समाजासाठी हिरकणी व्हायचे आहे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018   
Total Views |


 


‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’च्या सदस्या, ‘वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या सदस्या आणि ‘अखिल भारतीय मांगेला समाजा’च्या महाराष्ट्र शाखेच्या माजी अध्यक्षा आणि आता मुख्य समितीमध्ये सदस्या असलेल्या रेखा पागधरे यांच्याविषयी...

 

‘नवऱ्याचे धान असते आणि बायकोची कांजी असते,’ अशी आमच्या कोळी लोकांमध्ये म्हण आहे. याचा अर्थ आहे, नवरा संमिदरातून मासे पागून आणतो आणि माझी कोळीण बाय ते मासे बाजारात नेऊन विकते. मासे विकणे, हे कौशल्य तिच्या रक्‍तातच असते. जन्मजात उद्योजिकाच म्हणा. त्याच मांगेला समाजाची मी आहे. त्यामुळे उद्योग-उदीमाचे तंत्र रक्‍तात आहे. फरक इतकाच की, आता मी मासे कधीतरी विकते. माझा मुख्य व्यवसाय आहे, ज्वेलरी मेकिंग,” रेखा पागधरे सांगत होत्या. जनार्दन पागधरे आणि तारा पागधरे या सुशिक्षित कुटुंबाला तीन मुले, दोन मुलं आणि एक मुलगी रेखा. रेखाचे वडील म्हणजे जनार्दन हे खाजगी कंपनीत काम करायचे, तर आई परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापिका. माहिम कोळीवाड्यातले सुशिक्षित आणि सुस्थितीत असलेले हे कुटुंब. पण, घरातल्या इतर सदस्यांबरोबर मासे विकायला मुख्याध्यापक असलेल्या रेखाच्या आईने किंवा उद्योजिका रेखाने कधीही लाज बाळगली नाही.

 

रेखाला लहानपणापासूनच उद्योगाची आवड तसेच ‘हटके’ काहीतरी करायचे, हाही रेखाचा मूळ स्वभाव. त्यामुळे तिने दहावीनंतर ड्राप्टसमनचा कोर्स केला. कलाकुसरीची आवड असल्याने ‘ज्वेलरी मेकिंग’ आणि पुढे ‘टेक्सटाईल्स डिझायनिंग’चा कोर्स केला. हे सगळे करत असताना रेखा समाजाच्या कबड्डी संघातर्फे महाराष्ट्र स्तरापर्यंत खेळत होती. घर आणि वाड्याच्या कोळी मांगेला समाजाच्या संस्कृतीमध्ये रेखाचे आयुष्य चारचौघा मुलींसारखेच व्यतीत होत होते. मात्र, तरीही रेखाला एक प्रश्‍न नेहेमी पडे की, आपले दैवत एकविरा आई आणि खंडोबा, असे असतानाही समाजात, वाड्यात वेगवेगळ्या बाबांचे प्रस्थ होते. इतरही अनेक अंधश्रद्धा होत्या. हे सर्व जीवन कसे पालटणार? अशातच रेखा अखिल भारतीय मांगेला समाजाचे काम करू लागली. या माध्यमातून समाजाचे विविध प्रश्‍न सोडवू लागली. कोळीवाड्यांच्या जमिनीचा प्रश्‍न कायम प्रलंबित होता. कोळीवाड्यांचा विकास कसा व्हावा? रेखा सामाजिक माध्यमातून त्यासाठी जागृती करू लागली. समुद्र हा समाजाचा देव. समुद्रात जाळं टाकलं की, पूर्वी मासळी जाळ्यात यायची. पण, गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये समुद्रामध्ये प्रदुषणाचा स्तर वाढून मासळीही मिळेनाशी झाली. समुद्रावर अवलंबून असलेल्या कोळ्यांनी करायचे काय? या पार्श्‍वभूमीवर रेखाने मुंबई आणि मुंबईलगतच्या कोळीवाड्यांमध्ये व्यवसायकौशल्य शिकवायला सुरुवात केली. शेकडो समाजबांधवांनी त्यात सहभाग घेतला. या माध्यमातून माहिम, विरार, बोईसर, तारापूर या ठिकाणी काहींनी उद्योगही सुरू केले. कोळीवाड्यांमध्ये जाताना रेखा एक विचार घेऊन जाऊ लागली की, “पारंपरिक व्यवसायात अडचण येऊ लागली, तर हातावर हात टाकून बसण्यापेक्षा नवा दृष्टिकोन स्वीकारून कामाला लागा. त्याचबरोबर आपली संस्कृती आणि आपला समाज सोडू नका.”

 

कोळीवाड्याला भेट दिल्यावरच कळते की, आजही इथे स्वत:चे असे खास समाजवैशिष्ट्य आहे. कालपर्यंत कोळीवाड्यात जातपंचायत होती. समाजाचे खटले पंचायतच सोडवायची. पण, काही वर्षांपूर्वी जातपंचायतीवर बंदी आली. त्यामुळे ज्यांना पोलीस किंवा कोर्टाची पायरी चढायची नाही, पण सामोपचार करून हवा आहे अशांना प्रश्‍न पडला जायचे कुठे? या दरम्यान रेखा वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या सदस्या होत्या. मांगेला समाजाची प्रतिनिधी म्हणून कौटुंबिक समस्यांवर समुपदेशन करत असे. त्यामुळे कोळीवाड्यांमधील कौटुंबिक किंवा आपापसातील काही तक्रारी समस्या असतील, तर त्या कायद्याच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न रेखाने सुरू केला. त्यात चांगले यशही आले. तसेच समाजाच्या दृष्टीने उपवर मुलामुलींचे विवाह जुळणे, हे मोठे वेळखाऊ आणि तितकेच महत्त्वाचे काम. शिवाय विवाह जुळवल्यावर ते यशस्वी झाले तर ठीक; नाहीतर विवाह जुळवणाऱ्याला आयुष्यभर ऐकावे लागते की, यानेच आमचे लग्‍न जुळवून आयुष्य खराब केले. मांगेला समाज कुलाबापासून डहाणू नानी-दमणपर्यंत पसरलेला. पण, ब्रिटिशकालीन आणि पोर्तुगीजकालीन राज्यात मांगेला समाजाचे काही लोकं लंडनला स्थायिक झाले. जहाज बांधणी, जाळे तयार करणे, समुद्रावर राज्य करणे यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नव्हते. याच कामासाठी ते लंडनला गेले. आता तिथे त्यांची पाचवी पिढी नांदते आहे. इतक्या पिढ्या लंडनला वाढल्यानंतरही या मांगेला बांधवांचे राष्ट्र किंवा समाजप्रेम कमी झाले नाही. विदेशातील या बांधवांचा आपल्या इथल्या बांधवांशी संपर्क-समन्वय राखण्याचे कामही रेखा समाजाच्या मदतीने करतात.

 

“गडाखालील गावामध्ये ‘ती’ घर, कुटुंब, लहान बाळाला सांभाळत गडावर व्यवसाय करायची. संध्याकाळी रोजगार आटपून ती पुन्हा गड उतरायची. एके दिवशी गडाची सर्व दारे बंद झाल्यावर केवळ आपल्या चिमुकल्यासाठी जीवावर उदार होत ती गड उतरली. ‘ती हिरकणी.’ तिचे शौर्य तिचे कर्तृत्व आपण इतिहासात वाचलेच असेल. मला माझ्या समाजासाठी हिरकणी व्हायचे आहे. समाजाचे हित साधत समाजाला सोबत घेऊन उद्योग-व्यवसाय करायचा आहे.”


@@AUTHORINFO_V1@@