राज्यात सरासरीच्या ९१ टक्के पाऊस; तर जलाशयांमध्ये ५९ टक्क्यांपेक्षा जास्त साठा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
खरीप हंगामात 94 टक्के क्षेत्रावर पेरणी
मुंबई : राज्याच्या सर्व भागात मान्सून सक्रीय झाला असून राज्यात 1 जून ते 21 ऑगस्ट या कालावधीत सरासरी 757.7 मि.मी. म्हणजेच एकूण सरासरीच्या 91.1 टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील जलाशयांमध्ये 59.17 टक्के साठा निर्माण झाला असून खरीप हंगामात 94 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
 
 

राज्यातील 14 जिल्ह्यांत 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस
 
 
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसाच्या नोंदीनुसार 14 जिल्ह्यांमध्ये 100 टक्के पेक्षा जास्त पाऊस पडला असून त्यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 18 जिल्ह्यांमध्ये 75 ते 100 टक्के यादरम्यान पावसाची नोंद झाली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच 50 ते 75 टक्के पावसाची नोंद झालेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
 
खरीप हंगामात 94 टक्के क्षेत्रावर पेरणी
 
 
राज्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) 140.69 लाख हेक्टर असून 16 ऑगस्ट 2018 अखेर 132.85 लाख हेक्टर क्षेत्रावर (94 टक्के) पेरणी झाली आहे. तसेच ऊस पिकासह असणाऱ्या 149.74 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 134.69 लाख हेक्टर म्हणजेच 90 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात 30 लाख 78 हजार 135 हेक्टर क्षेत्रावर तृणधान्ये, 20 लाख 28 हजार 370 हेक्टरवर कडधान्य आणि 41 लाख 16 हजार 513 हेक्टरवर तेलबिया पिकाची प्रत्यक्ष पेरणी-लागवड करण्यात आली आहे. तसेच 40 लाख 62 हजार 387 हेक्टरवर कापूस आणि 1 लाख 83 हजार 875 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे.
 
 
राज्यात भात व नाचणी पिकांच्या पुनर्लागवडीची कामे अंतिम टप्प्यात असून पिके वाढीच्या ते फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहेत. पेरणी झालेल्या पिकांमध्ये आंतर मशागतीची व पिक संरक्षणाची कामे सुरु आहेत. काही भागात कापूस पिकावर झालेल्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 20 जिल्ह्यांसाठी 4 लाख 20 हजार सापळे व 12 लाख 42 हजार ल्युअर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. बोंडअळी नियंत्रणांतर्गत किटकनाशकांसाठी 8 कोटींची तरतूद करण्यात आली असून कीड व्यवस्थापनासाठी अतिरिक्त 17 कोटी देण्यात आले आहेत.
 
जलाशयांमध्ये 59 टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा
 
 
राज्यातील जलाशयात 21 ऑगस्ट 2018 अखेर 59.17 टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच सुमारास 54.54 टक्के साठा होता. यावर्षी आणि गेल्या वर्षीचा तुलनात्मक पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. सर्वाधिक जलसाठा कोकण विभागात 90.38 टक्के (91.52) इतका उपलब्ध आहे. तसेच पुणे विभागात 80.50 टक्के (73.79), नाशिक विभागात 54.57 टक्के (61.19), अमरावती विभागात 45.85 टक्के (22.10), नागपूर विभागात 41.94 टक्के (23.99) आणि मराठवाडा विभागात 22.31 टक्के (29.34) इतका साठा उपलब्ध आहे.
 
 
राज्यात 593 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा
 
 
राज्यात 13 ऑगस्ट 2018 अखेर एकूण 593 टँकर्सद्वारे 567 गावे आणि 341 वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 334 गावे आणि 14 वाड्यांना 361 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील 39 गावे आणि 5 वाड्यांसाठी 54 टँकर्सचा पुरवठा करण्यात येत आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@