त्या आल्या... त्यांनी जिंकले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |


 

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक आणि संतसाहित्याच्या अभ्यासक डॉ. अरुणा ढेरे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या कार्यालयाला मंगळवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपादकीय विभागातील कर्मचाऱ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांच्या अवघ्या अर्ध्या तासाच्या उद्बोधक संवादात दै. ‘मुंबई तरुण भारत’चा कर्मचारीवृंद अक्षरश: मंत्रमुग्ध झाला. त्यांच्या ओघवत्या शैलीतील संवादातून साहित्यशैली, लेखन कौशल्य आणि स्त्रीत्वाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी उपस्थितांना मिळाली.
 

अरुणाताईंनी आपल्या साहित्याची छाप अवघ्या महाराष्ट्रातील साहित्यरसिकांच्या भावविश्वावर टाकली आहे. साधी, सरळ, सुटसुटीत तरीही नवतेने भारलेली भाषाशैली हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य ,पण तरीही कुठल्याही साहित्यिकाला लिखाणप्रक्रियेत ‘क्लासेस’ आणि ‘मासेस’चा समतोल साधावा लागतोच, ही बाब अरुणाताईंनी प्रकर्षाने अधोरेखित केली. त्याचबरोबर ‘लिखाणाची प्रेरणा’ आणि ‘लिखाणाची शिस्त’ यांचा समतोल साधण्याची निकडही त्यांनी बोलून दाखविली. हल्ली नवीन साहित्य संशोधनामध्येही त्या संबंधित विषयावर पूर्वी झालेल्या संशोधनाचीच पुनरावृत्ती मोठ्या प्रमाणावर आढळते. संशोधकाला नेमके काय म्हणायचे आहे, त्या विषयावर नेमके त्याचे मत, त्याचा अभ्यास काय सांगतो, याची कमतरता शोधनिबंधात आढळते. त्यामुळे लेखकांना, संशोधकांना भरपूर संदर्भग्रंथांचे वाचन करण्याचा कानमंत्र अरुणाताईंनी यावेळी दिला. इतकेच नाही, तर ”आपण लिहिलेला मजकूर मागे घेण्याची अथवा त्यासाठी माफी मागण्याची वेळ लेखकावर येऊ नये,“ असा सूचक सल्लाही अरुणाताईंनी दिला. साहित्यामधील काव्य हाही एक अभ्यासाचा, चिंतनाचा विषय. काव्यामधील फक्त शब्दप्रयोग नव्हे, तर त्याची श्रवणीयता, सुश्राव्यताही तितकीच महत्त्वाची असल्याचे अरुणाताईंनी सांगितले. त्याची प्रत्यक्ष प्रचितीही त्यांनी सादर केलेल्या संस्कृत सुभाषितांमधून आलीच आणि शब्दांसह त्यांचे श्रवणही साहित्याचे अभूतपूर्व अंग असल्याची जाणीव करून देणारा हा अनुभव रसिकमनाला अधिकच समृद्ध करून गेला.

 

महर्षी व्यास हे आतापर्यंतचे जगभरातील सर्वश्रेष्ठ साहित्यिक असल्याचेही अरुणाताई म्हणाल्या. कारण, व्यासांनी हरप्रकारच्या मानवी भावभावना, प्रसंगांना महाभारतात उचित स्थान दिले. महाभारतातील युद्धसमाप्तीनंतरच कृष्णाने गांधारीच्या डोळ्यावरची पट्टी काढून तिला कौरवांनी केलेल्या भीषण संहाराची जाणीव करून दिली. युद्ध पश्चात एका मृत हत्तीच्या गळ्यातील घंटेखाली चिमणीने बांधलेल्या घरट्यावरून जन्म-मृत्यू या जीवनचक्राची अनोखी सांगड व्यासांनी ‘महाभारत’ या महाकाव्यातून जगासमोर मांडली. असे अंगावर रोमांच आणणारे अनेक किस्से अरुणाताई कथन करत होत्या आणि श्रोतावर्ग फक्त भान हरपून ते ऐकण्यात व्यग्र होता.

 

अरुणाताईंनी स्त्रीत्वाच्या एकूणच दृष्टिकोनावर यावेळी प्रकाश टाकला. ‘भारतीय स्त्रीत्व’ आणि ‘पाश्चात्यांच्या स्त्रीत्वा’तील तफावत त्यांनी सोदाहरण अलगद उलगडली. त्याचबरोबर आजच्या काळातही केवळ स्त्रियांकडे एकाच विशिष्ट दृष्टिकोनातून बघता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाभारतातील द्रौपदीपासून ते माऊंट एव्हरेस्टचे सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बच्छेंद्री पालच्या संघर्षाचा, जिद्दीचा त्यांनी यावेळी दाखला दिला. भर दरबारातील वस्त्रहरणाच्या दुर्दैवी प्रसंगी द्रौपदीने दाखविलेले धारिष्ट्य, तिची सद्सद्विवेकबुद्धी, तीन वर मागताना दाखविलेले चातुर्य आणि सत्वशीलता याचे अरुणाताईंनी केलेले रंजक वर्णन सदैव स्मरणात राहील असेच.

 

अरुणाताईंनी केवळ साहित्याचेच विविध पैलू उलगडून दाखवले नाहीत, तर शिल्पकला, त्यातील चिन्हसंकेतांवरही त्यांनी मार्मिक भाष्य केले. शिल्पांतील भावमुद्रा, त्यांच्या तात्कालिक संदर्भांची अचूकता यांचे अरुणाताईंनी विशेषत्वाने कौतुक केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@