‘नाना’ अमर झाले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2018
Total Views |


 

 

नाना पालकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष आणि नाना पालकर स्मृति समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा पश्‍चिम, मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन 

करण्यात आले 

आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रा. स्व. 

संघाचे 

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, तसेच विशेष अतिथी म्हणून उद्योगपती ‘पद्मभूषण’ रतनजी टाटा उपस्थित राहणार आहेत. यावेळी शेषाद्री चारी लिखित ‘सागा ऑफ इस्त्रायल, नो व्हेअर टू एव्हरीव्हेअर’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.त्यानिमित्ताने स्वर्गीय नाना पालकर यांच्या प्रेरणामय जीवनाचा उलगडलेला पट...
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

नाना पालकरांना मी पाहिले आणि ऐकले, त्याला झाली ६६ वर्षे! दासनवमीचा दिवस होता. रत्नागिरी किल्ल्यावरील भगवती मंदिरातील सकाळचे रम्य, पवित्र आणि उत्साहवर्धक वातावरण. जिल्ह्यातील निवडक १५० बालांसमोर नाना बोलत होते. बेताच्याच उंचीचा गोरापान तरुण. साधाच वेष; दुटांगी धोतर आणि अर्ध्या बाह्यांचा स्वच्छ आकाशी रंगाचा सदरा. बघताच क्षणी आदर वाटावा असा निष्पाप, प्रसन्न, सोज्वळ चेहरा! रामदास स्वामींच्या मारुती मंदिरांच्या मठांच्या स्थापनेची कथा नाना सांगत होते. सोपी, सरळ भाषा; उपमा-उत्प्रेक्षांनी नटलेली, गद्याला पद्याची लय असलेली, ओघवती, सर्वांना खिळवून टाकणारी भाषा! छोटी-छोटी वाक्ये हृदयाला भिडत होती. सहजसुंदर शब्दात त्यांनी रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मातीच्या दोन स्वरूपाची म्हणजे वीर मारुती आणि दास मारुती ही दोन रूपे उभी केली. मठ-मंदिरांची स्थापना केल्याचे वर्णन नाना करीत होते. शौर्य आणि साहसाचा तो काळ. ध्वजाधारी, रौद्ररूप, उग्रवीर मारुतीचे राम-रावण युद्धातील वीर मारुतीचे रूप आणि प्रभू रामचंद्रांसमोर विनम्रपणे हात जोडून उभा असलेला दास मारुती. समाजकंटकांच्या मनात धाक उत्पन्न करणारा, समाज रक्षणासाठी उभा ठाकलेला वीर मारुती आणि समाजसेवेसाठी पददलितांच्या सेवेसाठी तत्पर असणारा दास मारुती. संघाची, संघ स्वयंसेवकांची ही दोन रूपे आहेत... नाना जीव ओतून बोलत होते. त्यांचा चेहराही बोलत होता. शब्द शब्द काळजाला भिडत होता. मारुतीची दोन अलग रूपे नाहीत. त्यात द्वंद नाही; एकाच नाण्याच्या दोन बाजू. संघ समजण्याचे ते वय नव्हते. नंतर अनेक वेळा नानांच्या तोंडून हा विषय ऐकला. १९५१ सालचा तो वर्ग आणि नानांचा बौद्धिक वर्ग मनात खोल रुजला. ‘ममतेने जो हात फिरावा पददलितांच्या पाठीवरती। पशुला दिसता तोची हात क्षणी दृढ वज्राची व्हावी मुष्ठी।’ नानांच्या गीतातील दोन ओळी आजही ओठावर रेंगाळतात; परळच्या नाना पालकर रुग्णसेवा सदनात पाय टाकताना ‘ममतेने जो हात फिरावा पददलितांच्या रुग्णांच्या पाठीवरती’ याचा अर्थ उमजतो. नानांच्या आठवणींनी डोळ्यांच्या कडा ओलसर होतात.

 

नानांचा जन्म २६ ऑगस्ट १९१८ सालचा. शालेय शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात. शाळेत एक हुशार विद्यार्थी अशी नानांची ओळख. प्रकांडपंडित कै. दत्तो वामन पोतदार, स्वदेशीचे व्रत घेतलेले म. ह. गोडबोले आणि अस्पृश्याच्या वेदनांना वाचा फोडणारे प्रा. माटे यांच्यासारख्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे नानांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या. वाचनाची आवड उत्पन्न झाली. स्वातंत्र्य चळवळीबद्दल आस्था उत्पन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षण उत्पन्न झाले. समाजाविषयी प्रेम, आपुलकी वाढली. नानांचे मनन आणि चिंतन सुरू झाले. १९३० पासून स्वातंत्र्य चळवळीत काहीसे नैराश्य आले होते, त्याच काळात १९३३ साली नानांना संघाची ओळख झाली. संघातील शिस्त, कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, आपुलकीचा निरपेक्ष व निःस्वार्थी व्यवहार; यामुळे नाना संघाकडे आकृष्ट झाले. स्वा. सावरकर व डॉ. हेडगेवार यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. नाना संघाचे जबाबदार कार्यकर्ते बनले. नाना उपजत कवी. संघाचा संपर्क, रसिक विद्यार्थ्यांची संगत; त्यामुळे नानांचे कविमन फुलले. स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर नानांच्या राष्ट्रभक्तीपर पद्यरचना बहरल्या. समाजमनाचा वेध, निसर्गाचे आकर्षण, मातृभूमीचे उत्कट प्रेम, गेयता ही नानांच्या कवितांची, पद्यांची ओळख. आजही नानांची पद्ये अनेकांच्या ओठावर रेंगाळलेली दिसतात. नाना उपजत कवी, तसे वक्तेही. सोपी, सुटसुटीत भाषा, विषयाचा नेटकेपणा, दांडगा व्यासंग, श्रोत्यांच्या चेहऱ्या वरून त्यांच्या मनाचा वेध घेते. सभा जिंकण्याची नानांकडे अजब कला होती. नानांनी शेकडो सभा घेतल्या असतील. शंभरावर महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकांना सभेत खिळवून ठेवले. शालेय जीवनात रानडे वक्तृत्व स्पर्धेतील त्यांचे भाषण ‘सह्याद्री’ मासिकात लेख स्वरूपात छापण्याचा मोह संपादकांना आवरता आला नाही. नाना संघाचे प्रचारक म्हणजे समर्पित जीवनाचा आदर्श; पण प्रचारकी थाटात ते कधी बोलले नाहीत की, वागले नाहीत. १९३६ मध्ये नाना मॅट्रिकची परीक्षा प्राविण्य गुणांनी पास झाले. कॉलेजमध्ये प्रवेश घेताच त्यांच्या आजाराने उचल घेतली. कॉलेज सोडण्याचा आणि आजन्म संघकार्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ‘जे दिव्य दाहक म्हणोनी असावयाचे । बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे।’ आयुष्याच्या अखेरपर्यंत निष्ठेने त्याचे पालन केले. ठाणे आणि पुण्याच्या खेडोपाड्यात संघाचा विचार त्यांनी पोहोचविला. प्रवासाची साधने नाहीत, पायीच प्रवास, कधीतरी सायकल, उपासमार तर पाचवीला पूजलेली. लाघवी स्वभाव, साधी राहणी. नानांनी ठाणे आणि पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग अक्षरशः पिंजून काढला. पारदर्शक स्वभावाने नानांनी अनेकांच्या जीवनात परिवर्तन केले. ‘संघ माझा चांगला गांव समदा रंगला’ याचा अनुभव येऊ लागला. १९४२ साली अधिकृतपणे संघाचे प्रचारक म्हणून सातारा जिल्ह्यात त्यांची नेमणूक झाली. संघदृष्ट्या खडकाळ आणि खट्याळ जिल्ह्यात संघ शाखेचा मळा त्यांनी फुलविला.

 

मनुष्यनिर्मिती हेच सर्वात मोठे विधायक कार्य आहे, ही त्यांची पक्की धारणा. संघातून काही काळ दूर झालेल्या मधु देवल, दि. वि. गोखले, डॉ. आप्पा पेंडसे, दत्तोपंत नवरे आदी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीत खंड पडू दिला नाही. संघाचे काम समाजाभिमुख झाले पाहिजे, याकरिता ठक्कर बाप्पा, विनोबा भावे, आप्पासाहेब पटवर्धन, भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे, गाडगे महाराज यांच्या कामांचा अभ्यास केला. ज्ञानोबा माऊली, तुकारामांच्या शिकवणीला उजाळा दिला. शेती, शिक्षण, आरोग्य, लघुउद्योग, शेती यावर आधारित टिपणं तयार केली. आगामी काळातील जनकल्याण समितीच्या कामाचा तो आधार बनला. १९५२ साली नाना पालकर पुणे विभागाचे प्रचारक झाले. कार्यक्षेत्र वाढले. प्रवास अधिक करावा लागला. प्रकृतीवर ताण पडू लागला, पण जिद्द कमी झाली नाही. शरीराने अनेक व्याधींना घर मोकळे करून दिले. शारीरिक क्षमता कमी झाल्याचा क्षणोक्षणी अनुभव येत होता. नव्या सहकार्‍यांच्या नानांकडून अपेक्षा वाढत होत्या. नानांनी नाइलाजाने भरल्या अंतःकरणाने १९५८ साली प्रचारक म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला. ‘बुध्याची वाणी धरिले करी या सतीचे।’ याचा विसर त्यांना पडणे शक्य नव्हते.

 

संघावर आपला भार नको म्हणून नानांनी लेखणीचा आधार घेतला. लिखाणातून आपली गरज भागवावी, असा निर्णय घेतला. चिंतन, वाचन, मनन करून नानांनी ग्रंथनिर्मिती करण्याची पू. गुरुजींनी, सरकार्यवाह मा. एकनाथजी रानडे यांनी अपेक्षा व्यक्त केली. नानांनी १९५६ साली ‘पू. गुरुजी : व्यक्ती आणि कार्य’ हा चरित्रग्रंथ लिहिला. पू. गुरुजींचा लाभलेला सहवास, संघकार्याचा प्रत्यक्ष अनुभव व संघकार्यावर अपार निष्ठेतून निर्माण झालेल्या या ग्रंथातून संघविषयक वाङ्मयात मोलाची भर घातली गेली आहे. बादशहाच्या तंबूचा सोनेरी कळस कापून आणणारा शूर, धाडसी संताजी हा नानांच्या पुस्तकाचा विषय झाला. निर्दोष वडिलांना हत्तीच्या पायाखाली तुडविणाऱ्या पण, संभाजी महाराजांना गोव्याच्या खाडीत बुडत असताना वाचविणाऱ्या स्वामीनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ खंडो बल्लाळांचे नानांनी चरित्र लिहून मराठी सारस्वतात आपले स्थान निश्चित केले. मंदिरांच्या कथा आणि व्यथा, आपली आंघोळ अशा विषयांवर लेखन केले. पू. गुरुजींच्या इच्छेनुसार लिहिलेले ‘पू. डॉ. हेडगेवारांचे चरित्र’ या ग्रंथाने मराठी वाङ्मयात मोलाची भर घातली आहे. जुन्यापुराण्या वर्तमानपत्रांची कात्रणे, डॉक्टरसाहेबांचे हयात असलेले सहकारी आणि परिचितांना भेटून आठवणी गोळा करून लिहिलेले अतिव्याप्ती वा आदरोक्तिपासून मुक्त व भक्तिभावाची मर्यादा राखून लिहिलेल्या चरित्राची, त्यामागच्या कष्टाची दखल ना शासनाने घेतली, ना पुरोगामी मराठी साहित्यिकांनी. नाना पालकरांना महाराष्ट्राने न्याय दिला नाही, परंतु परदेशात त्यांचा गौरव झाला. इस्रायलच्या मराठी वस्तीत एका रस्त्याला ‘श्री. ना. ह. पालकर पथ’ असे नाव देऊन नानांच्या ‘छळाकडून बळाकडे’ या पुस्तकाचा गौरव केला गेला आहे. १९६५ साली नानांनी इस्रायलचा, ज्यू जमातीचा अभ्यास सुरू केला. धर्मवेड्या ख्रिश्चनांच्या जाचाला कंटाळून आपल्या मातृभूमीतून परागंदा झालेल्या ज्यूंचा हा इतिहास. चारही बाजूने वेढलेल्या अरबांच्या उद्दामपणाला आणि उपद्रवांना तोंड देऊन स्वतःच्या भूमीत स्वराष्ट्र उभे करण्याचे १८०० वर्षांचे स्वप्न साकार करण्याच्या विजयाचा इतिहास. अनैसर्गिक फाळणीतून अखंड भारत निर्माण करण्याचा संकल्प उराशी बाळगण्याच्या पार्श्वभूमीवर लिहिलेला हा ग्रंथ पुरोगाम्यांना पचणे तसे अवघडच. नानांच्या जन्मशताब्दी वर्षात याचा दिमाखाने प्रचार आणि प्रसार होणे उचित ठरले.

 

अखंड परिश्रमांमुळे देहाची साथ त्यांना मिळत नव्हती, परंतु समाजाची परिस्थिती झपाट्याने बदलत होती. त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढत होती. भाषा-प्रांत यांच्या अस्मितेच्या चळवळीने सामाजिक तणाव वाढत होते. काश्मीर घाटीत असंतोष धुमसत होता. मुसलमानांची मुजोरी वाढत होती. पोपच्या आगमनाच्या निमित्ताने ख्रिश्चन समाजाने युकॅरिस्ट काँग्रेसचे भव्य प्रदर्शन केले. सरकारने त्यांना पाठिंबा दिला. राज्यकर्ते धर्मप्रमुखांचा सत्कार, गौरव करून ख्रिस्तीकरणाला हातभार लावत होते. चीनच्या आक्रमणाने समाज दिङग्मूढ झाला होता. नानांचा संताप शिगेला पोहोचला होता. संघासमोर परिस्थितीचे आव्हान होते. संघ स्वयंसेवकांची विश्वासार्हता वाढविण्याची गरज होती, कार्यकर्त्यांचा पीळ काहीसा सैल झाला होता. दैनंदिन शाखांची कार्यक्षमता वाढविण्याची गरज होती. नानांचे विचारचक्र सुरू झाले. संघकार्य horizontal व vertical वाढविण्याची योजना बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मा. मोरोपंत पिंगळे यांना नाना पालकरांच्या नाजूक प्रकृतीचे भान होते. नानांच्या अस्वस्थतेची जाण होती. नानांनी प्रांत बौद्धिक प्रमुखाची जबाबदारी घेतली. मोरोपंतांवरील ताण थोडा कमी झाला. नानांच्या प्रवासाला गती मिळाली. ढासळणाऱ्या प्रकृतीची पर्वा न करता नाना प्रांतभर फिरले. नकळत जबाबदारी वाढली. नाना पालकर महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह झाले.

 

१९६६ च्या नोव्हेंबर महिन्यातील अखिल भारतीय बैठकीतील उत्साह वाढविणाऱ्या घटनांचा उल्लेख करून आगामी चार-पाच वर्षांत परिस्थिती बदलेल, हा विश्वास देऊन सर्वच क्षेत्रात देदीप्यमान यश येत आहे. हे सांगताना नाना म्हणत की, “विरोधकांच्या कागाळ्या बंद होतील. समाजहितैषी मंडळी पुढे सरसावतील. आपण कार्यकर्त्यांनी एकाच दिशेने, एकदिलाने पुढे गेले पाहिजे. देशाचा वैभवकाळ दूर नाही,” याची ते ग्वाही देत होते. “संघाच्या कामाचा व्याप वाढेल. तो सांभाळण्यासाठी दैनंदिन शाखा, बाल शाखांवर भर दिला पाहिजे,” असे त्यांचे मत होते. प्रकृती बिघडल्याने प्रवास रद्द झाला तर ते दुःखी होत. भूक मंदावली, जिभेला रुची नाही, तापाने होते नव्हते ते सर्व चैतन्य निमाले. नानांना कावीळ झाली. पोद्दार हॉस्पिटलमध्ये नाना भरती झाले. तज्ज्ञ डॉक्टरही हरले. पू. गुरुजी तीन दिवस सकाळ-संध्याकाळ नानांची विचारपूस करण्याकरिता हॉस्पिटलमध्ये येत. नानांचा उत्साह टिकविण्याचा प्रयत्न करीत. रामनारायण शास्त्री यांच्या औषध योजनेलाही यश आले नाही. दोन-तीन महिन्यातच हा धगधगता अग्नी थंड झाला. तो दिवस होता १ मार्च १९६७ .

 

केवळ ४९ वर्षे, हे काही जाण्याचे वय नाही. पू. डॉ. हेडगेवारांनी पन्नाशी ओलांडली नाही, शिवछत्रपतींनाही पन्नाशीतच जगाचा निरोप घ्यावा लागला. शंकराचार्यांना, स्वामी विवेकानंदांना तर पन्नाशीही गाठता आली नाही. मग रक्तमांसांच्या शरीराची त्याच्यापुढे काय टाप? मातृभूमीच्या चरणी वाहिलेले त्यांचे जीवनपुष्प पावन झाले. इतरांचे संसार उभे करताना, खस्ता काढताना ‘मी’पण विसरलेले स्व. नाना पालकर अमर झाले!

 

- डॉ. पां. रा. किनरे

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@