पापाचा घडा भरलाय कुणाचा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018
Total Views |




 

चर्चमधल्या भल्यामोठ्या घंटांच्या घणघणाटात दबलेल्या असहाय्य महिलांच्या, मुलींच्या, बालकांच्या किंकाळ्या लॅझरस मोहन आणि त्याच्या अनुयायांनी ऐकाव्यात. काय ती आकाशाच्या बापाच्या नावाखाली केलेली पापे नाहीत का? लॅझरस मोहनच्या तर्कानुसार चर्चमधली ही पापे पाहून आकाशातला बाप वा सैतान दोघांपैकी कोणीतरी कोपला पाहिजे की नाही?

 

निसर्गावर अत्याचार केला की, निसर्ग त्याचा सूड घेतो, अशा अर्थाची म्हण वा विधान बऱ्याचदा केले जाते. विषय अर्थातच नैसर्गिक आपत्तींचा-भूकंप, महापूर आदींचा असतो. गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीने वाताहत झालेल्या केरळकडे पाहिल्यानंतर वरील म्हणण्यात काही तथ्य असल्याचे कोणालाही वाटू शकते. अर्थात निसर्गावर अत्याचार म्हटले की, त्याचा संबंध लगेच विकासकामांशी जोडला जातो. यावर पर्यावरणतज्ज्ञ, पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून तावातावाने आपले म्हणणे मांडत ठिकठिकाणी होत असलेल्या विकास प्रकल्पांना नेहमीप्रमाणे विरोधही केला जातो. पण एक गोष्ट नक्की की, सध्या केरळमध्ये जे काही सुरू आहे, ते पाहता तिथल्या सर्वसामान्य जनतेला आवश्यकता आहे ती, आपल्या सर्वांच्याच सहकार्याची, मदतीची आणि आधाराची. केंद्र सरकारसह देशातल्या बहुतांश राज्यांनी, उद्योगपतींनी, व्यावसायिकांनी, क्रीडा-मनोरंजन क्षेत्रातील नामांकितांनी आणि शेकडो सर्वसामान्य नागरिकांनी हीच गोष्ट लक्षात घेऊन केरळी जनतेच्या पुनर्वसनासाठी, साहाय्यासाठी शेकडो कोटी रुपयांची, हजारो टन अन्नाची, लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची मदत तिकडे पाठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केरळी जनतेच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सेवा भारती या संस्था-संघटनांच्या माध्यमातून महापुराचा फटका बसलेल्या हजारो गावांतल्या, शहरांतल्या लाखो केरळी बांधवांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतकार्यही केले जात आहे. संघाचे स्वयंसेवक, सेवेकरी हे महाप्रलयाचे संकट जसे काही स्वतःच्याच घरावर कोसळल्याचा भाव मनात ठेऊन बचावकार्यात पोटतिडकीने सहभागी होत आहेत. ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद म्हटली पाहिजे. संपूर्ण राष्ट्रालाच स्वतःचे कुटुंब मानण्याचे संस्कार ज्यांच्या मनावर झाले आहेत, त्यांच्याकडून असेच कार्य होणार हेही खरेच.

 

इथे मुद्दा मात्र फक्त केरळमधील महापुराचा वा मदतीचा नसून दुसराच आहे. केरळमध्ये धर्मांतराचे जोरदार उद्योग चालविणाऱ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी या महापुराचे खापर हिंदू प्रथा-परंपरांवर फोडण्याची हिंमत केली. ख्रिस्ती धर्मोपदेशक लॅझरस मोहन या मनुष्याने केरळमधील महापुराला हिंदू धर्मातील प्रथा-परंपरा जबाबदार असून त्या प्रथांमुळे सैतानाचा कोप झाल्याचे तारे तोडले. शेकडो लोकांचा बळी घेणाऱ्या, हजारो लोकांना विस्थापित करणार्‍या, लाखो लोकांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यायला लावणाऱ्या महापुराला जबाबदार आहेत, त्या हिंदू धर्मातील प्रथा असा लॅझरस मोहनचा आरोप आहे. मुळातच लॅझरस मोहनच्या आरोपांमध्ये कसलेही तथ्य नाही. आता पुढचा मुद्दा हा की, हिंदू प्रथांमुळे पाप वाढले आणि त्यामुळे हा महापूर आला, सैतान वगैरे कोपला, हा लॅझरस मोहनचा दावा. लॅझरस मोहनच्या दाव्यावर वा तर्कावर विश्वासच ठेवायचा असेल तर त्याने आधी आपल्यातल्या पाद्य्रांनी आणि बिशपांनी दयाळू चेहऱ्याआडून केरळमधल्या, तिरुअनंतपुरममधल्या, कोट्टायममधल्या चर्चमध्ये कोणती कुकर्मे करुन ठेवलीत, हे तपासावे.

 

गेल्याच महिन्यात केरळच्या मलनकारा सिरीयन ऑर्थोडेक्स चर्चमध्ये (कोट्टायम येथील) चार पाद्य्रांनी कन्फेशनसाठी आलेल्या महिलेवर केलेल्या अत्याचाराचे प्रकरण गाजले. लॅझरस मोहनच्या अनुयायांनी गल्ली ते दिल्लीच नव्हे तर, छत्तीसगड, झारखंड आदी ठिकाणी होत असलेल्या प्रकारांकडेही लक्ष द्यावे. तिथे चालणारी पापकर्मे पाहावीत. नन्सवर होणारे बलात्कार आणि कन्फेशनसाठी चर्चमध्ये येणाऱ्या स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहावेत. केरळच्या पुराला हिंदुंमधील प्रथांना जबाबदार धरणाऱ्या लॅझरस मोहनने याच पुरामुळे मदत छावण्यांमध्ये राहत असलेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या बांधवांशी एका ख्रिश्चन गटाने कसे वर्तन केले ते पाहावे. हिंदुंमधील जातीपातीचे नाव घेऊन अनुसूचित जाती-जमातीच्या बांधवांना धर्मांतरासाठी भरीस पाडणाऱ्या ख्रिश्चन धर्मातील एका गटाने मदत छावण्यांमध्ये राहत असलेल्या अनुसूचित जाती-जमातीतील लोकांसह जेवण करण्यास नकार दिला. याची तक्रार ‘केरळ पुलायर महासभे’ने मुख्यमंत्री पी. विजयन आणि अलापुझाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडेही केली. मदत छावण्यांमधल्या ख्रिश्चन लोकांनी पुलायर समाजातल्या लोकांनी शिजवलेले अन्न खाण्यास नकार दिला. हाच प्रकार त्यांनी एकदा नव्हे दोनदा केला आणि त्यानंतर इथले ख्रिश्चन लोक ती मदत छावणी सोडून दुसरीकडे निघूनही गेले. आता या घटनेतील ख्रिश्चन लोकांनी जातीच्या, धर्माच्या नावाने केलेला हा भेदभाव, हे पाप, हा अन्याय नव्हे का? हे कमी का काय म्हणून अमेरिकेतल्या शेकडो नव्हे, हजारो छोट्या-छोट्या मुलांवर झालेले, होत असलेले लैंगिक अत्याचारही लॅझरस मोहन आणि त्याच्या अनुयायांनी पाहावेत.
 
 
चर्चमधल्या भल्यामोठ्या घंटांच्या घणघणाटात दबलेल्या त्या केरळमधील, छत्तीसगडमधील, झारखंडमधील असहाय्य महिलांच्या, मुलींच्या, बालकांच्या किंकाळ्या ऐकाव्यात. काय ती आकाशाच्या बापाच्या नावाखाली केलेली पापे नाहीत का? लॅझरस मोहनच्या तर्कानुसार चर्चमधली ही पापे पाहून आकाशातला बाप वा सैतान दोघांपैकी कोणीतरी कोपला पाहिजे की नाही? आताचा केरळमधील महापुराचा तडाखा लॅझरस मोहनच्याच मतानुसार केरळच्या तिरुअनंतपुरमधल्या, कोट्टायममधल्या चर्चमधल्या पापांचा घडा भरल्याने तर बसलेला नाही ना? याचा विचार आधी लॅझरस मोहनने करावा. हिंदू धर्मातील प्रथा-परंपरांवर टीका-टिप्पणी करण्यापेक्षा लॅझरस मोहनने आणि त्याच्या म्हणण्यानुसार माना डोलावणाऱ्यांनी स्वतःच्या पायाखाली काय जळतेय, ते पाहावे. म्हणजे कळेल खरे पापी लोक कोण आहेत ते! अरे तुम्ही चर्चच्या आत प्रथा-परंपरांच्या नावावर केलेली पापे आता तर जगाच्या चव्हाट्यावर येऊन न्यायालयाचीदेखील पायरी चढत आहेत. तरी तुमच्या मतांनुसार केरळमधील महापुराला जबाबदार आहेत त्या हिंदू धर्मातील प्रथा-परंपरा! वाह रे वाह! चोर तो चोर वर शिरजोर जे म्हणतात, ते यालाच.
@@AUTHORINFO_V1@@