अब सुबह नही होगी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018
Total Views |

 
 
65 वर्षांपूर्वीचा कालखंड! 1953 च्या सुमारास दिल्ली महानगरपालिकेच्या एका वार्डाची पोटनिवडणूक होत होती आणि भारतीय जनसंघाने प्रथमच आपला उमेदवार उभा केला होता. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी दोघांनीही ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला होता. निवडणूक झाली. भारतीय जनसंघाचा उमेदवार पराभूत झाला. दोघेही निराश, हताश! वाजपेयी हे अधिक भावनाप्रधान! त्यांच्या चेहर्यावरील भाव पाहून अडवाणी म्हणाले, ‘‘चला, आपण एखादा चित्रपट पाहू या!’’ दोघेही टांगा करून, पहाडगंज भागातील एका चित्रपटगृहात दाखल झाले. चित्रपट सुरू झाला होता. चित्रपट संपल्यावर श्रेयनामावली सुरू झाली. प्रथम चित्रपटाचे नाव आले, फिर सुबह होगी! अडवाणी यांनी त्याकडे अटलजींचे लक्ष वेधले. त्यांच्या चेहर्यावर हास्य उमटले.
65 वर्षांनंतर दोघांनीही राजकारणाचे चढउतार पाहिले. जय-पराजय पाहिले. अटलजींच्या निधनावर अडवाणींचे एकच शल्य आहे, अब सुबह नही होगी! अटलजी चिरनिद्रेत गेले.
दिलदार माणूस
अटलजींची पहिली भेट स्मरणात राहावी अशी होती. शनिवारचा दिवस होता. त्यांच्या सचिवाने सकाळी 11 वाजता, 6 रायसीना रोडवरील निवासस्थानी येण्याची सूचना केली. मी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो, तर सचिव म्हणाला, ‘‘ते तर बाहेर गेले आहेत.’’ रायसीना रोडजवळ संसदभवन आहे. शनिवारी संसदभवन बंद राहात असले, तरी त्याचा वाचनकक्ष सुरू राहात असे. मी सहज म्हणून संसदभवनातील वाचनकक्षात गेलो, तर अटलजी वृत्तपत्राचे वाचन करीत होते. मी त्यांच्याजवळ जाऊन हळूच म्हणालो, ‘‘तुम्ही तर मला घरी भेटीची वेळ दिली होती.’’ अटलजी म्हणाले, ‘‘अरे! मी तर विसरूनच गेलो होतो. चला, आता आपण मिळून घरी जाऊ.’’ हिरव्या रंगाच्या आपल्या फियाटमधून ते मला आपल्या घरी घेऊन गेेले आणि मनसोक्त गप्पा मारल्या. अटलजी असे दिलदार होते.
 
पहिला शपथविधी
अटलजींचा स्वभाव विनोदी. ते स्वत:वरही विनोद करीत. याचा फटका त्यांना स्वत:च बसला. अर्थात, काही क्षणच. 1996 च्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. कोणत्याही पक्षास बहुमत मिळाले नव्हते. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांनी अटलजींना चर्चेसाठी पाचारण केले. राष्ट्रपतीभवनातील भेट आटोपून अटलजी बाहेर आले. पत्रकार त्यांची प्रतीक्षा करीत होते. राष्ट्रपतींशी काय चर्चा झाली, हे जाणून घेण्यास पत्रकार उत्सुक होते. अटलजी म्हणाले, ‘‘राष्ट्रपतींनी मला पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आहे.’’ पत्रकारांचा विश्वासच बसला नाही. अटलजी नेहमीप्रमाणे विनोद करीत आहेत, असे त्यांना वाटले. पत्रकारांच्या चेहर्यावरील भाव ओळखून अटलजींनी आपल्या हातातील नियुक्तिपत्र त्यांना दाखविले. मग कुठे पत्रकारांचा त्यावर विश्वास बसला.
मित्रधर्म
2004 मध्ये अटलजींना पराभवाची कल्पना आली होती. विजय अवघड आहे, हे त्यांच्या लक्षात आले होते. पक्के लक्षात आले होते. त्यांच्या, भाजपाच्या एका मित्राची संस्था आदिवासी भागात काम करत होती. त्या संस्थेला सरकारी मदत हवी होती. सरकारी फायलीत ते सारे अडकून पडले होते. बरोबर लोकसभेचे निकाल जाहीर होण्यापूर्वी त्यांनी त्या संस्थेला 10 लाख रुपयांचा चेक पोहोचेल अशी व्यवस्था केली होती. अटलजींचा अंदाज खरा ठरला होता. त्यांचे सरकार गेले होते. पण, त्यापूर्वी त्यांनी मित्रधर्म निभावला होता.
एक अनोखी जोडी
अटलजी आणि अडवाणी यांच्यात मतभेद नव्हते काय? होते. एका आईच्या पोटातून जन्म घेणार्या दोघा सख्ख्या भावांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात, स्वभाव वेगळे असतात. मग, अटलजी आणि अडवाणीजी ही दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे होती. त्यांच्यात वेगवेगळ्या मुद्यांवर वेगवेगळी मते होती. पण, त्या मतांनी कधीही मर्यादा ओलांडली नाही. हवाला प्रकरणानंतर दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांनी राजीनामा दिला. त्यांच्याजागी कोण, हा एक वादाचा मुद्दा ठरत होता. कोणत्याही एका नावावर मतैक्य होत नव्हते. अटलजी अडवाणींना म्हणाले, ‘‘तुम्ही निर्णय करा आणि तो निर्णय माझाही असेल हेही सांगा!’’
मोलाचा सल्ला
2001 मध्ये गुजरातमध्ये मोठा भूकंप झाला होता. त्या दिवशी अटलजी महत्त्वाच्या परदेश दौर्यावर रवाना होणार होते. एका राज्यात मोठा भूकंप झाला असताना, त्याच दिवशी पंतप्रधानाने देशाबाहेर जाणे योग्य ठरणार नाही, असे काहींना वाटले. त्यांनी आपली भावना अडवाणी यांच्याजवळ व्यक्त केली. अडवाणी, अटलजींशी काय बोलले याची कल्पना नाही, पण अटलजींनी आपला परदेश दौरा रद्द केला. पंतप्रधान कार्यालयातील काही अधिकार्यांनी त्यांना दौरा रद्द न करण्याचा सल्ला दिला होता. तो सल्ला डावलून त्यांनी अडवाणी यांनी दिलेला सल्ला मानला.
 
ऋाणानुबंध
अटलजी रुग्णालयात असताना, कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी तातडीने रुग्णालयात गेले. याला एक मोठा इतिहास आहे. 1985 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान झाले. अटलजींना किडनीच्या आजाराने ग्रासले. प्रकरण गंभीर होते. त्याचा उपचार भारतात होऊ शकत नव्हता. न्यूयार्कमधील एका प्रसिद्ध रुग्णालयात त्यावर उपचार केला जाऊ शकत होता. पंतप्रधान राजीव गांधी यांना अटलजींच्या प्रकृतीचे वृत्त कळले. त्यांनी अटलजींना सांगितले, ‘‘तुमच्या प्रकृतीबाबत मला कळले आहे. न्यूयार्कमध्ये होणार्या संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनासाठी जाणार्या भारतीय प्रतिनिधिमंडळात मी तुमचा समावेश करतो. तुम्ही न्यूयार्कला जा व उपचार घ्या.’’ त्यानुसार अटलजींवर न्यूयार्कच्या रुग्णालयात उपचार झाले, ते बरे झाले. 1999 मध्ये अटलजी पंतप्रधान असताना, सोनिया गांधींवर एक संकट आले. त्यांनी अटलजींची भेट घेतली व मदत मागितली. अटलजींनी आपले मुख्य सचिव ब्रिजेश मिश्रा यांना बोलविले. सोनिया गांधींना सर्व प्रकारची मदत करण्याची सूचना केली. अटलजी रुग्णालयात दाखल होताच, राहुल गांधी तातडीने गेले त्यामागे होता हा सारा इतिहास!
फर्नांडिसांचा राजीनामा
अटलजी सरकार असताना, तहलका प्रकरण उफाळून आले होते. त्यात काही टेप बाहेर आल्या. सारे प्रकरण तत्कालीन सरंक्षणमंत्री जार्ज फर्नांडिस यांच्यावर केंद्रित होते. संसद अधिवेशन सुरू होते. भाजपाचे बहुतेक नेते फर्नांडिस यांचा राजीनामा घेण्याच्या विरोधात होते. पण, अटलजींनी फारशी सल्लामसलत न करता, पररराष्ट्र मंत्री जसवंतिंसह यांना फर्नांडिस यांच्याकडे पाठविले व त्यांनी राजीनामा देणे सोयीचे ठरेल, असा निरोप दिला. त्यानुसार फर्नांडिस यांनी राजीनामा दिला. तहलका प्रकरण शांत होताच, फर्नांडिस पुन्हा सरकारमध्ये परतले. कुठे ताठर राहावयाचे आणि कुठे नरमाई घ्यायची, हे त्यांना चांगले ठाऊक होते.
कंधार प्रकरण
इंडियन एअर लाइन्सच्या एका विमानाचे अपहरण करून ते कंधारला नेण्यात आल्यानंतर, भारताने इस्रायलसारखी कारवाई करून, विमानपळव्यांना ठार करावे व भारतीय प्रवाशांची सुटका करावी, असा एक मोठा विचारप्रवाह सरकारमध्ये सुरू होता. बहुतेक मंत्री कारवाई करण्याच्या बाजूचे होते. पण, अटलजींची भूमिका वेगळी होती. कारवाई केल्यास आणि त्यात मोठ्या संख्येत प्रवासी ठार झाल्यास, त्याची देशात फार तीव्र प्रतिक्रिया उमटेल, हे ते जाणून होते. ज्या विमानातून जसवंतिंसह कंधारला गेले, त्याच विमानातून तिघा अतिरेक्यांना पाठविण्यात आल्याचा मुद्दा फार वादग्रस्त ठरला होता. हे सारे अनवधानाने झाले होते. त्या क्षणी तणावाच्या वातावरणात ही चूक झाली होती.
शुक्रवारी 17 ऑगस्टच्या सायंकाळी अटलजींचे पार्थिव अग्निदेवाच्या स्वाधीन करण्यात आले. ही अटलजींच्या जीवनातील शेवटची सायंकाळ. आता सकाळ उजाडणार नव्हती!
@@AUTHORINFO_V1@@