जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |



 

 

आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन! त्यानिमित्ताने घराघरातील आजीआजोबांच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा...
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

  
म्हातारपण हे देवाने माणसाला बहाल केलेले दुसरे बालपण असते असे म्हणतात. बहुतांशवेळा हे मनाला पटतेदेखील! लहान मुलांना जसे गोळ्या-चॉकलेट, आईस्क्रीम हवीहवीशी वाटतात तसेच वृद्धांनाही ती प्रिय असतात. परंतु त्यांच्या या आवडीमागील कारण म्हणजे त्यांना दात नसल्याने, असलेले दात पडून गेल्याने चावण्यास व पचण्यास हलके असे खाद्यपदार्थ त्यांना आवडतात.

 

सुरकुत्या पडलेली ती त्वचा, धूसर झालेली नजर आणि कानाला कमी ऐकू येत असले तरीदेखील सर्व काही जाणणारी ही मंडळी घराघरात असतात. आपल्या नातवंडांसाठी जणू काही ते देवाकडून आपल्या वाट्याचेही दीर्घायुष्य मागत असतात. घरातील सर्वांनी हसत-खेळत, सुखी, आनंदी राहावे असे त्यांना वाटत असते. कारण डोळ्यासमोर घडणारी सासू-सुनांची, नवरा-बायकोची, वडील-मुलाची भांडणे त्यांना नकोशी झालेली असतात. भांडणे करून काहीच उत्पन्न होत नाही. हाती येतो तो अबोला व नात्यातील दुरावा! हे त्यांना एव्हाना पाठ झालेले असते. कारण त्यांनी ते प्रत्यक्षात अनुभवलेले असते. अनुभव घेतच त्यांना वृद्धाप्य आलेले असते. आपण केलेल्या चुकांची पुनरावृत्ती आपल्या मुलांनी, नातवंडांनी करू नये हीच त्यांची इच्छा असते.

 

बालपण देगा देवा! असे सगळे म्हणतात. पण आयुष्याच्या शेवटी येणारे म्हतारपण हे सगळ्यांनाच नकोसे असते. आयुष्याच्या या खेळात गोम अशी आहे की जो तरूण आहे तो कधी ना कधीतरी वृद्ध होणारच. म्हतारपण हे नकोसे वाटणारे असते, कारण आयुष्यभर आपण केलेल्या चुकांचा पश्चाताप होण्याची ही वेळ असते. प्रायश्चित्य करावेसे वाटत असले तरीदेखील करता येत नसते, कारण शरीर साथ देत नसते. आयुष्यभर मानाने स्वावलंबी राहिलेल्या कित्येकांना या वृद्धापकाळाने नमवले आहे. कोणावरही अवलंबून न राहण्याची इच्छा असताना देखील त्यांना सतत लहानसहान गोष्टींसाठी अनेकांची मदत लागत असते. काळाच्या ओघात आपण कुठेतरी मागे पडतोय असे वाटण्यास सुरूवात झाली की वृद्धत्व आलेच म्हणून समजा!

 

आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींची आपण किती काळजी घेतो? हा प्रश्न एकदा स्वत:लाच विचारून पाहा. घरातील लहान मुलांशी आपण आवर्जून गप्पा मारतो. आज तु शाळेत काय गंमत केलीस असे त्यांना आवर्जुन विचारले जाते. पण त्याच घरातील वृद्धांची साधी विचारपूसही होत नसते. त्यांच्याशीदेखील कधीतरी मनमोकळ्या गप्पा मारून बघा. तुम्हाला व त्यांना एक नवीन मित्र सापडेल कदाचित. तुमची एखादी जुनी आठवणही ते तुम्हाला सांगतील. कारण हा काळ त्यांच्यासाठी तसा आठवणीत रमण्यासारखाच असतो.

 

कित्येकांना तर या आजीआजोबांची औषधे संपली आहेत हे माहितही नसते. हे चित्र अलीकडे बऱ्याच घरात दिसून येते. पुर्वीच्या काळी घरातील सर्व महत्वाचे निर्णय हे घरातील वृद्धच घ्यायचे. त्यांना एक मान असायचा. घरातील सदस्यांना त्यांची आदरयुक्त भीतीही असायची. परंतु विभक्त कुटुंबपद्धती आपल्या संस्कृतीत रुजू लागल्यापासून घरातील सगळी सूत्र ही कुटुंबातील कमवत्या तरुण मंडळींच्या हाती आली. त्यानंतर घरातील आजीआजोबा हे नावापुरतेच उरले, काही घरात त्यांची रवानगी गावाला करण्यात आली तर काहींनी तर त्यांना थेट वृद्धाश्रमात पाठवले.

 

काही दानशूर लोक आजकाल आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करतात. एक दिवस का होईना, पण आपला अमूल्य वेळ ते या आजीआजोबांना देतात. अनाथ आश्रमातील एखादे मुल दत्तक घ्यावेसे अनेकांना वाटते किंवा किमान त्यांच्या शिक्षणाचा खर्च अनेकजण उचलतात. पण वृद्धाश्रमातील एखाद्या आजीआजोबांना एका दिवसासाठी आपल्या घरी आणावे पाहुणे म्हणून आणावे, त्यांचा पाहुणचार करावा. त्यांच्याशी गप्पा माराव्यात असे कुणालाच वाटत नाही. कारण लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करायला वाव असतो. त्याची परतफेड होणारी असते. वृद्धांच्या बाबतीत तसे नसते. आज काही कॉलेजातील विद्यार्थी सामाजिक कार्य म्हणून का होईना पण वृद्धाश्रमांना भेट देतात. त्यांच्यापैकी कित्येक तरुण-तरुणींना या आजीआजोबांची निस्वार्थ वृत्तीने सेवा करताना पाहून आश्चर्य वाटते.

 

वृद्धाश्रमातील हे आजीआजोबा रोज आज कुणीतरी आपल्याला भेटायला येईल अशी वाटत पाहत नसतात, त्यांना ओढ असते ती त्यांच्या आपल्या माणसांची! कधीतरी याच वृद्धाश्रमात आपल्याला सोडून गेलेली आपली मुले आपल्याकडे परत येतील अशी भाबडी आशा त्यांना असते. हाच विचार करत ते आपल्या मरणाची वाट पाहत दिवस ढकलत असतात. त्यांच्या मुलांनी त्यांना कितीही वाईट वागणूक दिलेली असली तरीदेखील ते मात्र त्यांना आशिर्वादच देत असतात. शेवटी आई-वडीलांचे ते निस्वार्थी प्रेम असते. पण आजकालच्या या नवीन आईवडिलांना अर्थात त्याच आजीआजोबांच्या मुलांना मात्र आपल्या लहानग्यांमध्येच भविष्य दिसत असते. भविष्याकडे धावताना भूतकाळातील आपल्या सावलीरुपी आईवडीलांना मात्र ते कधीच विसरलेले असतात. असे असतानादेखील त्यांच्या भविष्याने अर्थात त्यांच्या लहानग्यांनी मात्र त्यांच्या म्हातारपणातील काठीचा आधार व्हावा, अशी त्यांची माफक अपेक्षा असते. पण जे पेरले आहे तेच उगवते असे म्हणतात. दिवसेंदिवस वृद्धाश्रमांच्या वाढत्या प्रस्थामुळे म्हातारपणी सर्वांना येथेच जायचे असते असा चुकीचा गैरसमजच आजकालच्या लहान मुलांना झाला आहे. आम्हाला आजीआजोबा का नाहीत? किंवा मग ते कुठे असतात? अशी विचारणा या नातवंडांनी केल्यावर मात्र त्यांच्या पालकांकडे उत्तर नसते. मग सत्य लपवण्यासाठी त्यांना काहीतरी थाप मारून वेळ निभावून नेली जाते.

 

त्यामुळे आपल्या आयुष्याची संध्याकाळ ही कुठे व कशी होणार? याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. त्यामुळे सगळ्याशी चांगले वागा. आपण एखाद्याशी जसे वागतो तसेच आपल्याशीही लोकं वागतात. पृथ्वी गोल आहे असे उगीच नाही म्हणत. आपण केलेली कर्म परत फिरून कधी ना कधी आपल्यासमोर उभी राहतातच! त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, आताच विचार करा, आली घडी आपुली साधा व चांगली कर्म करत राहा.

 

आजच्या व उद्याच्या ज्येष्ठांना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
-साईली भाटकर 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 

@@AUTHORINFO_V1@@