सदाबहार सतेज मित्र!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018
Total Views |

 


 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबई महानगर तसेच कोकण प्रांतामध्ये गेल्या चाळीस दशकांहून अधिक काळ स्वयंसेवक म्हणून कार्यरत असणारे आणि विविध जबाबदाऱ्या सांभाळणारे रवींद्र पवार यांचे गुरुवार दि. ९ ऑगस्ट रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. रवींद्र पवार यांच्या स्मृतींना या लेखातून उजाळा देत आहोत.

 

आज श्रद्धांजली सभा

 आज सोम. दि. २० ऑगस्ट रोजी रवींद्र पवार यांची श्रद्धांजली सभा सायं. ७:०० वा. यशवंत भवन, २ रा मजला येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी यावेळी सर्वांनी आपण उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे.

 

१९६० च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटन सर्व पैलूंसह दृढमूल आणि विकसित होण्यास सुरुवात झाली होती. संघटनेच्या ध्येयवादाशी सुसंगत वैचारिक भूमिका सिद्ध आणि स्पष्ट होणे, त्या भूमिकेशी सुसंगत अशा कार्यक्रम आणि कार्यशैलीचा विकास आणि त्यांच्या आधारे भौगोलिक, सामाजिक आणि संख्यात्मक विस्तार घडून येणे अशी समग्र विकासप्रक्रिया गती घेऊ लागली होती आणि नेमक्या याच काळात रवींद्र तुकाराम पवार या ऐन विशीतल्या कार्यकर्त्याची जडणघडण होत होती. सिद्धांत, कार्यक्रम, कार्यकर्ता आणि कार्यशैली हे संघटनात्मक मजबूतीचे मूलाधार. या चारही बाबींची एकरूपता आणि परस्परपूरकता जितकी पक्की तितके संघटन बळकट. या सर्व बाबतीत रवी पवार त्यांचे तत्कालीन समवयस्क सहकारी चढाओढीने कर्तबगारी गाजवित होते. एका उदाहरणाने हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल असे वाटते.

 

विद्यार्थ्यांचा विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सामाजिक सहभागहा त्या काळात अभिनव ठरणारा मूलभूत विचार विद्यार्थी परिषदेने १९६५-६६च्या सुमारास मांडला आणि अंगीकारला. ‘आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक’ ही विचारसरणी तेव्हा रूढ होती. अशा वेळी ‘तो उद्याचा नव्हे आजचाच नागरिक आहे. एका बाजूने तो सर्व प्रकारच्या सामाजिक ताणतणावांनाही पालकपिढीइतकाच सामोरा जातो, तर दुसऱ्या बाजूने त्या तणावांशी समंजसपणे सामना करण्याची बौद्धिक, शारीरिक क्षमताही संपादित करत असतो. त्यामुळेच तो आजचा नागरिक आहे, या दृष्टीनेच सार्‍या सामाजिक क्रिया-प्रतिक्रियांमध्ये त्याचा सहभाग आवश्यक आहे. ही वैचारिक धारणा परिषदेने प्रसृत केली. याविषयीच्या चिंतन प्रक्रियेमध्ये वयाची विशीही न गाठलेले जे तरुण कार्यकर्ते हिरीरीने सहभागी होत होते. त्यात रवी पवार अग्रेसर होता. प्रदीप राणे, चंद्रकांत चव्हाण, सतीश मराठे, निर्मला धारप इ. सर्व कार्यकर्ते महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता समाजस्थितीचा, स्वतंत्र देशाच्या उभारणीचा, एकेका क्षेत्रातील प्रश्नांचा-समस्यांचा आणि आव्हानांचा वेधही घेत होते. रवी पवार तर लालबाग, परळ या कामगारबहुल, संवेदनक्षम अन् सक्रिय (तळलीरपीं) बहुजन वस्तीतला तरुण. त्यामुळे तो नित्य जीवनातल्या सामाजिक ताणतणावांचाही स्वाभाविक साक्षीदार होता. अन् जन्मत:च सूक्ष्मबुद्धी आणि कर्मप्रवणता (रूढ परिभाषेत सांगायचे तर ‘चळवळ्या स्वभावाचा’) या गुणांचा संगम त्याला लाभला होता. त्यामुळे रा. स्व. संघाचा आणि विद्यार्थी परिषदेचा त्याला लाभलेला स्पर्श एक ‘समसमा संयोग’ घडवून आणणारा होता.

 

१९४६च्या एप्रिल महिन्यात जन्मलेले रवींद्र पवार हे सहा भावंडांमधील सर्वात ज्येष्ठ भाऊ. परळच्या आर.एम. भट विद्यालयात शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांचा संघाच्या शाखेशी संबंध आला, तर पुढे बांद्रा येथील नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. यशवंतराव केळकर यांच्याशी स्नेह जुळला. यशवंतरावांच्या या संपर्कातून रवीची पावले सहजपणे विद्यार्थी परिषदेकडे तर वळलीच, पण त्यातूनच त्याच्यातील कार्यकर्त्याच्या विकास प्रक्रियेला एक प्रगल्भ कोंदण प्राप्त झाले. पुढे स्वाभाविकपणेच एका प्रतिभासंपन्न कार्यकर्त्याच्या स्वरूपाकडे अत्यंत वेगाने वाटचाल सुरू झाली. नॅशनल कॉलेजनंतर पदवी शिक्षणाची एक-दोन वर्षे त्याने दादरच्या कीर्ती महाविद्यालयात घालवली. पदवी प्राप्त झाल्यानंतर व्यक्तिगत जीवनाची मांडणी करण्यापूर्वी विद्यार्थी परिषदेच्या कामालाच सर्वाधिक प्राधान्य आणि सर्व वेळ देण्याचा मार्ग त्यांनी निवडला. ‘पूर्णवेळ कार्यकर्ता’ ही संकल्पना तोपर्यंत परिषदेत रूढही व्हायचीच होती. ती आता वैशिष्ट्यपूर्ण झालेली परंपरेची पायवाट रेखाटण्यापासून तिचा प्रशस्त मार्ग बनविण्याच्या प्रक्रियेत ज्यांनी पुढाकार घेतला त्यातले एक प्रमुख शिलेदार म्हणजे ‘रवी पवार.’ मुंबईतून संचालित होणारा संघटनात्मक विस्तार महाराष्ट्राच्या आणि देशातील अन्य प्रांतांच्या प्रमुख शहरांपर्यंत क्रमश: संक्रमित झाला आणि महाराष्ट्राचे पहिले प्रदेशमंत्री या नात्याने रवींद्र पवार यांचीच निवड झाली. एकूण संघटनात्मक, सैद्धांतिक जडणघडणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणार्‍या काळात रवींद्र पवार विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून छात्रशक्तीचे दमदार नेतृत्व करीत होते.

 

भाषणांपेक्षा सहज संवादावर भर, अतिशय प्रसन्न अन् मिश्किल स्वभाव, नेहमीच प्रफुल्लित आणि उत्साहाचा आविर्भाव या त्यांच्या दृश्य बहिरंगाच्या आत मात्र एक विचारशील, संघटनकुशल आणि धुरंधर अंतरंग हा रवींद्र पवार यांचा व्यक्तिविशेष. प्रा. यशवंतराव केळकर यांच्या प्रगल्भ मार्गदर्शनाचा तंतोतंत आणि समजूतदारपणे अनुसरण करीत त्यांनी परिषदेच्या संघटनेला सुसंघटित आकार देण्याची महत्त्वाची भूमिका निभावली. नाविन्यपूर्ण आणि अभिनव कार्यक्रमांचे कल्पक आयोजन करून विद्यार्थ्यांना संघटीत करण्याची अजब हातोटी त्यांच्यापाशी होती. माटुंग्याच्या पाच उद्यान भागातल्या एका उद्यानात साहचर्य संध्या (फेलोशिप नाईट) नावाचा अगदी अभिनव उपक्रम त्यांच्याच कल्पनेतून आयोजित करण्यात आला. विद्यापीठ पातळीवरील विविध प्रश्नांपासून एकूण शैक्षणिक व्यवस्थेच्या रचनेपर्यंत अनेक आंदोलने विद्यार्थी परिषदेने यशस्वीरित्या उभारली. त्यांचे नेतृत्व करताना आवश्यक ती आक्रमकता, संघर्षशीलता आणि त्याचवेळी सूचना आणि रचनात्मक दृष्टीकोन यांचा उत्कृष्ट समतोल त्यांच्या वृत्तीतही होता आणि कार्यशैलीतही. त्यामुळे लौकिक पातळीवर एक कुशल विद्यार्थी होता, अशी ख्याती त्यांनी प्राप्त केली. कुलगुरू, प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ यांच्यापासून सामान्य किशोरवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींशी सहज स्नेहाचा संपर्क आणि संवाद हे त्यांचे आणखी एक आगळेपण. त्यामुळेच ज्या महाविद्यालयाचे ते विद्यार्थी होते, त्या कीर्ती कॉलेजचे प्राचार्य, ज्येष्ठ विचारवंत मे. पुं. रेगे यांच्या आस्थेचा लाभ त्यांनी प्राप्त केला होता. पुढच्या काळात तर त्याच कीर्ती कॉलेजच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षस्थानही त्यांनी समर्थपण सांभाळले.

 

देशात आणीबाणी लागू झाली तेव्हा त्याविरुद्ध सत्याग्रह करत तीन महिन्यांचा कारावासही रवी पवार यांनी भोगला. आणीबाणीनंतर रा.स्व. संघाच्या परळ भागाचे कार्यवाह, त्यानंतर कोकण क्षेत्राचे सहकार्यवाह अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी निभावल्या. आज परळ भागात ‘यशवंत भवन’ हे संघाचे मर्मस्थान असलेल्या कार्यालयाच्या उभारणीचा महाप्रकल्प रवींद्र पवार यांच्या बहुआयामी कर्तबगारीची ठळक साक्ष देत उभा आहे. डेक्कन शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून ते निवडून आले होते. तसेच त्याच काळात कोकणात राजापूर आणि पोलादपूर तालुक्यातील गोलगणी येथील शाखांचे प्रमुखपदही त्यांनी समर्थपणे निभावले.

 

गेल्या दहा-बारा वर्षांपासून त्यांना किडणीच्या विकाराचा त्रास होत होता. नियमितपणे डायलॅसिसचा उपचार घ्यावा लागत होता. तरीही त्यांची कर्मप्रवणता देशभरही कमी झाली नव्हती. यशवंत भवनच्या विस्तीर्ण पसार्‍याच्या व्यवस्थापनात ते अखेरच्या महिन्यापर्यंत सक्षमपणे कार्यरत होते. निसर्गक्रमाने आजार बळावला आणि त्यातच वयाच्या ७२व्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रीयता, समाजसंघटन, सर्वस्पर्शी दृष्टिकोन आणि धुरंधर संघटनकुशलता यांचा एक आदर्श मानदंड सिद्ध करणारे सदाबहार, सतेज व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या लखलखीत आणि प्रेरक स्मृतींना विनम्र अभिवादन!
 
-अरुण करमरकर 

[email protected]

९३२१२५९९४९

@@AUTHORINFO_V1@@