शेवटच्या दीड तासात मतदारांची लगबग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018
Total Views |

वेळ संपताना वाढल्या रांगा, जळगावकरांचा असाही ‘प्रामाणिकपणा’, पोलीसही हैराण

 
 
जळगाव :
जळगाव महापालिकेच्या १९ प्रभागांतील ७५ जागांसाठी बुधवारी ४६९ मतदान केंद्रांमध्ये मतदान झाले. सकाळच्या सत्रात फारसा प्रतिसाद न देणार्‍या काही मतदारांनी दुपारी ३ ते ३.३० वाजेनंतर मात्र, मतदानासाठी तोबा गर्दी केली होती. बहुतेक मतदान केंद्रात मतदानाची वेळ संपत असताना मतदारांच्या रांगाही वाढत होत्या. काहींचा मतदानाचा असा ‘प्रामाणिकपणा’ पाहून पोलीसही चक्रावले.
 
 
निवडणुकीच्या रिंगणात भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी, अपक्ष व इतर पक्षांचे मिळून ३०३ उमेदवार आहेत. शहरातील ४६९ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात पन्नाशीच्या आतील अनेक सुशिक्षित मतदारांमध्ये अनुत्साह होता. दुपारी दीड वाजेपर्यंत केवळ २२.२४ मतदान झाले. ही आकडेवारी पाहून राजकीय पक्षांचे धाबे दणाणले. मतदानाची टक्केवारी एवढी कमी राहील, याचा अंदाज त्यांनी बांधलेला नव्हता. मग मतदारांना मतदानासाठी ‘प्रोत्साहित’ करण्याची कसरत सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली. त्याची व्यवस्था लावली गेली. त्याने अपेक्षित परिणाम साधला गेला आणि रिक्षा व चारचाकी वाहनांतून येणारे मतदार दिसू लागले. दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास मतदान केंद्रात मतदारांची गर्दी वाढू लागली. शेवटच्या दीड तासात तर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र सर्वच मतदान केंद्रात दिसत होते. यात जसे मोलमजुरी करणारे होते, तसे चारचाकी वाहनांमधून आलेले सुशिक्षितही दिसत होते.
 
 
खासगी कंपनीतील नोकरदारांचे सकाळी मतदान, मतदारांसाठी होती वाहनांची व्यवस्था
जळगाव :
मेहरूण परिसरातील मतदान केंद्रांवर सकाळी ११ वाजेपर्यंत संथगतीने मतदान सुरू होते. सकाळी नोकरीला जाणार्‍या मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळी ११ वाजेनंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. नेहरूनगर भागातील सेंट टेरेसा स्कूलमध्ये सकाळी वर्दळ कमी होती. खासगी कंपनीतील नोकरदारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. विद्या इंग्लिश स्कूल व मनपा शाळा क्रमांक १९ मध्ये अधूनमधून मतदारांची वर्दळ सुरू होती. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. तांबापुरा व मेहरूण या मिश्र वस्तीमध्ये मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी रिक्षा व वाहनांचा वापर करण्यात येत होता. या. दे. पाटील विद्यालय, राज माध्यमिक विद्यालयात याठिकाणी सकाळी १० वाजेनंतर मतदारांची गर्दी वाढली. सिंधी कॉलनीतील मतदान केंद्रात सकाळी ११ वाजेनंतर मतदारांची गर्दी वाढली.
 
मुलाने ईव्हीएमची बटणे दाबल्याने गोंधळ
लेवा समाज भवन मतदान केेंद्रातील दुपारची घटना
जळगाव :
लेवा भवन येथील मतदान केंद्रावर दुपारी २. ३० वाजेच्या सुमारास गोंधळ झाला. वृद्ध महिलेसोबत युवक मतदान केंद्रात आला व वृद्धेला काही समजत नाही, असे म्हणत ईव्हीएमची बटणे या मुलाने दाबून मतदान केले, त्यामुळे गोंधळ उडाला. सर्वपक्षांच्या उमेदवारांनी एकत्र येऊन गोंधळ घातला. सुमारे १० मिनिटांच्या गोंधळानंतर वातावरण शांत झाले. नेहमीप्रमाणे पोलीस सर्व झाल्यानंतर पोहोचले. सिंधी कॉलनी परिसरातसुद्धा काही प्रमाणात गोंधळ झाला.
 
 
खा. ए. टी. पाटील, आ.सुरेश भोळे, माजी आ. गुरुमुख जगवाणी यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. दुपारी १२ ते ३ कालखंडात मतदान संथ राहिले, पण ४ वाजेनंतर मतदान केंद्रांवर गर्दी दिसू लागली. रामानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुसावळ येथील भाजपा नगरसेवकाची गाडी समतानगरजवळ लॉक केलेली आढळल्याने गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. दरम्यान, उशिरापर्यंत कोणतीही कारवाई पोलिसांनी केलेली नव्हती. दिवसभर विविध तक्रारीच्या अनेक घटना घडल्या.
 
 
उमेदवारांच्या केंद्रांना भेटी
मेहरूण भागात सकाळी मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून रिंगणात असलेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते केंद्रांच्या बाहेर उभे होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलीस बंदोबस्त होता. संवेदनशील केंद्रांवर कार्यकर्ते आणि मतदारांची गर्दी अधिक असल्याचे पाहण्यास मिळाले. सकाळी ९ वाजेनंतर उमेदवार बाहेर पडून प्रत्येक केंद्रावर जाऊन चाचपणी करत होते. परंतु, हुडको परिसरातील केंद्रावर उमेदवार वारंवार येत असल्याने पोलिसांनी उमेदवाराला हटकले. वारंवार केंद्रावर न येता दोन तासांनी येण्याचे पोलिसांनी उमेदवारास सांगितले.
 
 
नवमतदारांमध्ये उत्साह
यंदाच्या निवडणुकीत नवमतदारांनी मतदान करण्यासाठी उत्साह दाखवून मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे युवकांसह युवतींनी मतदान केले. पहिल्यांदाच मतदान केल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता.
 
 
वेळ संपल्यानंतर प्रवेशद्वार बंद, हद्दीतील मतदारांनाच मिळाली संधी
५.३० वाजेनंतरही उर्दू शाळा क्रमांक १५ मध्ये तोबा गर्दी
गेंदालाल मिलमधील उर्दू शाळा क्रमांक १५ मध्ये आत प्रवेश केल्यावर तीनही बाजूने मतदान केंद्रे होती. शाळेचे पटांगण, इमारतीमधील पॅसेजमध्ये मतदारांची तोबा गर्दी होती. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्राच्या हद्दीत रांगेत उभे असलेले मतदार वगळता इतरांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात येऊन मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. यानंतर नवीन कोणत्याही मतदारास आत प्रवेश देण्यात येत नव्हता.
 
हिरोगिरी करणार्‍याला ठणकावले
गेंदालाल मिलजवळील अ. करीम सालार इंग्लिश मीडियम स्कूलमध्येही मतदान केंद्र होते. मतदानाची वेळ संपल्यानंतर तेथील मुख्य प्रवेशद्वार लावून घेण्यात आले. यावेळी कडक इस्त्रीचा पांढराशुभ्र शर्ट आणि जीन्स पॅण्ट परिधान केलेला एक तरुण मतदान केंद्रात जाऊ देण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घालू लागला. पोलिसांनी सुरुवातीला त्याला वेळ संपली असल्याचे समजावून सांगितले. पण त्याचा या तरुणावर काहीच परिणाम झाला नाही. त्याची हिरोगिरी पाहून संतापलेल्या पोलीस कर्मचार्‍याने या तरुणाला चांगलेच ठणकावले. या केंद्रात दिवसभरात अशा दोन ते तीन घटना घडल्याची माहिती मिळाली.
मतदारांना नेण्यासाठी धावपळ
मतदारांकडून मतदान करवून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. तांबापुरा भागात काली-पिलीद्वारे मतदार जात होते. शहरात चोख पोलीस बंदोबस्त होता. शाहूनगर भागात ४ वाजेनंतर मतदार बाहेर पडले.
 
मतदान केंद्रात गोंधळ
जळगाव मनपाच्या निवडणुकीत मतदान करताना प्रशासनाकडून ईव्हीएम यंत्रांवर प्रभागांचे क्रमांक नसल्याने मतदारांचा मतदान करतांना गोंधळ झाला. सुशिक्षित मतदारांमध्येच गोंधळ झाल्याने अल्पशिक्षित किंवा अशिक्षित मतदारांची काय अवस्था झाली असेल याचा अंदाज येतो. प्रभाग ३ मध्ये पार्वतीबाई शाळेतील बूथ क्र. २१ मध्ये हा गोंधळ झाला.
 
शिवाजीनगरमध्ये अंदाजच येत नव्हता
शिवाजीनगरमधील महापालिका शाळा क्रमांक १ मधील मतदान केंद्रात दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानासाठी येणार्‍यांची संख्या तुरळक होती. त्यानंतर बघता-बघता मतदारांच्या गर्दीने अचानक शाळेचे पटांगण फुलले. जिकडे पाहावे तिकडे मतदारच दिसत होते. अख्खा दिवस वाया घालवून शेवटच्या दोन ते अडीच तासात मतदानाचा अधिकार आठवलेल्यांना काय म्हणावे, असा प्रश्‍न पोलिसांनाही पडला.
 
निमखेडीत गर्दी
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१८ प्रभाग क्रमांक ८ मध्ये सकाळपासून संथगतीने मतदान सुरू होते. दरम्यान, सर्व पक्षांचे कार्यकर्ते हे शेतकी शाळेच्या आवारात असल्याने पक्षांची कार्यालये ओस पडलेली दिसून येत होती. मतदार राजांना पक्षांचे कार्यकर्ते हे रिक्षा, जीप, दुचाकी आणि अन्य वाहनांतून घेऊन जाऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत होते. त्याचप्रमाणे मतदानासाठी पैसे वाटपाचीही चर्चा होती. संथगतीने होत असलेल्या या मतदान प्रक्रियेने सायंकाळी जोर धरला. सायंकाळी मतदार मोठ्या संख्येने आल्याने बूथला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शेतकी शाळेच्या आवारात वाहनधारक, चारचाकी वाहनधारक व मतदारांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने त्यांना आवरणे पोलिसांना कठीण झाले होते. या प्रभागात सायंकाळी वाहतुकीची कोंडी झाल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. सायंकाळी काही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही विपरीत घडू नये म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करीत कायदा, सुव्यवस्था कायम ठेवली.
 
@@AUTHORINFO_V1@@