सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिक सरसावले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018
Total Views |

सुशिक्षितांमध्ये अनुत्साह, पहिल्या दोन तासात ५ टक्के मतदान

 
 
जळगाव :
जळगाव महापालिकेच्या १९ प्रभागांतील ७५ जागांसाठी बुधवारी मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदानासाठी प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक सरसावले तर वय वर्षे पन्नाशीच्या आतील काही सुशिक्षित वर्गात अनुत्साह दिसून आला. सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासांत ५ टक्के मतदान झाले.
 
 
जळगाव महापालिकेची निवडणूक भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली असून, रिंगणात भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी, अपक्ष व इतर पक्षांचे मिळून ३०३ उमेदवार आहेत. शहरातील ४६९ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली.
 
 
सकाळच्या सत्रात सर्वत्र ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. पन्नाशीच्या आतील सुशिक्षित मतदारांमध्ये अनुत्साह होता. पहिल्या दोन तासात ५ टक्के मतदान झाले. १८ हजार ५४९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष ११ हजार ४५४, महिला ७ हजार ९५ यांचा समावेश आहे.
 
 
शिव कॉलनी, गणेश कॉलनी, शाहूनगर, नवीपेठ, शनिपेठ, भीलपुरा चौक, शिवाजीनगर, बळीरामपेठ, प्रभात कॉलनी, मायादेवीनगर भागातील मतदान केंद्रांत मतदान करायला येणार्‍यांची संख्या तुरळक होती. शाहूनगर, शिवाजीनगर, गेंदालाल मिल, शनिपेठ, भीलपुरा, बळीरामपेठ या भागात मतदान केंद्रांच्या बाहेर गर्दी होती पण, केंद्रात मतदान करताना एखाद-दोनच दिसत होते.
 
चांगला प्रतिनिधी निवडून द्यायची संधी : दलूभाऊ जैन
सकल जैन समाजाचे संघपती दलूभाऊ जैन म्हणाले की, प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार भारतीय राज्यघटनेने प्रदान केला आहे. चांगला प्रतिनिधी निवडून द्यायची ही संधी असते. त्यामुळे मतदानाचा अधिकार प्रत्यकाने बजवायला हवा.
 
उल्हास साबळे यांनी केले प्रशासनाचे कौतुक
माजी नगरसेवक उल्हास साबळे यांनी प्रशासनाने मतदानासाठी केलेल्या नियोजनाचे, लावलेल्या व्यवस्थेचे कौतुक केले. पण यंदापासून चार उमेदवारांचा एक प्रभाग झाला आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत संपर्क साधणे उमेदवारांना कठीण गेले असल्याचे सांगितले. यंदा बदल निश्‍चित असल्याचेही ते म्हणाले.
 
 
दोनपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई
प. न. लुंकड कन्या शाळेच्या समोरील रस्त्यावर कोणालाही उभे राहू दिले जात नव्हते. या शाळेत मतदान केंद्र आहे. दोन वा त्यापेक्षा जास्त संख्येत मतदार जमल्यास त्यांना तातडीने हटकले जात होते. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या पाच ते सहा दिवसांत तणाव निर्माण करणार्‍या घटना घडल्याने पोलीस कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे दिसत होते. सर्वच मतदान केंद्रांच्या बाहेर कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती होती.
 
अपंगांसह वयोवृद्धांचा मतदानासाठी पुढाकार
बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळपासून अपंगांसह वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. अशा मतदारांना वाहनांद्वारे आणून मतदान केंद्रांवर त्यांचे मतदान करवून घेतले. त्यांना केंद्रात मतदान करण्यासाठी लवकर सोडण्याचे प्रयत्न करण्यात आले.
 
 
अफवांचे पेव
मतदारांना २ हजार रुपये मतदानासाठी मिळणार, दुपारी ३ वाजता ३ हजार व सायंकाळी ४ वाजता ५ हजार रुपये होणार, अशा अफवा दिवसभर पसरत राहिल्या. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
मेहरुण परिसरात मतदारांमध्ये संभ्रम
मतदानावेळी हाणामारीसह इतर घटनांच्या अफवांचे पेव फुटल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्याचा परिणामही बहुतांश प्रमाणावर सकाळी जाणवला होता. मात्र, मतदारांनी वातावरणाची माहिती घेऊन मतदानाला बाहेर पडण्यासाठी पसंती दिली. किरकोळ प्रकार वगळल्यास मतदान मात्र रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
 
यशवंतराव मुक्तांगण हॉलमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा
प्रभाग क्र.६/७ मध्ये दुपारी २ वाजेपर्यंत केवळ २५० जणांनी मतदान केले होते. मात्र, मतदानाची वेळ संपायला १५ मिनिटे शिल्लक असतांना २५० ते ३०० मतदार मतदान हॉल परिसरात शिरले. त्यामुळे मतदानाची वेळ ५.३० वा. संपली असली तरी या ऐनवेळी आलेल्यांचे मतदान रात्री ८.३० पर्यंत सुरू होते.
 
रिक्षावाल्यास १००० ते बूथ प्रतिनिधीला ५०० रू. रोज
दुपारी उशिरापर्यंत मतदान कमी झाले असल्याने उमेदवार मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत होते. त्यासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविणे आणि परत घरी आणून सोडणे असा अनावश्यक भुर्दंडही अनेक उमेदवारांना बसला.त्यासाठी रिक्षाचालकांना १ हजार तर बूथ प्रतिनिधीला ५०० रू. प्रमाणे रोजगार मिळाला.
 
कारागिरांना घरीच राहणे केले पसंत
मतदानासाठी सुटी होती, परंतु खासगी व्यावसायिकांनीदेखील दुकाने बंद ठेवली होती. याबद्दल ऍटो पार्ट्सच्या दुकानदारांशी संपर्क साधला असता, आम्ही मजुराला ३०० रुपये रोज देतो. आज मतदान असल्याने लक्ष्मीदर्शन रोजंदारीपेक्षा अधिक असल्याने मजुरांनी घरीच राहणे पसंत केले, असे व्यावसायिकांनी सांगितले.
 
पैसे वाटपाच्या अफवेने उमेदवार, कार्यकर्त्यांची दिवसभर दमछाक
महापालिकेच्या १९ प्रभागातील ७५ जागासाठी मतदान झाले. त्यासाठी शहरातील प्रभागनिहाय वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या बुथवर उमेदवारासह कार्यकर्ते धावपळ करत होते. त्यामुळे त्यांची दिवसभर चांगलीच दमछाक झाली. पैसे वाटपाच्या दिवसभर अफवा सुरू राहिल्याने कार्यकर्ते त्याठिकाणी धावधाव करीत होते.
 
 
लक्ष्मीदर्शनच्या अफवेने नागरीक मतदानासाठी थांबल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात त्याठिकाणी गेल्यावर अफवा असल्याचे समोर आले. पैसे वाटपाची माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी अधिकारी गेले तर तेथे काही मिळालेले नव्हते. त्यामुळे दिवसभर पैसे वाटपाच्या अफवा सुरूच राहिल्या. शहरातील बहुतांश वार्डांमध्ये मतदानासाठी नागरीकांनी पाच वाजेनंतर गर्दी केली होती. तसेच जेष्ठ नागरीकांना काही वार्डांमध्ये कार्यकर्त्यांकडून रिक्षा उपलब्ध करून दिली जात होती. त्यामुळे जेष्ठ नागरीकांनी रिक्षाने येऊन मतदानाचा हक्क बजावत होते.
 
 
वाणी दाम्पत्याने शहरासाठी बजावला मतदानाचा हक्क
ज्येष्ठ नागरिक कमलाकर वाणी (वय ७६) व सुनंदा वाणी (वय ६८) यांनी योग्य उमेदवार निवडून येण्यासाठी आणि जळगावकरांना अधिक चांगल्या मूलभूत सोयी-सुविधा मिळण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे मत ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले. ते औरंगाबाद येथे जिल्हा परिषदेत सेवारत होते. निवृत्तीनंतर २००१ मध्ये जळगावला स्थायिक झाले. सलग तिसर्‍या टर्मसाठी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. खर्‍या अर्थाने ‘नगर’सेवक निवडून येण्यासाठी उमेदवाराचे नाव वाचून मतदान केल्याची माहिती सुनंदा वाणी यांनी दिली. महापालिका शिक्षण मंडळात असलेल्या मतदान केंद्रात सकाळच्या सत्रात चौधरी कुटुंबीय आले होते. यापैकी गीताताई चौधरी यांचे वय वर्षे ८०, कासूबाई चौधरी यांचे ७८ आणि पुरुषोत्तम चौधरी यांचे वय ८१ आहे. हे सर्वजण वयोवृद्ध असूनही आवर्जून मतदान करण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत दिलीप चौधरी होते.
 
मतदारांना नाही समजले ईव्हीएम मशिन्सचे गणित
प्रत्येक प्रभागात ४ उमेदवार असल्याने चारवेळा बटन दाबायचे होते. परंतु, एका मशिनवर २ प्रभाग दिल्याने आणि मशिन्स दोनच असल्याने मतदान करतांना अनेक मतदारांचा गोंधळ उडाला. काहींना तर मतदान नेमके कसे करावे हे न समजल्याने त्यांनी दिसेल तसे बटन दाबत मतदान केले. त्यामुळे हे मतदान नेमके कुणाला गेले हे निकाल लागल्यावरच कळू शकेल.
 
 
सर्वांचाच बहुमताचा दावा
मतदान अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे. मोठमोठे, अवाढव्य वॉर्ड, मतदार याद्यांमधील घोळ याचाही परिणाम झाला. मात्र मतदारांनी मनपाच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त केलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे मिशन ५० पूर्ण होईल व महापौर भाजपचाच होईल.
- आमदार सुरेश भोळे, जळगाव महानगर भाजपाध्यक्ष
मतदान मागील निवडणुकीच्या तुलनेत तेवढेच किंवा जवळपास झालेले आहे. प्रशासनाने एवढे प्रयत्न करुनही, सामाजिक व शैक्षणिक संस्थांनीही जनजागरण करुनही मतदानाचे प्रमाण वाढलेले नाही. तरीही मतदारांचा कल पाहता शिवसेना निश्‍चितच पूर्ण बहुमत मिळवेल, महापौरही आमचाच होईल, अशी खात्री आहे.
- रमेशदादा जैन, शिवसेनेचे नेते, माजी महापौर
मतदान अपेक्षेपेक्षा कमी झाले. मतदारांची उदासीनता जाणवली. निकाल नेमके काय लागतील, याचा अंदाज करणे कठीण आहे. परवाच काय ते उत्तर मिळेल.
-गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस, माजी पालकमंत्री
केंद्र व राज्यातील सरकारची खराब कामगिरी आणि मनपाची सुविधाविहिन कारभार याबाबतही नाराजी याचा परिणाम मतदारांमध्ये जाणवला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व समाजवादी पार्टीचे निवडून येणारे उमेदवार मनपावर आपली हुकूमत राखणार आहेत.
- डॉ.राधेश्याम चौधरी. जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रीय कॉंग्रेस
प्रशासनाच्या हलगर्जी व बेपर्वा कारभारामुळे आणि अकारण मोठमोठे प्रभाग केल्यामुळे उमेदवार व शेकडो मतदारांची दमछाक होत गोंधळ उडाला. मतदान अपेक्षेपेक्षा कमी झाले. काहीही झाले तरी आमच्या नजीकचे भाजपचे सर्व १२ उमेदवार निवडून येतील.
- कैलास सोनवणे. माजी नगरसेवक, भाजपा.
 
@@AUTHORINFO_V1@@