तुंगुस्का : ११० वर्षांनतरही रहस्यच...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 


१९२७ ते १९३० अशी तीन वर्षे तुंगुस्का परिसर अक्षरश: पिंजून काढला आणि नाना प्रकारची निरीक्षणं नोंदवली. मुळात सैबेरियन प्रदेशात लोकवस्ती फारच विरळ. त्यातून घटना घडून गेल्याला १९ वर्षे उलटलेली. त्यामुळे कुलिकला घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फारच थोडे मिळाले.

 

३० जून १९०८ . वेळ सकाळी सुमारे साडेसातची. स्थळ मध्य सैबेरियातील तुंगुस्का नदीचं खोरं. एकदम हजारो सूर्य एकाच वेळी उगवल्यासारखा लख्ख झगझगीत प्रकाश पसरला आणि डोळे दिपवून टाकणारा एक प्रचंड अग्निगोल धाडकन भूमीवर आदळला. भूकंप झाल्यावर हादरते तशी जमीन गदागदा हलली. पश्चिम युरोपातल्या काही भूकंपमापक यंत्रांवर भूकंप लहरीची नोंद झाली. सैबेरिया हा अतिशय दुर्गम प्रदेश रशियात आहे. ही घटना घडली, यावेळी रशियात झारशाही होती. झारच्या सरकारी अधिकाऱ्या कडून जगाला नंतर एवढंच समजलं की, अंतराळातून कुठून तरी येऊन पृथ्वीचा आदळलेला तो अग्निगोल इतका प्रलयंकारी होता की, त्याच्या आघातामुळे तुंगुस्का खोऱ्या तलं किमान दोन हजार चौरस कि.मी. परिसरातलं पाईन वृक्षांचं जंगल संपूर्ण नष्ट झालं आहे.

 

आताच्या काळात अशी घटना घडली, तर ताबडतोब जगभरातून संशोधक तुकड्या घटनास्थळी जाऊन थडकतील, पण ११० वर्षांपूर्वी अशी स्थिती नव्हती. विमान आणि मोटारी प्राथमिक अवस्थेत होत्या. शिवाय सैबेरियाचा प्रदेश इतका दुर्गम होता की, तिथे पोहोचायलाच कित्येक महिने लागले असते आणि झारशाहीच्या अंमलाखालच्या प्रदेशात जाणं इतकं सोपंही नव्हतं. अशा सगळ्या कारणांमुळे तुंगुस्का घटनेचा पहिला प्रत्यक्ष अभ्यास व्हायलाच १९२७ साल उजाडलं. या वेळेपर्यंत रशियात लाल क्रांती झाली होती. झारशाही जाऊन सोव्हिएतशाही आली होती. रशियन शास्त्रज्ञ लिओनिद अलेक्सेयोविच कुलिक याने १९२७ ते १९३० अशी तीन वर्षे तुंगुस्का परिसर अक्षरश: पिंजून काढला आणि नाना प्रकारची निरीक्षणं नोंदवली. मुळात सैबेरियन प्रदेशात लोकवस्ती फारच विरळ. त्यातून घटना घडून गेल्याला १९ वर्षे उलटलेली. त्यामुळे कुलिकला घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फारच थोडे मिळाले. त्यांनी सांगितलेल्या वृत्तांतानुसार ३० जून १९०८ रोजी सकाळी साडेसात-पावणेआठच्या दरम्यान एक प्रचंड अग्निगोल कानठळ्या बसविणारा आवाज करीत जंगलात कोसळला. जमीन गदागदा हादरली. डोळे दिपवून टाकणारा किंवा खरे म्हणजे डोळ्यांना आंधळे बनविणारा प्रखर प्रकाश पडला. तो अग्निगोल जिथे पडला तिथून वायूचा एक भलामोठा लोट उसळला आणि कितीतरी वेळ आकाशात जात राहिला. विशेष असे की, घटनास्थळाच्या सभोवारच्या ८०० कि.मी. त्रिज्येच्या परिसरातील साक्षीदारांनी कुलिकला हाच किंवा याच आशयाचा वृत्तांत सांगितला. ही झाली प्रत्यक्षदर्शींची साक्ष. आता घटनास्थळी कुलिक आणि त्याच्या शोधगटाला काय आढळलं? तर स्फोटाच्या सभोवार पाच लाख एकर्स किंवा सुमारे दोन हजार कि.मी. च्या पट्ट्यातील पाईन वृक्ष साफ आडवे पडले होते. अगदी एकही झाड उभं नव्हतं. स्फोटाच्या सभोवार १५ ते ३० कि.मी. त्रिज्येच्या परिसरातले वृक्ष अनुक्रमे जळून कोळसा होणं, ठिकऱ्या -ठिकऱ्या उडणं आणि उखडून फेकले जाणं अशा स्थितीत होते. पण, प्रत्यक्ष स्फोटस्थळी भूमीत एखादं विवर नसून फक्त दलदलयुक्त जमिनीचा एक पट्टा होता. वास्तविक घटना घडून गेल्यावर १९ पावसाळे उलटले होते. म्हणजे तिथे पुन्हा बऱ्या पैकी झाडाझुडपांचं रान माजायला काहीच हरकत नव्हती, पण तसं झालेलं नव्हतं. दलदलीचा तो पट्टा स्फोटाची खूण दाखवत तसाच शिल्लक होता. लिओनिद कुलिकच्या संशोधनाचा एवढा तपशील जगाला उपलब्ध झाला. म्हणजे शंकेखोर सोव्हिएत सरकारी अधिकाऱ्या च्या कचाट्यातून एवढाच वृत्तांत जगाला माहीत व्हावा म्हणून प्रकाशित करण्यात आला. मात्र, अन्य कुणाही संशोधकाला तिथे जायला मनाईच होती. अर्थात उपलब्ध तपशीलही भरपूर होता. मग त्यावर युरोप-अमेरिकेत आणखी संशोधन सुरू झालं. वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले. पहिला सिद्धांत असा की, एका विशालकाय उल्केने पृथ्वीला टक्कर दिली. तिचं वजन १ लाख ते १० लाख टन असावं आणि ताशी १ लाख कि.मी. या वेगाने ही पृथ्वीला टक्करली असावी. दुसरा सिद्धांत असा की, ही नुसती उल्का नसून धूमकेतू होता. तिसरा सिद्धांत असा की, तो प्रत्यक्ष धूमकेतू नसून धूमकेतच्या शेपटातून विलग झालेला एक अजस्त्र पाषाणखंड होता. चौथा सिद्धांत असा की, पृथ्वीवर लक्षावधी वर्षांपासून वेळोवेळी असा उल्कापाषाणाचा मारा होत आलेला आहे. त्यामुळेच जी जीवसृष्टी नष्ट होऊन, नवी जीवसृष्टी निर्माण होत आलेली आहे. डायनासोर, हत्तीसारखे दिसणारे पण आणखी विशाल असे ‘मम्मथ’ नावाचे प्राणी इत्यादी जीव अशाच अंतराळातील वस्तूंच्या माऱ्याने नष्ट झाले असावेत.

 

पाचवा सनसनाटी सिद्धांत असा की, तो अग्निगोल म्हणजे अंतराळातील कुठच्या तरी परग्रहावरील अतिप्रगत मानवजातीचं अवकाशयान असलं पाहिजे. काहीतरी अपघात होऊन ते पृथ्वीवर कोसळलं. या सिद्धांताचा मुख्य पुरावा म्हणजे स्फोटाच्या जागी जमिनीला खड्डा पडलेला नाही. १ ते १० लाख टन वजनाचा उल्कापाषाण ताशी १ लाख कि. मी. वेगाने पृथ्वीवर आदळला, तर त्या ठिकाणी भलामोठा खड्डा पडायलाच हवा. त्या खड्ड्यात त्या उल्कापाषाणाचे हजारो-लाखो तुकडे सापडायला हवेत. जगात अन्यत्र उल्कापातामुळे असंच घडलेलं आहे. खुद्द रशियातच सिखोट-एलिन या ठिकाणी उल्कापातामुळे असंच घडलेलं आहे. खुद्द रशियातच सिखोट-एलिन या ठिकाणी उल्कापातामुळे जवळपास शंभर छोटे-मोठे खड्डे बनले आहेत. पोलंडमध्ये तर उल्कापाताने ख़ड्डे पडून त्याचे तलावच बनले आहेत. भारतातही लोणार सरोवर उल्कापाताने निर्माण झालेले आहे, पण तुंगुस्कामध्ये असा खड्डा नाही. तिथे फक्त दलदलयुक्त जमिनीचा एक पट्टा आहे. उल्कापात सोडा, एखादा साधा बॉम्बस्फोट झाला तरी तिथे खड्डा पडतो. मग सुमारे १० ते १५ मेगाटन एवढ्या क्षमतेचा स्फोट जिथे झाला, तिथे खड्डा कसा नाही? म्हणजेच हा अग्निगोल हा उल्कापाषाण नसून अवकाशयान उर्फ उडती तबकडी असावी. काहीतरी अपघाताने ती पृथ्वीवर कोसळली आणि तिची वाफ होऊन गेली. स्फोटानंतर गरम वायूचे लोट उसळले होते, हा मुद्दा धरून ही उपपत्ती आहे आणि त्या वायुमुळेच ती जमीन दलदलीची, नापीक, उजाड बनून गेली आहे.

 

हा पाचवा सिद्धांत अर्थातच अत्यंत वादग्रस्त बनून राहिलेला आहे. कारण, ती मान्य केल्यास अंतराळातील अन्य ग्रहांवर जीवसृष्टी असणं, ती प्रगत असणं, त्यांच्याकडे अवकाशयान असणं वगैरे सगळंच मान्य करावं लागतं आणि आपल्या तर्कबुद्धीच्या पलीकडे काही अस्तित्वात असू शकतं, हे स्वतःला वैज्ञानिक म्हणविणाऱ्या लोकांना फारसं पटत नाही. उडत्या तबकड्या किंवा त्यांच्यासारख्या वस्तू आकाशात दिसण्याच्या बहुसंख्य घटना शीतयुद्धाच्या काळात घडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत हल्ली अशी मांडणी करण्यात येते की, अमेरिकेची सी.आय.ए. नि सोव्हिएत रशियाची के.जी.बी. या दोन्ही गुप्तहेर संघटना एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नाना प्रकारचे शास्त्रीय प्रयोग करीत असत. उडत्या तबकड्या किंवा बघणारे लोक ज्यांना उडत्या तबकड्या समजले, त्या वस्तू म्हणजे सीआयएने प्रयोगादाखल उरलेली विशिष्ट तर्‍हेची विमानंच होती. आता हे प्रयोग संपल्यामुळे आणि मुख्य म्हणजे शीतयुद्धच समुद्रात आल्यामुळे उडत्या तबकड्या दिसण्याच्या घटना घडत नाहीत, वगैरे. त्याचप्रमाणे परग्रहावरच्या मानवाचं यान, उडती तबकडी वगैरे म्हटलं की लगेच सगळ्या घटनेला एक गूढतेचं, अद्भुततेचं वलय येतं. जाणकार मंडळींना तेही आवडत नाही. आता १९०८ साली के.जी.बी., सी.आय.ए. त्यांचे शास्त्रीय प्रयोग यापैकी काहीही अस्तित्वातच नव्हते. अंतराळ संशोधन तर सोडाच, विमानोड्डाण शास्त्रदेखील रांगत्या अवस्थेत होतं. त्यामुळे उडत्या तबकडीचा सिद्धांत खोडून तर काढता येत नाही.

 

पण, पाश्चिमात्यांचं हे वैशिष्ट्य आहे की, ते सतत शोध घेत असतात. इटलीच्या बोलोग्ना विद्यापीठातील संशोधक जेसप लोंगो गेली दहा वर्षे तुंगुस्का स्फोटाचं विशेष संशोधन करीत आहे. त्याला असं आढळलं आहे की, प्रत्यक्ष स्फोटाचं म्हणून ते ठिकाण समजलं जातं, तिथून सुमारे १० कि.मी. अंतरावर असलेलं चेको नावाचं सरोवर हाच स्फोटामुळे बनलेला खड्डा (शास्त्रीय परिभाषेत कॅटर) आहे. लागो आणि त्याच्या शोधगटाने चेको सरोवरातील पाणी, चिखल, दगड, वनस्पती इत्यादींचे असंख्य नमुने गोळा केले आहेत. प्राथमिक निरीक्षणानुसार या सर्व नमुन्यांत त्यांना उल्का अगर उल्काजन्य पदार्थ आढळले आहेत. त्यावरून त्यांना असं वाटतं आहे की, चेको सरोवराच्या तळाशी किमान ३० फूट व्यासाचा व १७०० टन वजनाचा त्या उल्कापाषाणाचा तुकडा असला पाहिजे. आता पुन्हा तोच प्रश्न येतो की, मूल उल्कापाषाण जर १ ते १० लाख टन वजनाचा होता, तर तो कुठे गेला? त्याचा सुमारे १७०० टन वजनाचा एक तुकडा बाजूला झाला आणि त्याने जो खड्डा बनवला त्यातून एक सरोवर बनलं. मग मूळ उल्कापाषाण ख़ड्डा न पडता वाफ बनून गेला, असं का व्हावं? जेसप लोंगोच्या पुढील संशोधनातून याची उत्तरं कदाचित मिळतीलही, पण लक्षात ठेवायचे ते हे की, इटली म्हणजे स्पॅगेटीवर आडवा हात मारून दुपारच्या सिएस्ता (डुलक्या) काढणाऱ्या नि उरलेल्या वेळात क्वात्रोचीगिरी करणाऱ्या लोकांचाच देश आहे, असं नव्हे. तिथेही जेसप लोंगोसारखे ज्ञानाची साधना करणारे लोक आहेत.


@@AUTHORINFO_V1@@