जिल्हा बँकेचे कर्ज २०१९ मध्ये फिटणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |

मनपाकडून नियोजन, पुढील वर्षी डिसेंबरमध्ये शेवटचा हप्ता

 
जळगाव :
जळगाव महापालिका निवडणुकीतील प्रचारादरम्यान कर्जमुक्ती आणि गाळ्यांचा प्रश्‍न हे दोनच मुद्दे सर्वाधिक चर्चेत राहिले होते. पुढील वर्षी २०१९ अखेर जळगाव महापालिका जिल्हा बँकेच्या (जेडीसीसी) कर्जातून मुक्त झालेली असेल, या दृष्टीने प्रशासनाचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
 
 
जळगाव नगरपालिकेने शहरातील विविध विकासकामांसाठी हुडको आणि जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले आहे. परंतु, त्याची परतफेड अद्यापही झालेली नाही. दोनही संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम फेडण्यास दरमहा ४ कोटी रुपये खर्च होत असल्याने त्याचा परिणाम शहरातील मूलभूत सेवा-सुविधा आणि विकासकामांवर झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही कामे थंडावली आहेत.
 
 
महापालिका निवडणुकीत कर्जमुक्तीचा मुद्दा प्रमुख राजकीय पक्षांनी उचलून धरला होता. हुडको आणि जिल्हा बँक या दोन वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जापैकी जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज डिसेंबर २०१९ अखेर फेडण्याचे नियोजन प्रशासनाचे आहे.
 
 
सन १९९७ ते २००१ दरम्यान ५९ कोटी ३४ लाख रुपये कर्ज घेण्यात आले होते. महापालिका दरमहा मुद्दल व व्याजापोटी १ कोटी रुपयांचा हप्ता जिल्हा बँकेला अदा करीत आहे. जुलै २०१८ अखेर १८३ कोटी ८२ लाख रुपये जिल्हा बँकेकडे जमा करण्यात आले आहेत. ऑगस्ट २०१८ पासून पुढील १७ महिने कर्जफेडीचा हप्ता अदा करणे बाकी आहे. आताच्या नियोजनानुसार, डिसेंबर २०१९ मध्ये शेवटचा हप्ता असेल. त्यानंतर जिल्हा बँकेच्या कर्जातून जळगाव महापालिका पूर्णपणे मुक्त झालेली असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
 
हुडकोच्या कर्जाबाबत निर्णयाची प्रतीक्षा
जळगाव नगरपालिकेने १९८९ ते २००१ दरम्यान शहरातील विकासकामांसाठी हुडकोकडून १४१ कोटी १३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापोटी जुलै २०१८ अखेर ३३९ कोटी २१ लाख रुपये हुडकोला अदा करण्यात आले आहे. मात्र, डीआरटीच्या आदेशानुसार हुडकोला अद्यापही ३४१ कोटी रुपये महापालिकेकडून घेणे आहे. याप्रश्‍नी काय तोडगा निघतो, याकडे महापालिकेचे लक्ष लागले आहे.
गाळेप्रश्‍न, मनपातील रिक्तपदांसह विकासकामांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा
जळगाव : जळगाव महापालिकेची कर्जमुक्ती, गाळेप्रश्‍न आणि रिक्त पदे भरण्यासह विकासकामांबाबत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची मुंबईत बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त चंद्रकांत डांंगे उपस्थित होते.
 
 
या बैठकीबाबत अधिकृतरीत्या मनपाला कोणतीही सूचना नव्हती. शनिवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या बैठकीची वेळ निश्चित करून मनपा आयुक्तांना तत्काळ मुंबईला बोलावून घेतले. त्यानंतर आयुक्त चंद्रकांत डांगे हे मुंबईला रवाना झाले. मुंबईतील बैठकीत जळगाव महापालिकेची कर्जमुक्ती, गाळेप्रश्‍न आणि रिक्त पदे यावर चर्चा झाली.
 
 
मनपावर हुडकोचे १४१ कोटी १३ लाख रुपयांचे कर्ज होते. कर्जाच्या व्याजापोटी आतापर्यंत ३३९ कोटी २१ लाख रुपये हुडकोकडे भरण्यात आले आहेत. तरीही हुडकोला ३४१ कोटी रुपये मनपाकडून घेणे आहेत. याप्रकरणी डीआरटी कोर्टात सुनावणी सुरू आहे. या कर्जाला राज्य सरकारचीही हमी आहे. शासन व महापालिकेची बाजू चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी ज्येष्ठ व अनुभवी वकील देण्याची मुख्यमंत्र्यांनी सूचना केली. या सुनावणीनंतर काय निर्णय होतो? त्यानुसार महापालिकेची पुढील भूमिका ठरेल. गरज भासल्यास केंद्रीय नगरविकास मंत्री यांच्याशीही चर्चा करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शविली. गाळेप्रकरणी तोडगा काढताना न्यायालयाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेण्याचे आणि त्यासाठी विधी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची सूचना महापालिका आयुक्तांना यावेळी करण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@