसर तो कलर किती काळ टिकेल याची शाश्वती देत नाही. हेअरकलर फिका पडू लागल्यावर संबंधित पार्लर किंवा ब्युटी सॅलोनमध्ये तक्रार केली असता तुम्ही केसांची नीट काळजी घेत नाही हे उत्तर मिळते. पण बहुतांश वेळा हे खरेदेखील असते. त्यामुळे हेअरकलर दीर्घकाळ टिकावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर केसांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.

 

हेअरकलर दीर्घकाळ टिकवण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या…


पुढील ७२ तास शॅम्पूचा वापर टाळा :

हेअरकलर केल्यानंतर किमान पुढील ७२ तास शॅम्पूचा वापर करू नका. असे केल्याने हेअर क्युटिकलला हेअरकलर लॉक करण्यास वेळ मिळतो. त्यामुळे केसांवरील हेअरकलर दीर्घकाळ टिकतो. वारंवार केसांना शॅम्पू करू नये. त्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल नाहीसे होते. तसेच केसातील कलर मॉलेक्यूल कमी होतात. १-२ दिवस शॅम्पू न केल्याने तुमचे केस जर तेलकट झाले असतील तर केसांना ड्राय शॅम्पू वापरा.


 
 
योग्य शॅम्पूची निवड करा :

हेअरकलर केला असेल तर केसांना साधारण शॅम्पू वापरून चालणार नाही. सल्फेट फ्री शॅम्पूचा वापर करावा किंवा कलरप्रूफ शॅम्पू केसांना वापरावा. तसेच केस धुण्यासाठी फिल्टर केलेल्या पाण्याचा वापर करावा. यामुळे पाण्यातील क्लोरिन केसांपर्यंत पोहोचणार नाही आणि केसांचा कलर दीर्घकाळ टिकून राहील. केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. केस धुवताना गरम पाणी वापरल्यास केसांचा कलर निघून जाईल. तसेच केसांमध्ये असलेले नैसर्गिक मॉइश्चरही निघून जाईल.

 

 
 
शॅम्पूआधी वापरा कंडीशनर :

सामान्यत: शॅम्पूनंतर कंडीशनर लावला जातो. पण तुम्ही केसांना हेअरकलर केला असेल तर शॅम्पूआधी कंडीशनर लावा. केस धुवा व त्यानंतर शॅम्पूचा वापर करा. असे केल्याने केसांवर एक संरक्षक थर तयार होईल. परिणामी तुम्ही केलेला हेअरकलर केसांवर जास्त काळ टिकून राहील.

 

 
 
सूर्यकिरणांपासून केसांचा बचाव करा :

उन्हात घरातून बाहेर पडताना नेहमी डोक्यावर हॅट, टोपी किंवा स्कार्फचा वापर करा. त्यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या केसांचे संरक्षण होईल. तसेच त्यामुळे केसांचा हेअरकलर फिका पडणार नाही. केस स्टाइल करताना, हेअर ड्रायर, ब्लो ड्रायरचा अतिवापर करू नका. त्याने केस जास्त गरम होतात व केसांचा पोत बिघडू शकतो. स्विमिंग करण्यापूर्वी केसांना खोबरेल तेल लावा.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 - साईली भाटकर
@@AUTHORINFO_V1@@