पडझडीतील दुरुस्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018
Total Views |



‘ईडी’ने अहमद पटेलांवर केलेले गंभीर आरोप आणि काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदी राहुल गांधींनी केलेली त्यांची निवड. सुमार लोक चाटूगिरी करून पदे कशी मिळवितात, हे याचे उत्तम उदाहरण मानावे लागेल.

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
 

अहमद पटेल आता काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष असतील. विद्यमान अध्यक्ष आणि गांधी परिवाराचे वारस असलेल्या राहुल गांधींनी आपल्या परदेश दौऱ्यापूर्वी काँग्रेस पक्ष संघटनेच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत, त्यातली ही एक महत्त्वाची घोषणा. भारतात त्यांच्या पक्षाची इतकी जबरदस्त पडझड होत असताना परदेशात जाऊन राहुल गांधी परदेशस्थ भारतीयांना काय सांगणार, हा प्रश्‍नच आहे. पुन्हा परदेशस्थ भारतीयांवर नरेंद्र मोदींची जादू इतकी जबरदस्त आहे की, तिथे जाऊन राहुल गांधींच्या पदरात काय पडेल हे वेगळे सांगायला नको. मात्र, काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने ती महत्त्वाची घोषणा आहे, कारण आज स्वातंत्र्यलढ्यापासून गावखेड्यापर्यंत जाऊन पोहोचलेला हा पक्ष. आज पक्षाला प्रभावशाली नेता नसला आणि तुष्टीकरणाच्या नीती आणि घराणेशाहीने काँग्रेस पक्ष पोखरलेला असला तरी राजकीयदृष्ट्या काँग्रेसला कधी ना कधी तरी वैभवशाली कालखंड होता. १९९६ साली अटल बिहारी वाजपेयी भाजपमधून आलेले पहिले पंतप्रधान झाले. त्यानंतर १३ महिन्यांचे आणि मग सलग पाच वर्षांचे सरकार त्यांनी चालविले. या दरम्यान काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षात जे सुरू होते, ते अतिशय उबग आणणारे होेते. कधीकाळी कार्यकर्त्यांनी त्यागाने आणि बलिदानाने उभा केलेला हा पक्ष एका परिवाराच्या गोठ्यात गुरासारखा बांधला गेला. इंदिरा गांधी व संजय गांधींच्या अकाली मृत्यूनंतर व राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर काँग्रेसवरचा परिवाराचा शिक्‍का पुसला जातो की काय, अशी शक्यता असतानाच काँग्रेसमधल्या शह-काटशहाच्या राजकारणाने सोनिया गांधींच्या रूपाने गांधी परिवाराला पुन्हा सक्रिय केले. खरेतर नरसिंह राव पंतप्रधान असतानाच काँग्रेसमधल्या एका मोठ्या गटाने नरसिंह राव यांना शह देण्यासाठीच सोनिया गांधींना पुन्हा सक्रिय राजकारणात ओढले. तोपर्यंत देशावरचे गांधी परिवाराचे गारुड कायम होते आणि या भावनेचा काँग्रेसमधल्या धूर्त मंडळींनी उत्तम उपयोग करून घेतला. या सुमार मंडळींचे एक असते. ते सगळे एकत्र येतात आणि परिस्थितीचा भास असा काही निर्माण करतात की, त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, असे भल्याभल्यांना वाटायला लागते. अहमद पटेल हे त्यापैकीच. आणीबाणीच्या गडबडीत गुजरातहून लोकसभेत पोहोचले ते अहमद पटेल. अहमद पटेलांनी अत्यंत चाणाक्षपणे गांधी परिवाराशी जवळीक साधली. आपल्या पहिल्याच विजयानंतर त्यांनी थेट इंदिरा गांधींना गाठले. हा सगळाच कालखंड इंदिरा गांधींसाठी अवघड होता.

 
स्वातंत्र्यलढ्याची पार्श्‍वभूमी पाठीशी असलेल्या सगळ्याच काँग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधींविरुद्ध कंबर कसली होती आणि तशी जाहीर विधानेही करायला सुरुवात केली होती. अहमद पटेलांनी ही इंदिरा गांधींची नाजूक बाजू बरोबर ओळखली आणि त्यांना अत्यंत आत्मविश्‍वासाने सांगितले की, “काँग्र्रेसला तुमच्याच नेतृत्वाची खूप गरज आहे.” या गडबडीत इंदिरा गांधींचा राजकीय चढउतार होतच राहिला. मात्र, अहमद पटेलांनी आपली जागा गांधी परिवाराच्या नजीक पक्की करून घेतली. इंदिरा गांधींनंतर ते राजीवना जाऊन चिकटले आणि नंतर सोनिया गांधींशी त्यांनी जवळीक साधली. शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख असे महाराष्ट्रातून व अन्य राज्यांतूनही लोक येत राहिले. पण, अहमद पटेलांच्या तोडीचा कुणीही आला नाही. याचे मुख्य कारण मंत्रिपदाची घाई त्यांनी कधीच केली नाही. सावकाशपणे पक्ष मात्र त्यांनी ताब्यात घेतला. सरकार, पक्षीय राजकारण यांच्याबाबत त्यांनी कधीही कुठलीही जबाबदारी घेतली नाही. मात्र, राजीव गांधी ते राहुल गांधी व्हाया सोनिया गांधी अशा सगळ्यांचीच जवळीक साधण्याचा राजमार्ग त्यांनी स्वीकारला आणि त्यातून सत्ता व पक्ष यांच्यावर आपली पकड मजबूत केली. काँग्रेस पक्षात ते सोनिया गांधींचे राजकीय सचिव होते. आता मोतीलाल व्होरा या ज्येष्ठ नेत्याच्या ठिकाणी त्यांची वर्णी खजिनदार म्हणून लागली आहे. या घोषणेपूर्वीचा घटनाक्रम अहमद पटेलांचे उपद्रवमूल्य सांगणारा आहे. युपीएचे सरकार असताना अहमद पटेलांचे महत्त्व काय होते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. नुकताच ईडीने त्यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप केला आहे. ‘स्टर्लिंग बायोटेक’ या कंपनीने प्रामुख्याने आंध्र बँकेकडून व अन्य बँकांकडून कर्ज घेतले. हे कर्ज पाच हजार कोटींचे आहे व ते फेडणे आता या समूहाला मुश्किल झाले आहे. या कर्जाच्या माध्यमातून या समूहाने दिल्लीत अन्य मालमत्ता विकत घेतल्या. या सर्व प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे व ईडी या प्रकरणाची चौकशी करीत आहे. या सगळ्या भानगडीत अहमद पटेल यांचा वरदहस्त मिळवूनच सरकारी बँकांना चुना लावण्याचे उद्योग झाल्याचे समोर येत आहे. आपल्या अधिकृत निवासस्थानीच त्यांनी पंचवीस लाखांची लाच स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अहमद पटेलांच्या जावयावर अशाच प्रकारचे गंभीर आरोप यापूर्वी करण्यात आले होते. आता काँग्रेसची सगळी धुरा अशा माणसाच्या हाती आली आहे. अहमद पटेल यांच्याकडे काँग्रेसचे कोषाध्यक्षपद आल्यानंतर दिल्लीत त्यांच्यावर बराच मजकूर छापून आला आहे. संसदेच्या कँटीनमध्ये संध्याकाळी पाच वाजता पोहोचणारे अहमद पटेल अनेकांना याच ठिकाणी भेटतात. मुळात घराणेशाहीने काँग्रेसला पोखरले आहे. कर्तृत्वहीन माणसे एकामागोमाग एक उरलीसुरली काँग्रेस संपविण्याच्या मागे आहेत. मोतीलाल व्होरा काय किंवा अहमद पटेल काय, हे सगळेच एकाच माणेचे मळी. कुणाकडूनही मोठ्या कर्तृत्वाची अपेक्षा ठेवता येणार नाही. देशभरातल्या एका कुटुंबाची मालकी असलेल्या पक्षांचे नीट निरीक्षण केले, तर त्या पक्षाच्या घराण्याची दुसरी-तिसरी पिढी आपापल्या पक्षाची वासलात लावण्याच्या उद्योगात अनभिज्ञपणे लागल्याचे दिसेल. काँग्रेसच्या पडझडीत केलेली ही डागडुजी काँग्रेसची बुडती नौका सावरू शकणार नाही, हेच खरे.
 
 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
@@AUTHORINFO_V1@@