तरंगता डेअरी फार्म

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018   
Total Views |


 
तरंगते डेअरी फार्म शहराच्या अगदी जवळच असल्याने ग्राहकांपर्यंत ताजे व दर्जेदार दूध लवकरात लवकर पोहोचणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतुकीचा खर्चही वाचेल तसेच पर्यावरणाची हानी देखील होणार नाही. सौर पॅनेलच्या माध्यमातून या फार्मसाठी वीज निर्माण केली जाणार आहे. या फार्मच्या जवळपास सर्व गरजा रिसायलवर व नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असल्याने प्रदूषण कमी होणार आहे. 


आकाराने छोटा २ कोटी लोकसंख्या पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नेदरलँड देशाविषयी आपण नेहमीच अनेक रोचक घटना ऐकत असतो. बहूआयामी असलेला नेदरलँड हा युरोपीय देश असून प्रगत देशात मोडतो. याच सोबत या देशाला दूधदुभत्याचा देश म्हणल्यास वावगे ठरणार नाही. कारण या ठिकाणी मोठ्याप्रमाणात दूधदुभत्या पदार्थांची निर्मिती व निर्यात केली जाते. एकूण लोकसंख्येच्या मानाने फक्त ३ टक्के लोक शेती करतात. यामुळे येथे शेती व शेतीसंबंधित काम करणाऱ्या लोकांची नेहमीच कमतरता भासत असते. मात्र शेती करायला कामगार नाहीत म्हणून येथील शेतकरी अडून बसले नाहीत. त्याचमुळे हा देश डेअरी तंत्रज्ञान आणि शेती संबंधित यांत्रिकीकरणात जगात अव्वल आहे. या देशात शेतीसंबंधित रोज नवनवीन संशोधन केले जाते. असेच गेल्या आठवड्यात गायीच्या शेणापासून फॅशनेबल कपडे तयार करण्याचा भन्नाट शोध लागला होता. जगभरात या संशोधनाचे कौतुक पाहायला मिळत होते. असाच एक भन्नाट शोध सध्या नेदरलँड मध्ये लागला असून जगात चर्चेचा विषय बनला आहे.

 

नेदरलँडमधील चर्चेत असलेले भन्नाट संशोधन म्हणजे देशातील रोटरडॅम येथे जगातील पहिला तरंगता डेअरी फार्म उभा राहणार आहे. नेदरलँड देश जरी दुधाच्या उत्पन्नात अग्रेसर असला तरी रोटरडॅम शहराची वाढती दुधाची गरज भागवण्यासाठी हा डेअरी फार्म सुरु करण्यात येणार असून हा डेअरी फार्म बनवण्याचे काम याच वर्षांपासून सुरु होणार आहे. विशेष म्हणजे या तरंगत्या डेअरी फार्ममधील गायचे दूध चक्‍क रोबोट काढणार आहेत. शहराच्या जवळ असलेला हा प्रकल्प येथील डच प्रॉपर्टी कंपनी बेलाडोनने या डेअरी फार्मचे काम सुरू केले आहे. या फार्ममध्ये मिउसे-राइन-इस्सेल जातीच्या जवळपास ४० गायी ठेवल्या जाणार आहेत. या फार्ममध्ये री-सायकलिंगवर विशेष जोर दिला जाणार आहे. रोटरडॅममधील फूड फॅक्टरींमधून निघालेले व नासाडी होणारे अन्‍न येथील गायींना आहार म्हणून दिले जाणार असून गायीच्या संपूर्ण आहारातील ८० टक्के अन्नाची गरज यातून भागणार असल्याची माहिती फार्मचे जनरल मॅनेजर अल्बर्ट बेरसन यांनी दिली.

 
 
 

न्यूयॉर्कमधील हडसन नदीच्या फ्लोटिंग हाऊसिंग प्रकल्पावर काम करत असताना अभियंता पीटर वॅन विंगर्डन या इंजिनियरला ही कल्पना २०१२ मध्ये सुचली होती. याठिकाणी काम करत असताना चक्रीवादळाने शहरांच्या मुख्य रस्त्यांवर वाळू व इतर वस्तूने मार्ग काढणे कठीण होऊन बसले होते. यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती. याचा परिणाम येथील रहिवासी असलेल्या लोकांच्या अन्नसाखळीवर झाला. त्या लोकांना व आम्हाला ताजे अन्न मिळवण्यासाठी पुढील काही दिवस मोठ्याप्रमाणात कसरत करावी लागली होती. चक्रीवादळ व वाळूच्या तडाख्याने झालेली नासधूस पाहून ग्राहकांना शक्य तितक्या लवकर ताजे व दर्जेदार अन्नपदार्थांची निर्मिती करण्याची आवश्यकता भासली आणि यातून जगातील पहिल्या तरंगत्या डेअरी फार्मची निर्मितीची संकल्पना पुढे आल्याची या प्रकल्पाचे मुख्य पीटर वॅन विंगर्डन यांनी सांगितले.

 

तरंगते डेअरी फार्म शहराच्या अगदी जवळच असल्याने ग्राहकांपर्यंत ताजे व दर्जेदार दूध लवकरात लवकर पोहोचणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतुकीचा खर्चही वाचेल तसेच पर्यावरणाची हानी देखील होणार नाही. सौर पॅनेलच्या माध्यमातून या फार्मसाठी वीज निर्माण केली जाणार आहे. या फार्मच्या जवळपास सर्व गरजा रिसायलवर व नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असल्याने प्रदूषण कमी होणार आहे. वाढत्या शहरीकरण व औद्योगिकरणाच्या जगात प्रदूषणाचा स्थर वाढत चालला आहे. अशा काळात प्रदूषण न करणारे कमी वेळेत दर्जेदार व ताजे उत्पन्न देणाऱ्या प्रकल्पाचे नक्कीच कौतुक केलेच पाहिजे कारण आज घडीला निसर्गाचे संरक्षण करणाऱ्या अशा प्रकल्पाची नितांत गरज आहे.

@@AUTHORINFO_V1@@