॥बहिणी म्हणे येती सुखाचे डोलावे॥

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018
Total Views |


 

सामान्य माणसापेक्षा अगदी आगळा असणारा बहिणाबाईचा जीवनप्रवास. स्थैर्य नसलेला. अस्थिर असलेला हा प्रवास. हक्‍काचं घर नसलेला हा प्रवास. माथ्यावर सावली नसली तरी भगवंतांची घनदाट सावली लाभलेला हा प्रवास. सामानाचं ओझं नाही की भार नाही. सगळा भार भगवंतावर सोपवलेला प्रवास! प्राक्तनाची पडणारी पावलं, त्याला परमार्थाची भक्कम साथ लाभून जीवनप्रवास सुखाचा करणारी बहिणा!

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

महाराष्ट्राच्या भूमीत भक्तीचा मळा सदैव फुलला! मळ्यामध्ये श्रद्धा, निष्ठा मुरत गेली. ज्ञान वैराग्यानं तो अधिकच देखणा झाला. कर्मामध्ये रमताना निष्काम कर्मयोगाचा सुगंध सर्वत्र दरवळलेला! भक्तीचा मळा फुललेला व बहरलेला ठेवण्यासाठी संतांची मांदियाळी प्रकटलेली! वारा भक्‍तिगीताच्या तानावर ताना घेण्यात रंगलेला! आकाशात मृदंग, नगारे निनादलेले! सकल सृष्टी परब्रह्माशी ऐक्य साधून निमग्न झालेली! अशा उत्कृष्ट क्षणी आगळीवेगळी बालिका भूलोकी अवतरली. अत्यंत तेजस्वी ओजस्वी बालिकेचं मातृत्त्व ‘जानकी’ला लाभलं, तर ‘आऊजी कुलकर्णी’ यांना पितृत्त्व प्राप्‍त झालं.

 

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ‘देवगाव’स्थानी प्रकटलेली बालिका म्हणजे ‘बहिणाबाई.’ बहिणाबाईंचा काळ तीनशे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा. काळानुसार साधारणपणे पाच वर्षे वयाच्या निरागस बालिकेचा बिजवराशी विवाह लावलेला. मूळातच सात्त्विकता लेवून आलेली बहिणाबाई, भक्‍तिमार्गामध्ये सहजपणानं रमली. प्रपंचापेक्षा परमार्थाकडे पहिल्यापासून ओढ असलेली बहिणाबाई!

 

अत्यंत सरळ मनाची. वास्तव जीवनाला सरळपणानं समोरी जाणारी. जाणत्या वयात निर्विकारपणानं आपल्यापेक्षा खूप जास्त वय असलेल्या पतीचा स्वीकार करणारी बहिणाबाई समंजस, सालस, सत्त्वगुणी बहिणाबाई. अत्यंत कर्मठ शास्त्राचा अभ्यास केलेले विद्वान पती. ती रत्नाकर पाठकांच्या म्हणजे पतीच्या संदर्भात अभिमानाने कथन करते,

 

द्वितीय संबंधी वरुषा तिसाचा।

नोवरा भाग्याचा ज्ञानवंत॥

 

तिचा समंजसपणा, पतीसंबंधी गुणगौरव करण्याची वृत्ती, अचंबित करणारी. प्रत्येक गोष्टीमधून तिचं वैशिष्ट्य लक्षात येतं. तक्रार, कुरकुर, असमंजसपणा, त्रागा, उद्वेग नाही. प्राप्‍त परिस्थितीचा सहजपणानं स्वीकार करणं, जमवून व जुळवून घेण्याची वृत्ती. ‘स्त्री स्वातंत्र्या’चे ढोल-ताशेरे नाहीत की नैराश्याचे गडद ढगही नाहीत. माता-पित्यांना दोष देऊन हैराण करणं नाही. ते माता-पिता आणि पती किती भाग्यवान! पती आणि पित्याच्या म्हणजे दोन्ही घराण्याचा, कुळाचा उद्धार करणारी बहिणाबाई. वयापेक्षा लवकर परिपक्‍व झालेली. सगळी सुलक्षणं हिच्याठायी एकवटलेली. शिवाला साक्षी ठेवून केलेल्या पित्याच्या अनुष्ठानाला बहिणाबाईच्या रूपात फळ प्राप्‍त झालेलं. पार्वतीचं सत्त्व लेऊन आलेली कन्या सुलक्षणी असणं स्वाभाविक!

 

पिता आऊजी हे भाऊबंदकीच्या अतिरेकानं आणि कलहानं शेतीवाडीला-घरादाराला पारखे झालेले. बंदीवास नशिबी आला. अशा संकटसमयाला कोणाचा आधार नाही, अशा असहाय्य परिस्थितीत व्यवहारकुशल अशा चाणाक्ष जावयाची आठवण झाली, ‘रत्नाकर.’ जावयाला निरोप पाठवताच जावई धावत आला. देवगावातून एका रात्री बहिणाबाई, रत्नाकर माता जानकी आणि पिता आऊजी पळाले. भिक्षा घेत घेत प्रवास चालू झाला. नरसिंहाचे दर्शन घेण्यासाठी नरानरसिंहपूरला आले. पंढरपूरला कटीवर हात ठेवून विटेवर उभ्या असलेल्याविठ्ठलाला डोळे भरून बघितल्यावर बहिणाबाई सुखावली. हे परब्रह्म युगानुयुगे भक्‍तांच्या भेटीसाठी तिष्ठत उभे असलेलं बघून ती गहिवरली. चंद्रभागेचं मन भरून आले. कृष्णमेघांची दाटी झालेलं... ओथंबलेलं आभाळ... अंर्तबाह्य भक्‍ती झिरपू लागली. शिखरशिंगणापूरचा शंभू महादेव. सगळ्यांचा भोळा महादेव. त्याच्यावर अष्टसात्त्विक भावांचा अभिषेक बहिणाबाईने नाही केला तर नवल! सत्व, रज आणि तम गुणाचं बिल्व अर्पण करण्याची ओढ अनाकलनीय होती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल मन:स्थिती ठेवणारी बहिणा. भक्‍तिप्रवण मार्गावर जाताना सुखावणारी!

 

रहिमतपूरला काही दिवस मुक्काम करून पुढे कोल्हापूरवासी अंबाबाईनं बोलावून घेतलं. जे घडतं ते भंगवाताच्या इच्छेनं हा विश्‍वास दिला. भिक्षा मागून पोट भरणं, पायी प्रवास करणं या प्रारब्धाचा स्वीकार करणारी बहिणा. भिक्षावृत्तीने जीवन जगताना ही विरक्‍ती अधिक तेजाळली. भिक्षापात्र मंदिर असलेली करविरनगरी!

 

आयुष्याचा एका तपाचा काळ उलटल्यावर परमार्थप्रवण वृत्ती पूर्णपणे परब्रह्ममय होऊन गेली. तपाचा सुपरिणाम सात्त्विकतेच्या आचरणातून प्रतीत होऊ लागला.

 

सामान्य माणसापेक्षा अगदी आगळा असणारा बहिणाबाईचा जीवनप्रवास. स्थैर्य नसलेला. अस्थिर असलेला हा प्रवास. हक्‍काचं घर नसलेला हा प्रवास. माथ्यावर सावली नसली तरी भगवंतांची घनदाट सावली लाभलेला हा प्रवास. सामानाचं ओझं नाही की भार नाही. सगळा भार भगवंतावर सोपवलेला प्रवास! प्राक्तनाची पडणारी पावलं, त्याला परमार्थाची भक्कम साथ लाभून जीवन प्रवास सुखाचा करणारी बहिणा!

 

मनाने मवाळ व अंतःकरणाने उदार असणाऱ्या ‘हिरंभटा’नं संपूर्ण कुटुंबाला आश्रय दिला. शास्त्राचे अध्ययन आणि अध्यापन करणारे हिरंभट. प्रत्येक मुक्‍कामी बहिणाबाई पारमार्थिक जीवनाचे धडे गिरवत होती. जीवनाची नश्‍वरता, परब्रह्माची सत्यता ही जयराम स्वामींच्या कीर्तनामधून ठसत गेली. जयरामस्वामी वडगावकर या साधुपुरुषाच्या सहवासाचा लाभ झालेली बहिणा. भागवत कीर्तन, पुराणं, पारायण श्रवणामधून बहिणाबाईला ज्ञानाची दृष्टी लाभली. परमार्थ पुष्ट करणारा कोल्हापुरातील पुण्यमय काळ!

 

स्वप्नदृष्टांतानुसार दानात मिळालेली सवत्स धेनू हिरंभटाने रत्नाकराला म्हणजेच बहिणाबाईच्या पतीला दिली. या गाय आणि वासराच्या आगमनाने तिच्या आयुष्यानं वेगळ वळण घेतलं. तिचं भावविश्‍वच बदलून गेलं. तिला या गाय-वासराचा विलक्षण लळा लागला. वासराशिवाय बहिणाबाईला चैन पडेना. वासरु सावलीसारखं तिच्यासमवेत वावरायचं. कथा-कीर्तन, पुराणश्रवणाला गेलेल्या बहिणेबरोबर वासरुदेखील जायचं. माणसाप्रमाणे श्रवण करणारं वासरु! श्रवण करताना कथेनं डोळ्यात पाणी येणारं वासरु! गोसावी, कीर्तनकारांच्या पायावर डोकं ठेऊन नमस्कार करणारं वासरु!

आरती जालिया नमस्कार होती।

आपणही क्षिती ठेवी डोके ॥

अशा परमेश्वरपदी लीन झालेल्या व योगभ्रष्ट वासराला कीर्तनाला खूप गर्दी झाली, म्हणून लोकांनी त्याला सभामंडपाच्या बाहेर काढलं. ते बाहेर ओरडून आकांत करायला लागलं. ते ऐकून कीर्तनामध्ये बहिणाबाई रडू लागली. गोंधळ वाढला. शेवटी वासराला बहिणेपाशी बसू दिलं. हा प्रसंग लोकांनी तिच्या पतीला कुत्सितपणानं, तिखट मीठ लावून सांगितला. पतीचा पारा चढला. त्याने बहिणाबाईस खूप मारलं. त्या क्रोधातून वासरु सुटले नाही.

गाय-वासरु हंबरु लागली. वासराचा जीव कासावीस होऊ लागला. बहिणाबाईला मार असह्य झाला. अतिक्रोधाचा भडका उडाला. त्यामध्ये माणुसकी व प्रेम जळून खाक झाले. अविवेक जागृत होऊन अत्याचार सुरू होतात ना! माणूस हैवान, राक्षस होतो. पतीच्या माराने गाय व वासराचा अंत:करण भेदून टाकणारा हंबरडा फोडणं... याने बहिणा बेशुद्ध झाली. गाय-वासरानं चारा-पाणी सोडून दिलं. इकडे बहिणाबाई मनानेदेखील खंगली. वासराची आणि बहिणेची ताटातूट झाली. वासरु डोळ्यात प्राण आणून बहिणेची वाट बघत होतं. तिच्या मांडीवर प्राण सोडण्याआधी हिरंभटांनी म्हटलेल्या,

 

‘मूकंकरोति वाचालम्’ हा श्‍लोकाचा पुढचा भाग- ‘यत्कृपा तमहं वंदे परमानन्द माधवम्।’ हे वासरानं म्हटलं. हा चमत्कार अनेक लोकांनी बघितला आणि ऐकला. एका पशूयोनीमध्ये जन्मलेल्या वासराचं बहिणेवर असणारं प्रेम... त्याचं नमस्कार करणं... कीर्तन, प्रवचन श्रवण करणं... श्लोक पूर्ण करणं... बहिणाबाईच्या दु:खाने देहत्याग करणं हे सगळं गूढ. अनाकलनिय! चमत्कार घडला, योगभ्रष्टाचं (वासरु) अनुष्ठान पूर्ण होऊन आत्मा व परमात्मा एक झाला. वासराचा अंत्यसंस्कार पवित्र वातावरणात जयराम स्वामींच्या सांगण्यानुसार केला गेला. ही लोकविलक्षण घटना बहिणाबाईच्या जीवन प्रवासामध्ये घडली. बहिणाबाई स्वप्नामध्ये “सावध होऊन विवेकाची कास धरली की कल्याण होईल,” हा संदेश देणाऱ्या ब्राह्मणामुळे ती अंर्तबाह्य बदलली.

 

समर्थ रामदास स्वामींचा ब्राह्मणवेशात संदेश, जयराम स्वामींचं वेळोवेळी सांभाळणं, हिरंभटाचं कनवाळूपणाने आधार देणं या महत्त्वपूर्ण घटनांनी भरलेलं बहिणाचं जीवन! जयराम स्वामींच्या कीर्तनानं तुकाराम महाराजांची म्हणजे गुरूभेटीची ओढ लागली. बहिणाबाई तुकारामांचा अनुग्रह प्राप्त होऊन मोक्ष प्राप्त व्हावा, यासाठी तळमळू लागली. अखेरी गुरूभेटीची पहाट झाली. तुकाराम महाराजांनी स्वप्नात मस्तकावर हात ठेवून मंत्र दिला. गुरूमंत्र, गुरूउपदेश, गुरूबोध या तीन ‘गु’मुळे तिच्या अवघ्या जीवनात सुंदर बदल घडून आला. तिच्या वाणीतून स्फुरलं,

 

ठेवोनिया कर मस्तकी बोलीला।

मंत्र सांगितला कर्ण रंध्री॥

 

तिच्या पारमार्थिक प्रगतीचा लक्षवेधी प्रवास! तिच्या प्रगतीमुळे पतीचा अहंकार दुखावला. तिचं महत्त्व सहन होईना. त्याला वेदांताचा अहंकार झाला. त्यानं बहिणाला सोडून जाण्याचं ठरवलं. परंतु ‘पती हाच परमेश्वर’ समजून बहिणानं विरोधालाच साधन करण्याची कसरत यशस्वी केली.पतीच्या अंगाचा सात दिवस दाह होऊन पांडुरंगाला शरण जाणं, तुकारामांच्या दर्शनाला देहूला जाणं, अवघं कुटुंब देहूमध्ये तुकारामाच्या सेवेत राहणं या सगळ्या घटना घडवणारा, परीक्षा घेणारा आणि परमार्थाची शक्ती देणारा परमात्मा श्रेष्ठ आहे. सद्‍गुरु सर्वश्रेष्ठ आहे. सद्‍गुरु तुकारामांच्या निर्वाणानंतर तिचं पुनश्च शिरुर स्थानी परत येणं!

संत स्त्रीचा जीवनप्रवास शब्दात मांडणं अवघड. जुना काळ, परंपरा, रूढी व बंधन यामध्ये बंदिस्त स्त्री जीवन. यामध्ये पतीचा क्रोध, अहंकाराचे आसूड तना-मनाला जखमी करून गेला. संघर्ष व छळ यामधून पुढे सरकणारे जीवन. सद्‍गुरु प्राप्तीमुळे पारमार्थिक साधना फळाला आली. स्वप्नांचा सुरेख संगम! स्वप्नदृष्टांतामधून पुढचा प्रवास घडला. यशस्वी प्रवासाचा मार्ग स्वीकारला. पतीची सेवा, मर्जी सांभाळत सांभाळत साधलेली उच्चतम पारमार्थिक पातळी. गुरूपरंपरा, गुरूशक्ती, गुरूबोध यांमधून शुद्ध व खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली. ज्ञानपण, ब्रह्मकर्मपर अभंगाचं स्फुरणं. ‘वज्रासुविकोपनिषद’ याचा अनुवाद करणारी क्रांतिकारक संत स्त्री! स्वत:चा मृत्यू ज्ञात असणारी! पुत्र विठोबा याला आपले तेरा पूर्व जन्म सहजपणानं सांगणारी बहिणा!

 

आपले आपण देखिले मरण।

तो झाला शकुन स्वानंदेशी ॥

उभारिली गुढी मनाच्या शेवटी।

झाली मज भेटी आत्मारामी ॥

 

असं अभंगातून आत्मानुभव देह ठेवण्याआधी सांगणारी संत तुकाराम महाराजांची शिष्या असलेली बहिणाबाई! स्त्री संताच्या महत्त्वपूर्ण मांदियाळीमधील बहिणाबाई! गाय-वासराशी असलेल्या गूढ नात्यामुळे इतर संतांमध्ये लक्षात राहणारी! जिच्या नावात बहिण आणि बाई ही नाती स्पष्ट होतात. बहिणीप्रमाणे माया करणारी. प्रेमळपणाचा उच्चांक! प्रेमाची व्याप्ती विस्तारत जाऊन ब्रह्मांडापर्यंत घेऊन जाणारी! बाई शब्दातून तिचं समाजातलं स्थान हे मर्यादा सुचवतं! परंतु या सगळ्याच्या पल्याड असणारं अनंत परमार्थाचं अलौकिक सामर्थ्य अंगी मुरवून आत्मानंदात निमग्न असणारी! सामान्य आणि संतापर्यंतचा अवघड प्रवास कथन करणारा हा जीवन प्रवास! लौकिक सांभाळून पारलौकिक साधणारी बहिणाबाई! संतत्व हे अंर्तमुख करणारं व आत्मारामापर्यंत घेऊन जाणारं हे नक्की! अवघ्या वसुंधरेवर भक्तीचा मळा फुलवत ठेवणारी बहिणाबाई! भक्ती, तृप्ती, शांती व परमशांती याचं भरभरुन पीक काढणारी ! भक्तीचा मळा लावणारी, शिंपणारी व फुलवणारी बहिणाबाई!

 

-कौमुदी गोडबोले

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@