पावसाळ्यात किचनमध्ये ‘या’ मसाल्यांचा नक्की वापर करा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |



 


पावसाळ्यात झाडांना पालवी फुटते. सगळीकडे हिरवळ पसरलेली दिसते. बरसणाऱ्या पावसाच्या सरींसोबत गर्मागरम भजी आणि वाफळता चहा घेण्याचा मोह हा होतोच!. पण याच मोहापायी पावसाळ्यात कित्येक तेलकट पदार्थ आपल्या पोटात जात असतात. यामुळे आजारांना आयते आमंत्रणच मिळते. म्हणूनच पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. बदलत्या ऋतुंनुसार जसे आपण आपल्या कपड्यांमध्ये बदल करतो. उन्हाळाला आला की सुती कपडे वापरतो, पावसाळा आला की अडगळीच्या कोपऱ्यात जपून ठेवलेल्या छत्र्या बाहेर काढतो. हिवाळ्यात उबदार कपडे वापरतो. त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन आहारातही बदलत्या ऋतुमानानुसार काही अमूलाग्र बदल करायला हवेत.

  
पावसाळ्यात हे मसाले ठरतील आरोग्यासाठी उपयुक्त!
 
काळीमिरी : काळीमिरी ही आरोग्यास अत्यंत गुणकारी आहे. काळ्यामिरीच्या गुणकारी तत्वांमुळेच तिला पूर्वीच्या काळात ‘काळे सोने’ असेही संबोधले जायचे. काळीमिरीमध्ये फॉस्फरस, मॅगनीज, केरोटिन, सेलेनियम आणि ‘क’ जीवनसत्व भरभरून असते. तसेच यात अँटीऑक्सिडंट्सही असतात. काळीमिरीमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पावसाळ्यात किंचितशी काळीमिरी टाकलेला चहा आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो.

 
 
हळद : बहुगुणकारी हळद तर घराघरात असतेच. हळद ही सगळ्या ऋतुंमध्ये आपण स्वयंपाकात वापरतो. सर्दी, खोकल्याचा त्रास उद्भवल्यास रुग्णाला हळदीचे गरम दूध प्यायला दिले जाते. जखमेवरही प्रथमोपचार म्हणून हळदच लावली जाते. हिंदु धर्मात लग्नविधीतही हळदीला महत्वाचे स्थान आहे. हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेंटरी आणि अँटी कार्सिनोजेनिक तत्व असतात. त्यामुळे हळदीचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्येही हळदीचा वापर केला जातो. पावसाळ्यात स्वयंपाक करताना भाज्यांमध्ये हळदीचा वापर आवर्जून करावा. त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या साथीच्या आजारांपासून सुरक्षा मिळेल.
 
 

 
 
लवंग : पावसात भिजायला तर सर्वांनाच आवडते. पण बाहेर पावसात भिजून आल्यावर मात्र शिंका सुरू होतात. मग होते ती सर्दी, त्यामागून येतो तो खोकला! परंतु या सर्वांवर लवंग खूप उपयुक्त आहे. पावसाळ्यात रोजच्या जेवणात लवंग वापरण्यास सुरूवात केली तर प्रकृतीच्या लहानसहान कुरबुरी उद्भवणार नाहीत.
 

 
 
दालचिनी : दालचिनीमुळे जेवणाला चव तर येतेच पण त्याचबरोबर आरोग्यही उत्तम राहते. रोजच्या जेवणात दालचिनीचा समावेश केल्यास किंवा दालचिनीची पावडर बनून खाल्यास शरीरातील कॉलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. वजन कमी करण्यासाठीही दालचिनी उपयुक्त आहे. पावसाळ्यात दालचिनीचा चहा बहुगुणकारी ठरतो.
 

 
 
आलं : पावसाळ्यात सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय म्हणजे आल्याचा गरम चहा! आलं शरीरातील चयापचय क्रियेचे उत्तम संतुलन राखते.



 

लसूण : लसूण ही ह्रदयासाठी उत्तम आहे. दररोज जेवणात लसूण वापरल्याने ह्रदयविकार होत नाहीत. पावसाळ्यात स्वयंपाकात लसणीच्या जास्तीत जास्त पाकळ्या वापराव्यात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग होत नाही.
 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

- साईली भाटकर

@@AUTHORINFO_V1@@