शेअर बाजारात गुंतवणुकीपूर्वी..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018
Total Views |


 


आजपासून सुरु झालेल्या या नवीन लेखमालेचा उद्देश शेअर ट्रेडिंग, त्यात होणाऱ्या चुकांबद्दल, त्यात होणाऱ्या तोट्याची कारणे आणि नफ्याची गमके याबद्दल चर्चा आहे. यातून बोध घेऊन चांगले ट्रेडिंग करणारे, सुजाण गुंतवणूकदार निर्माण झाले तरच या प्रयत्नांना यश आले, असे म्हणता येईल.

 

सर्वात आधी आपण शेअर मार्केटमध्ये सर्वसामान्य जनता का नाही त्याचा विचार करू. खरे तर आपल्याकडे वरील उपरोक्त विषयाची भीती आणि अपप्रचार जास्त आहे. तरीही ढोबळमानाने शेअर मार्केट ट्रेडिंग या क्षेत्रात सर्वसामान्य क्षेत्रातील सहभाग कमी असण्याची खालील कारणे समोर येतात.

1) मार्केटबद्दलची माहिती : आपल्याला याबद्दल फार काही माहिती नाही, हे मान्य करतानाच, हे आपले काम नाही हा विचार वर्षानुवर्षे आपल्यावर बिंबवला गेला. खरे तर हा एक माहितीवर आधारित, योग्य निर्णय योग्य वेळी घेतल्यास, भरपूर नफा कमवून देणारा, एक खूप चांगला, उत्पन्नाचा पर्याय आहे. इतर कुठल्याही क्षेत्रात, जसे काहीतरी मिळवण्यासाठी आधी काहीतरी शिकायला लागते, अगदी तोच नियम इथेही लागू पडतो.

 

2) भांडवलाची कमतरता : शेअर ट्रेडिंगसाठी प्रचंड भांडवल लागते, या अपसमजामुळे घाबरूनच हे आपले काम नाही, अशी आपण आपली समजूत करून घेतो. खरेतर हा व्यवसाय अत्यल्प भांडवलात सुरू करता येतो. शेअर बाजारातील गाजलेल्या नावांबद्दल थोडे वाचन केलेत तर आपल्याही हे लक्षात येईल की, त्यांनी फारच थोड्या भांडवलापासून सुरुवात केली होती. ते लोक मोठे होण्यासाठी वाचन, मनन, अभ्यास, धडाडी, अचूक निर्णय अचूक वेळी घेण्याची त्यांची हातोटी हे त्यांचे गुण कारणीभूत होते .

 

3) तोटा झालेल्या लोकांची उदाहरणे : खरे तर या मार्केटला oppurunity gentrating machine म्हटले तरी वावगे ठरू नये. येथे तोटा होऊ नये म्हणून काही काळजी घ्यायची असते. तसेच नफा कमावण्यासाठी काही तत्त्वे पाळायची असतात. योग्य वेळी, योग्य निर्णय हेच येथील यशाचे गमक आहे. भावनिक गुंतवणूक, कोणाचा सल्ला घेणे, मार्केटच्या गतीच्या विरुद्ध दिशेने घेतलेले निर्णय आणि सगळ्यात महत्त्वाचे तर निर्णय चुकला हे कळूनही ‘stop loss’ लावल्यामुळे झालेला मोठ्ठा तोटा, यासारख्या गोष्टींमुळे खरेतर या लोकांचे नुकसान झालेले असते. मित्रहो, आज शेअर मार्केटमध्ये फक्त टक्के लोक (साधारण २५ दशलक्ष) कार्यरत आहेत. हळूहळू हा आकडा वाढत आहे. म्हणून योग्य निर्णय घ्यायची हीच वेळ आहे. योग्य प्रशिक्षण, चांगला अभ्यास आणि थोडेसे धाडस बस्स् ... एवढेच. हे सगळे तर आपल्याकडे आहेच. मागील चुकांमधून धडा गेऊन आपण आता पुढे जाऊया.

 

मित्रहो, वरील कारणांची यादी खरेतर खूप वाढवता येईल, परंतु आपण यापुढे आता काय टाळायचे यापेक्षा काय करायचे ते बघूया.

1) प्रशिक्षण : कुठल्याही क्षेत्रात काही तरी लक्षणीय करायचे असेल तर त्यासाठी लागणारे शिक्षण मिळवणे आवश्यक असते. वाचन, मनन याबरोबरच माहितीसाठी टीपकागद बनावे लागते. मार्केटचे सततचे निरीक्षण, कंपनीची माहिती वा तिचे ताळेबंद, सरकारचे निर्णय, इतकेच काय पर्यावरणही बाजारावर परिणाम करते. वेगवेगळ्या अर्थविषयक लेखांचे वाचन आणि सततचे निरीक्षण आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करते.

 

2) धंद्याचा दृष्टिकोन : शेअर ट्रेडिंगकडे बघायचा आपला दृष्टिकोन, आवड हा नसून स्वतःच्या मालकीचा एक उद्योग वा व्यवसाय असाच असला पाहिजे. प्रत्येक उद्योगाप्रमाणे हाही व्यवसाय चालवताना आपले प्लॅन्स, माहिती, नियम आणि ऑपरेशन नीती ही ठरवून त्याप्रमाणेच काम करणे गरजेचे असते.

 

3) तंत्रज्ञानाचा उपयोग : आज बाजारात अनेक स्वस्त चार्ट प्लॅटफॉर्म अतिशय स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत. याचे निरीक्षण आपल्याला मार्केटचे आकलन करायला आणि ट्रेडिंगची रणनीती आखायला मदत करते. मार्केटची वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती आता, आपल्या फोनवरसुद्धा उपलब्ध होऊ शकते. आपल्या ट्रेडिंगचे, आपण ठरवलेल्या पद्धतीचे फक्त ‘back testing’केले की आपली रिस्क कमी होते.

 

4) भांडवलाचे संरक्षण : याचा अर्थ प्रत्येक ट्रेड हा फायद्याचाच असला पाहिजे असं नाही तर, आपले भांडवल सुरक्षित ठेवण्यासाठी कृपया नको तेथे रिस्क घेणे असा होतो. ट्रेडिंग करताना एखादा तोट्याचा सौदा या व्यवसायाचा एक भाग असतो, परंतु त्यासाठी किंवा त्यामुळे अनावश्यक रिस्क टाळून आपण आखलेल्या रणनीतीप्रमाणे आणि आपण ठरवलेल्या नियमांप्रमाणेच ट्रेडिंग चालू ठेवणे गरजेचे असते. यात तुमच्या संयम आणि चिकाटीचा कस लागतो. (यातील जोखीम व्यवस्थापन हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे. ज्याचे आपण पुढे विवेचन करूच.)

 

5) सल्ला : जोपर्यंत आपण या व्यवसायात निपुण होत नाही, तोपर्यंत सल्ला घेणे गरजेचे असते. मात्र, आंधळे अनुकरण करता कारणे समजून घेतलीत तरच त्याच भविष्यात फायदा होतो.

 

6) अतिहव्यास टाळणे : धोका तेवढाच घ्या, जेवढा आपण सोसू शकाल. कुठलीतरी टीप ऐकून, प्रचंड धोका पत्करून कधीतरी आपल्याला नफा होईलही, परंतु बहुसंख्य वेळेला आपल्याला यातून तोटाच होतो. म्हणूनच आपले ठरलेले नियम वा टार्गेट यातकुठलाही बदल करता अतिरिक्त धोका वा हव्यास टाळणे भविष्यात उपयोगी पडतेच. पण, आपले भांडवल सुरक्षित राहते. मित्रहो, टार्गेट असायलाच हवे, कारण त्यासाठीच आपण प्रयत्न करत असतो. पण, ‘stop loss’ चाही विचार त्याचवेळी करून ठेवला पाहिजे. चांगले आणि दूरदृष्टीने आखलेले धोरण सहसा कधी आपल्याला संकटात नेत नाहीत. पुढील लेखात आपण बाजारातील काही महत्त्वाच्या टर्म्सबद्दल चर्चा करून मग ट्रेडिंग स्ट्रॅटेजीकडे वळूया.

 

-विजय घांग्रेकर

@@AUTHORINFO_V1@@