काक विष्ठा करिती । तेथे पिंपळ येती ॥

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018   
Total Views |



 

मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्मवर, इमारतीच्या बाहेर संडासाच्या पाइपांवर, झोपडपट्टीच्या कपारीत, रस्त्याच्या कडेला अशा ठिकठिकाणी पावसाळ्यात वड-पिंपळाचे माडे रुजून आलेले दिसतात. याचं कारण मुंबईत कावळे-कबुतरांची संख्या खूप आहे. त्यांच्या विष्ठेतून ही झाडं रुजून येतात. या झाडांचं योग्य ठिकाणी पुनर्रोपण होणं आवश्यक आहे.


बोरिवली पश्चिमेला वझिरा नाका येथील ज्ञानयोग सोसायटीत राहत असताना संध्याकाळच्या वेळी कधीतरी खाली चक्कर मारायला जाणं व्हायचं. वझिरा नाक्याहून जयराज नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बरीच गुलमोहोराची उंच झाडं आहेत. असंच एकदा त्या रस्त्यावरून जाताना सहज एका गुलमोहोराच्या झाडाकडे लक्ष गेलं. त्या झाडाला एक मोठी ढोली होती आणि त्या ढोलीतून तीन वडाची छोटी छोटी रोपं रुजून आली होती. गुलमोहोराच्या झाडाच्या ढोलीतून वडाचं झाडं कसं काय उगवलं? नक्कीच त्या ढोलीत कुठल्यातरी पक्ष्याचं घरटं असणार आणि त्याच्या विष्ठेतून वडाच्या बिया पडून त्या रुजल्या असणार, अन्यथा तिथे झाड उगवण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नाही, पण भर रस्त्यात उगवलेले हे वडाचे झाडं वाढणार कसं आणि कुठे? एकतर झाडात झाड उगवलेलं आणि तेही भर रस्त्यात, ही वडाची लहान बालकं वाचवली पाहिजेत असं प्रकर्षाने वाटायला लागलं. त्यानंतर दहा दिवसांनी मी माझ्या गावी (अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) जायला निघालो. तेव्हा गुलमोहोराच्या ढोलीतली ती तिन्ही वडाची रोपं अलगद, मुळांना फार धक्का न लावता काढून घेतली. गावाला पोहोचल्यानंतर कुंड्यांमध्ये चांगली भुसभुशीत माती घेऊन त्यात ती लावून ठेवली. चांगली जगली आहेत. थोडी मोठी झाल्यानंतर गावातच मोकळ्या जागेत ती पद्धतशीरपणे संरक्षण देऊन लावता येतील.

 

‘काकविष्ठेचा पिंपळ’ ही संकल्पना भारतात पूर्वापार प्रचलित आहे. संत नामदेव महाराज एका ओवीत म्हणतात, काक विष्ठा करिती । तेथे पिंपळ येती॥ पक्षी दोन प्रकारे निसर्गात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. एक म्हणजे कीटकनियंत्रण आणि दुसरं म्हणजे बीजप्रसार. उपद्रवी कीटकांना खाऊन पक्षी शेती-बागायतीचं संरक्षण करतात. तसंच झाडांच्या बिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेऊन जंगल वाढवण्यात पक्ष्यांचा मोठा वाटा असतो. कधीकधी पक्ष्यांच्या पंखात अडकून बिया दुसरीकडे जाऊन पडतात. कधी कधी फळं चोचीतून नेताना खाली पडतात आणि त्यातून बिया पडतात. काही वेळा पक्षी फळांचा गर खातात तेव्हा त्याच्या बिया खाली पडतात(उदा. पपई, पेरू, इ.). पण पक्ष्यांकरवी होणारा बहुतांश बीजप्रसार हा त्यांच्या विष्ठेमार्फत होतो. पक्षी सहसा कच्ची फळं खात नाहीत. पूर्ण पिकलेली फळंच खातात. त्यामुळे त्यातली बी पुनरुत्पादनासाठी पूर्ण विकसित झालेली असते. नुसत्या मातीत टाकलेल्या बियांपेक्षा पक्ष्याच्या पोटातून प्रवास करून बाहेर पडलेली बी हमखास रुजते, हे आत्तापर्यंत साध्या निरीक्षणातून सिद्ध झालेलं होतं. आता ते शास्त्रीयदृष्ट्याही सिद्ध झालं आहे. वड-पिंपळासारख्या झाडांच्या बाबतीत तर हे पूर्ण सत्य आहे. कुठल्याही झाडाच्या ढोलीत वा फांद्यांच्या बेचक्यात काकविष्ठेतून रुजून आलेल्या वडाच्या वा पिंपळाच्या झाडाची मुळे खोडाच्या आधाराने जमिनीपर्यंत जातात. हे झाडे हळूहळू वाढत मूळ झाडाला वेढत जातात आणि मूळ झाड हळूहळू कमकुवत होऊन मरते. ही खूप दीर्घकाळ, वर्षानुवर्षे चालणारी प्रक्रिया आहे. जमिनीवर रुजलेले माडे सहसा टिकत नाहीत कारण ते गुरं खातात. त्यामुळे जमिनीपासून थोड्या उंचीवर रुजलेले माडे टिकतात. अर्थात अनुकूल वातावरण असेल तरच असे वड -पिंपळ वाढू शकतात. भर मुंबईत हे होणं कठीण ! त्यामुळे असे माडे कुठे दिसल्यास ते अलगद काढून दुसरीकडे लावणेच इष्ट !

 

मुंबईत फिरताना रेल्वे प्लॅटफॉर्मवर, बिल्डिंगच्या पायथ्याशी, संडासाच्या पाईपांवर, झोपडपट्टीच्या कपारीत ठिकठिकाणी कितीतरी पिंपळाचे माडे रुजून आलेले दिसतील. वडाचे माडेही असतात, पण पिंपळाचे पुष्कळ दिसतात. याचं कारण मुंबईत कावळे आणि कबुतरांची संख्या पुष्कळ आहे. आपण फक्त ‘उपद्रवी पक्षी’ या नकारात्मक चष्म्यातून त्यांच्याकडे पाहतो. भर वस्तीत या पक्ष्यांचा अतिप्रमाणात वावर हा त्रासदायक ठरतो हे मान्य. पण दुसऱ्या बाजूने वड-पिंपळाचा बीजप्रसार करण्याचं मोठं काम हे पक्षी करत असतात. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत बऱ्याच इमारतींच्या बाहेरच्या बाजूला संडासाच्या पाईपाच्या खोबणीतून वडाचे माडे रुजलेले दिसतील. कावळे कबुतरं जिथे शिटतात तिथे असे माडे रुजतात. (पक्ष्यांनाही बहुधा कळत असावं. कावळे- कबुतरं बरोब्बर संडासाच्या पाईपावरच शिटून ठेवतात !) आता, अशा ठिकाणी झाड वाढणं अशक्य असतं. अशा झाडांचं योग्य ठिकाणी पुनर्रोपण होणं आवश्यक आहे. वृक्षलागवडीला सध्या खूप महत्त्व आलं आहे. ही लागवड शास्त्र समजून घेऊन व्हायला हवी. लागवडीकरता वास्तविक आपल्याला नर्सरीतून रोपं विकत घ्यायची सहसा जरूर नसते. निसर्गतः अशा पद्धतीने रुजून आलेले माडे आपण शहरापासून दूर वृक्षलागवडीसाठी वापरू शकतो. नर्सरीतल्या रोपांपेक्षा त्यांची जगण्याची शाश्वतीही जास्त असते. वड आणि पिंपळ या वृक्षांना भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. ते अर्थातच त्यांच्या नैसर्गिक उपयोगितेमुळे. या झाडांचे औषधी उपयोग अनंत आहेत. शिवाय या झाडांचं मोठ्या संख्येतलं अस्तित्व हेच निसर्ग टिकवत आणि वाढवत असतं. या झाडांची वाढ मात्र अत्यंत धीम्या गतीने होत असल्याने, नवीन झाडं लावण्याबरोबरच आहेत ती झाडं टिकवणं, ही काळाची गरज आहे. सर्व मुंबईकर इतकं तरी नक्कीच करू शकतात की पावसाळ्यात आपल्या सोसायटीत बिल्डिंगच्या बाहेर असा वड - पिंपळाचा माडा रुजून आलेला दिसला की, त्याच्या पुनर्रोपणासाठी काहीतरी प्रयत्न करावेत. स्वतः पुनर्रोपण करणं शक्य नसल्यास जवळपासच्या ज्या कोणी संस्था वा शाळा वृक्षारोपणाचे कार्यक्रम करत असतील अशा व्यक्ती वा संस्थांना काकविष्ठेतून रुजलेल्या माड्यांची माहिती कळवावी. शक्य असल्यास असे माडे अलगद काढून त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवावेत. पर्यावरणरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने अमुक करावं, तमुक करावं असे संदेश हल्ली सतत प्रत्येकाच्या कानावर पडत असतात. ‘पर्यावरणरक्षणासाठी मी काय काय करू शकतो?’ या यादीत या एका गोष्टीची नक्कीच भर टाकता येईल!

@@AUTHORINFO_V1@@