विश्वकोशाच्या दुसऱ्या टप्प्यात ४६ ज्ञानमंडळे कार्यरत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018
Total Views |

 
 
मुंबई : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा कालावधी पूर्ण होत असून या कालावधीत विश्वकोश मंडळाची ४६ ज्ञानमंडळे कार्यरत आहेत. हे मंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी विश्वकोश निर्मितीच्या २० खंडांचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता. दुसऱ्या टप्प्यामध्ये या २० खंडांतील नोंदणीचे अद्ययावतीकरण आणि त्यात नोंदींची भर टाकण्याचे काम होते. नोंदींचे अद्ययावतीकरण करीत असताना काही जुन्या कालबाह्य नोंदी रद्द करणे, जुन्या नोंदींमध्ये आवश्यक तिथे भर टाकणे व नव्या विषयांच्या नोंदी लिहून घेणे, असे कामाचे स्वरूप होते.
 
 
हे काम जलदगतीने, विकेंद्रित पद्धतीने आणि नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यासाठी ज्ञानमंडळाची संकल्पना कार्यान्वित केली गेली. या संबंधीची पार्श्वभूमी स्पष्ट करताना विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर म्हणाले की, “विश्वकोशाच्या कार्यात महाराष्ट्रामधील विविध विद्यापीठे, संशोधन संस्था आणि विभिन्न क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्था यांचा सहभाग मिळाला. तसेच त्यांच्याशी सामंजस्य करारदेखील करण्यात आले. एकूण विश्वकोशातील विषयांसाठी ६० ज्ञानमंडळांची योजना आखण्यात आली असून त्यापैकी ४६ ज्ञानमंडळे कार्यरत आहेत.” सदर ज्ञानमंडळात समन्वयक, तज्ज्ञ सदस्य आणि विषयपालक या घटकांचा समावेश आहे. हे सर्व तज्ज्ञ विश्वकोशीय लेखन-समीक्षण प्रक्रियेत कार्यरत असतात. या संस्थांमध्ये मुंबई येथील मुंबई विद्यापीठ, रचना संसद, रसायन तंत्रज्ञान संस्था, मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भारती, प्रभात चित्र मंडळ इत्यादी, तर पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डेक्कन कॉलेज, अभियांत्रिकी महाविद्यालय, मराठी साहित्य परिषद, भास्कराचार्य प्रतिष्ठान, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था इत्यादी; कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, देवल क्लब इत्यादी; अमरावती विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक इत्यादींचा समावेश आहे. विश्वकोश मंडळाने आत्तापर्यंत विविध संस्थांशी २६ सामंजस्य करार केले आहेत. तसेच, मानव्यविद्या आणि विज्ञान व तंत्रविद्या या दोन शाखांमध्ये अनुक्रमे २९ आणि २० ज्ञानमंडळे स्थापन करण्यात आली आहेत. मंडळाच्या एकूण कामकाजाचा आढावा घेण्यासाठी व पुढील धोरण ठरविण्यासाठी ज्ञानमंडळ बैठकांचे आयोजन करण्यात येते. आत्तापर्यंत १६५ बैठका यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. विश्वकोशीय लेखनाचे प्रारूप समजून देण्यासाठी तसेच नोंद लेखन-समीक्षण आराखडे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुमारे ५४ कार्यशाळा पार पडल्या आहेत. यात सुमारे महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी सहभाग नोंदविला आहे.
 
 
विश्वकोश मंडळाच्या कार्यावर एक दृष्टिक्षेप
 
 

 
 
 
मराठी विश्वकोश उपयोजक (अॅप) ची निर्मिती
 
 
मराठी विश्वकोशाचे सर्व खंड आणि माहितीयुक्त उपयोजक (अॅप) जानेवारी २०१८ मध्ये निर्माण करण्यात आले आहे. बदलत्या काळानुसार वाचकांना मराठी विश्वकोश सहज सुलभ उपलब्ध व्हावा यासाठी मराठी विश्वकोशाच्या प्रकाशित २० खंडांचे उपयोजक (अॅप) तयार करण्यात आले आहे.
 
पेनड्राईव्ह निर्माण
 
सहज आणि सोप्या पद्धतीने वाचकांना विश्वकोश उपलब्ध व्हावा, यासाठी मराठी विश्वकोश सर्व खंड आणि माहितीयुक्त २० खंडांचे पेनड्राईव्ह निर्माण करण्यात आले आहे.
 
 
प्रागैतिहासिक आणि पुरातत्त्व विभागात जवळपास ८० ते ९० नोंदी झाल्या आहेत. पुरातत्त्व आणि प्रागैतिहासिक या काळांचा विचार करण्यात येत आहे. केवळ भारताचा विचार केला, तर १५ लाख वर्षांपासूनचा हा कालखंड असेल. नव्या नोंदींमध्ये जागतिक स्तरावरचाही विचार केला जाणार आहे. जुन्या नोंदींमध्ये काही त्रोटकच नोंदी आहेत आणि उत्खनन झालेल्या काही ठराविकच जागांची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रागैतिहास आणि पुरातत्त्व शास्त्र कसे आहे, त्याचा विकास कसा झाला, उगम कसा झाला, ते शास्त्र म्हणून कसे विकसित झाले आणि त्यात इतर विभागांच्या शास्त्रांचे मिळून हे कसे परिपूर्ण शास्त्र झाले आहे, याची माहिती नव्या नोंदींमध्ये असेल. प्रामुख्याने मानवी उत्क्रांतीसंबंधीच्या काही सुरुवातीच्याच नोंदी आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. मात्र, मानवी संस्कृती जशी बदलत गेली, तशा आता पुढील नोंदी होत राहणार आहेत. 
 
- डॉ. सुषमा देव
पुरातत्त्व आणि प्रागैतिहासिक ज्ञानमंडळ
 
 
 
सामरिक शास्त्र विभागात आता १२३ नोंदी झाल्या आहेत. यापूर्वी काही नोंदी विश्वकोशाला पाठविण्यात आल्या आहेत. काही दिवसांमध्ये त्या नोंदींचे पुनरावलोकन होऊन त्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. या विभागात सर्व सैन्याशी निगडित असलेल्या विभागांमधील अधिकारी वर्गाकडून नोंदी येत आहेत. अधिकारी वर्गाकडून इंग्रजी भाषेत आलेल्या या नोंदींचे मराठीमध्ये भाषांतर करण्यात येते. भाषांतरानंतर आमच्या ज्ञानमंडळाकडून त्यांचे पुनरावलोकन केले जाते आणि त्यानंतरच ती नोंद विश्वकोशाकडे पाठविण्यात येते. या ज्ञानमंडळामध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लढाया, सैन्याचे देश-परदेशातील कर्तृत्ववान नेतृत्व, साधनसामग्री अशा निरनिराळ्या प्रकारचे १० उपविषय असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये सामरिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून भूगोल आणि सामरिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून देश-परदेशात होणारे करार, असे विषयही यामध्ये घेण्यात येत आहेत. जुन्या नोंदींमध्ये सामरिक शास्त्रातील नेतृत्वाच्या काही नोंदी आहेत. लोकांना सामरिक शास्त्राचे ज्ञान मिळविण्यासाठी जुना विश्वकोश अपुरा ठरत होता. म्हणून सध्या लोकांना जास्त माहिती मिळवून देण्यासाठी तो अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.
 
 
- कर्नल पी. पी. मराठे
सामरिक शास्त्र विभाग
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@