ते पंधरा दिवस : २ ऑगस्ट, १९४७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018   
Total Views |
 
 
 
 
 
‘१७, यॉर्क रोड’ हे घर आता फक्त दिल्ली वासियांसाठीच नाही तर अवघ्या देशासाठी महत्वाचं झालेलं होतं. गेल्या काही वर्षांपासून ते पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निवासस्थान होतं. भारताच्या मनोनीत पंतप्रधानांचं निवासस्थान. आणि यातील ‘मनोनीत’ हा शब्द गळून पडायला फक्त तेरा दिवस शिल्लक होते. १५ ऑगस्ट पासून जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून कामकाज बघायला सुरुवात करणार होते.
 
 
१७, यॉर्क रोड वर अधिकाऱ्यांची आणि नागरिकांची वर्दळ वाढायला सुरुवात झालेली होती. यॉर्क रोड हा तसा महत्वाचा रस्ता. बंगाल मधील अशांतते मुळे जेव्हा इंग्रजांनी कलकत्त्याहून दिल्लीला राजधानी हलविण्याचा निर्णय घेतला, तेव्हा, १९११ मध्ये, एडविन लुटीयन्स या ब्रिटीश आर्किटेक्टला दिल्लीची रचना करण्याचं काम दिलं गेलं. लुटीयन्सने आपलं काम सुरु केलं ते याच ‘यॉर्क रोड’ पासून. आणि सन १९१२ मधे नेहरू राहत असलेला १७, यॉर्क रोड हा बंगला बांधला गेला.
 
 
या बंगल्यामधे नेहरूंची शनिवार, २ ऑगस्टची सकाळ उजाडली ती धावपळीची. ब्रिटिशांकडून होणाऱ्या हस्तांतरणाला फक्त तेरा दिवस शिल्लक होते. त्या कार्यक्रमाची तयारी हा विषय तर होताच, पण इतरही अनेक विषय नेहरूंच्या अंगावर अक्षरशः धबधब्यासारखे कोसळत होते. राष्ट्रगीतापासून ते मंत्रिमंडळाच्या निवडीपर्यंत कामाची भलीमोठी यादी होती. या सर्वांमधे १५ ऑगस्ट चा पोशाख नेमका कसा असला पाहिजे ही लहानशी चिंतासुध्दा नेहरूंना पोखरत होतीच..!
 
 
 
 
कॉंग्रेसचे काही नेते आणि प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी १७, यॉर्क रोड वर येऊन बसले होते. त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांसंबंधी चर्चा करायची होती. त्यामुळे नेहरूंनी घाईघाईतच त्यांचा ‘ब्रेकफास्ट’ उरकला अन ते आजच्या व्यस्त दिवसाला सामोरे जायची तयारी करू लागले.
 
 
इकडे संस्थानिकांना स्वातंत्र्य दिनापूर्वी भारतात शामिल करून घ्यायच्या घटनांना वेग आला होता. सरदार वल्लभभाई पटेल जातीनं एका, एका संस्थानावर लक्ष ठेऊन होते. त्यांनी व्ही. के. मेनन या अतिशय कुशल प्रशासकाला हे काम करण्यासाठी आपल्या विभागात घेतले होते.
 
 
सरदार पटेलांच्या सांगण्यावरून २ ऑगस्टला सकाळी व्ही. के. मेनन यांनी एक पत्र इंग्लंडमध्ये भारताविषयीच्या विभागाच्या डेप्युटी सेक्रेटरी सर पेट्रिक यांना लिहिलं. या पत्रात त्यांनी कळविलं की “भारतातली जी आकाराने आणि आर्थिकदृष्ट्या मोठी संस्थानं आहेत, अशी मैसूर, बडोदा, ग्वाल्हेर, बिकानेर, जयपूर आणि जोधपुर ही भारतात शामिल व्हायला तयार आहेत. मात्र हैदराबाद, भोपाळ, इंदूर या संस्थानांचा निर्णय होत नाहीये...”
 
 
या संस्थानांचा तसा निर्णय झालेला होता. भोपाळ, हैदराबाद आणि जूनागढ या संस्थानांना भारतात राहायची मुळीच इच्छा नव्हती. याच संदर्भात २ ऑगस्टलाच भोपाळ च्या नवाबाने जिन्ना यांना एक पत्र लिहिले. जिन्ना आणि हा नवाब हमिदुल्ला हे दोघे खूप छान मित्र. अशा या आपल्या मित्राला पत्रात नवाब हमिदुल्ला लिहितो, “८० टक्के हिंदू लोकसंख्या असलेलं माझं भोपाळ संस्थान, या हिंदू भारतात अगदी एकाकी पडलेलं आहे. त्यातून माझं संस्थान हे माझ्या आणि इस्लामच्या शत्रूंनी वेढलेलं आहे. पाकिस्तान आम्हाला मदत करू शकत नाही, हे काल रात्री तुम्ही स्पष्ट केलेलं आहे.” (Bhopal stands alone with an 80% Hindu majority in the midst of Hindu India, surrounded by my personal enemies as well as by the enemies of Islam. Pakistan has no means of helping us. You rightly made this point to me last night).
 
 
१, क्वीन व्हिक्टोरिया रोड या दिल्लीच्या निवासस्थानी राहत असलेल्या डॉ. राजेंद्र प्रसाद यांचीही व्यस्तता वाढली होती. भविष्य काळातील राष्ट्रपती होण्यास त्यांना बराच अवधी होता. मात्र वर्तमान नेतृत्वात एक पितृ पुरुष (फादर फिगर) म्हणून सर्व त्यांच्याकडे बघत होते. अर्थातच स्थित्यंतराच्या या नाजूक आणि अतिशय कठीण प्रसंगी त्यांच्याकडे सल्ला मसलतींसाठी येणाऱ्या किंवा एखाद्या विषयाची माहिती देणाऱ्या / घेणाऱ्या लोकांचा ओघही वाढला होता.
 
 
डॉ. राजेंद्र प्रसाद हे मूळचे बिहारचे. त्यामुळे बिहारची अनेक मंडळी वेगवेगळे मुद्दे घेऊन, वेगवेगळे प्रश्न घेऊन त्यांच्याकडे येत होती. असेच एक पत्र ते संरक्षण मंत्री, सरदार बलदेव सिंह यांना २ ऑगस्टच्या दुपारी लिहित होते. १५ ऑगस्टचा सोहळा साजरा करण्याविषयीचं ते पत्र होतं. ‘पटना शहरात, नागरिक आणि प्रशासनासोबत मिलिटरीने ही या सोहळ्यात शामिल व्हावं, म्हणजे त्या कार्यक्रमाला भव्यता येईल’, हे सांगणारं ते पत्र होतं.
 
 
सरदार बलदेव सिंह हे अकाली दलाकडून मंत्रिमंडळात सामिल झालेले मंत्री. डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा आदर करणारे. त्यामुळे राजेंद्र बाबुंच्या पत्रावर ते योग्य ती कारवाई करतील, हे निश्चित होतं.
 
 
२ ऑगस्टच्या सकाळपासून संयुक्त प्रांतात (आजच्या उत्तर प्रदेशात), एक वेगळंच नाट्य रंगत होतं. येथील हिंदु महासभेच्या नेत्यांना सरकारने आधल्या दिवशी रात्रीच अटकेत टाकलं होतं. आणि आरोप काय ठेवला होता, तर ‘ही महासभेचे नेते मंडळी सरकार विरुद्ध ‘डायरेक्ट अॅक्शन’ला सुरुवात करणार आहेत’. ‘डायरेक्ट अॅक्शन’ हा शब्द हिंदुस्थानी राजकारणात बदनाम झालेला होता. अवघ्या एका वर्षापूर्वीच बंगालमध्ये मुस्लिम लीगच्या गुंडांनी पाच हजारावर हिंदूंना कापून काढले होते आणि हजारो स्त्रियांची विटंबना केली होती. कॉंग्रेस कार्यकारिणीने नंतर जी फाळणी स्वीकारली, त्याला कुठे तरी या ‘डायरेक्ट अॅक्शन’ शब्दाची पाशवी किनार होती. त्यामुळे ‘डायरेक्ट अॅक्शन’ च्या नावाखाली हिंदू नेत्यांना उचलून कैदेत टाकणं, हे थोडं विचित्र वाटत होतं. कारण ‘डायरेक्ट अॅक्शन’ हा शब्दप्रयोग मुस्लिम लीगशी जोडला गेलेला होता.
 
 
या बातमीची दखल अगदी सिंगापुरहून प्रकाशित होणाऱ्या ‘इंडियन डेली मेल’ या दैनिकानेही घेतली. शनिवार, २ ऑगस्टच्या अंकात अगदी पहिल्या पानावर त्यांनी ही बातमी छापली. शिवाय ‘हिंदु महासभेच्या’ दहा मागण्या सुद्धा छापल्या. या बातमीमुळे हिंदु महासभेच्या समर्थकांमध्ये बेचैनी निर्माण झाली.
 
 
तिकडे दूर, इस्टर्न फ्रंटच्या ‘कोहिमा’हून शनिवारी, २ ऑगस्टला एक बातमी येऊन धडकली, जी भारतीय संघ राज्यासाठी चांगली नव्हती. ‘इंडिपेंडेंट लीग ऑफ कोहिमा’ने अशी घोषणा केली की ‘१५ ऑगस्टला ते भारतीय संघ राज्यात सामिल होणार नाहीत. ते एक अपक्ष नागा सरकार गठित करतील, ज्यात नागा जनजाती राहत असलेला संपूर्ण प्रदेश येईल’.
 
 
१५ ऑगस्टला साकार होऊ पाहणाऱ्या भारतीय संघ राज्यासमोर आव्हानांचे डोंगर उभे राहत होते.
 
 
या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि परदेशात भारतीय चित्रपट लोकांचं मनोरंजन करतच होते. सिंगापुरच्या डायमंड थिएटरमध्ये अशोक कुमार आणि वीरा चा ‘आठ दिन’ हा सिनेमा गर्दी खेचत होता. या चित्रपटाची कथा उर्दूचे प्रसिद्ध कथाकार सआदत हसन मंटो यांनी लिहिली होती आणि संगीतकार एस. डी. बर्मन यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता..!
सरदार पटेलांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी (आजचे १, औरंगजेब रोड) सुद्धा हालचालींना वेग आला होता. संस्थानांचं विलीनीकरण आणि त्याच बरोबर सिंध, बलोचीस्तान आणि बंगाल मध्ये भडकलेले दंगे या मुद्द्यांवर गृह मंत्रालयाचा कस लागत होता.
 
 
तशातच दुपारी सरदारांना पंडित नेहरूंनी लिहिलेले पत्र मिळाले. पत्र लहानसेच होते. त्यात लिहिले होते –

“काही प्रमाणात औपचारिकता निभावण्यासाठी हा पत्राचा प्रपंच. मी तुम्हाला माझ्या मंत्रिमंडळात सामिल होण्यासाठी निमंत्रण पाठवत आहे. तसा या पत्राचा काही विशेष अर्थ नाही. कारण आपण माझ्या मंत्रिमंडळाचे सुदृढ स्तंभ आहात.”
 
 
पटेलांनी ते पत्र घेतलं. थोडा वेळ त्याच्याकडे बघितलं. किंचित स्मित केलं. अन आपल्या सचिवांसोबत ते, भारत – पाकिस्तानच्या, अजून जाहीर न झालेल्या, सीमेवर भडकलेल्या दंग्यांबाबत चर्चा करू लागले.
 
 
या सर्व वातावरणापेक्षा अगदी दूर, महाराष्ट्रात, देवाच्या आळंदीला, कॉंग्रेसमधला एक डाव्या विचारांचा गट जमला होता. आज आणि उद्या या गटाचं संमेलन घ्यावं असं त्यांनी दोन महिन्यांपूर्वी ठरवलं होतं. शंकरराव मोरे आणि भाऊसाहेब राऊतांच्या आवाहनावरून ही सारी मंडळी जमली होती. भारत स्वतंत्र होतोय अन् कॉंग्रेसच्या हातात स्वतंत्र भारताच्या सत्तेची चावी येतेय, हे त्यांना दिसत होतं. मात्र या सर्व प्रक्रियेत आपल्या डाव्या, साम्यवादी विचारांचं काय..? असा त्यांना प्रश्न पडला होता. त्यासाठीचं विचारमंथन करण्यासाठी ही मंडळी जमली होती. यांच्यात तुळशीदास जाधव, कृष्णराव धुळूप, ज्ञानोबा जाधव, जी. डी. लागू, दत्ता देशमुख, र. के. खाडिलकर, केशवराव जेधे सारखी नामवंत आणि भारदस्त मंडळी जमली होती. यात कॉंग्रेस पक्षांतर्गत शेतकरी – कामकरी लोकांसाठी वेगळा कार्यकर्त्यांचा संघ स्थापन करण्याची योजना ठरत होती.
 
 
हीच बैठक कालांतराने महाराष्ट्रातील एका मोठ्या डाव्या विचारसरणीच्या शेतकरी – कामकरी लोकांच्या पक्षाला जन्म देईल असं तेव्हा तरी कोणाला वाटलं नव्हतं . . .
 
 
दोन ऑगस्टच्या या बैठकीत, या नामवंत मंडळींनी, भारत विभाजनाच्या आणि अमानुष दंगलींसंबंधी एक चकार शब्द सुद्धा काढला नाही..!
 
 
तिकडे मद्रासच्या एग्मोर भागात, सायंकाळी भरलेल्या एका सभेत, मद्रास प्रेसिडेन्सीचे अन्न, औषधी आणि आरोग्य मंत्री टी. एस. एस. राजन हे एंग्लो-इंडियन समुदायाशी संवाद साधत होते. इंग्रज गेल्यानंतर या समाजाचं कसं होणार हा प्रश्न त्यापैकी अनेकांच्या मनात होता. त्यालाच उत्तर देताना मंत्री महोदय म्हणाले की “तुमचा हा लहान समुदाय (कम्युनिटी) फार चांगल्या पद्धतीने, समाजात मिळून मिसळून राहिलेला आहे. आता पुढे स्वातंत्र्यानंतरही या समुदायाला एका जवाबदार नागरिकाची भूमिका वठवायची आहे.”
 
 
दूर पुण्यात, एस. पी. कॉलेजात, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ एक जाहीर सभा आयोजित केली होती. देशाच्या वर्तमान परिस्थितीवर, देशाच्या स्वातंत्र्यावर, होणाऱ्या फाळणीवर या सभेत, स्वतः तात्याराव सावरकर बोलणार होते.
 
 
सभेला प्रचंड गर्दी जमली होती. खऱ्या अर्थानं ही विशाल सभा होती. आपल्या घणाघाती भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले, “आपण सर्व हिन्दू आहोत. मग स्वतः ला ‘हिन्दू’ म्हणवून घेण्यात लाज कसली वाटते आहे..? आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यासाठी प्रामुख्यानं कॉंग्रेसच जबाबदार असली तरी सामान्य जनताही जबाबदार आहे. त्यांनी वेळोवेळी कॉंग्रेसला समर्थन दिलं, त्याचीच ही परिणीती आहे. वारंवार एका विशिष्ट वर्गाचं तुष्टीकरण केल्याने हा वर्ग, या देशाचे विभाजन करण्यात सफल झाला.
 
 
तिकडे श्रीनगरमध्ये गांधीजींच्या पहिल्यावहिल्या काश्मीर भेटीचा दुसरा दिवस आज मावळायला आला होता. आजचा दिवस तसा फार महत्वपूर्ण घटनांनी भरलेला नव्हताच. सकाळीच प्रार्थनेनंतर, गांधीजींचा मुक्काम असलेल्या किशोरीलाल सेठी यांच्या घरी बेगम अकबर जहान, आपल्या मुलीला घेऊन आल्या. या भेटीतही त्यांनी ‘आपला नवरा’ (शेख अब्दुल्ला) हा तुरुंगातून सुटणं कसं आवश्यक आहे’ हे गांधीजींना वारंवार आळवून सांगितलं. आजही गांधीजीं भोवती नेशनल कॉन्फरन्सच्याच मुस्लिम नेत्यांचा गराडा होता. मात्र आज गांधीजी अनेकांना भेटले, त्यात बरेच हिंदू नेते ही होते.
 
 
रामचंद्र काक यांनी दिलेल्या निमंत्रणाप्रमाणे उद्या, दिनांक ३ ऑगस्टला गांधीजी महाराजा हरीसिंह यांना भेटायला जाणार होते....!
 
 
दिवसभरात लाहोर, पिंडी, पेशावर, चीतगाव, ढाका, अमृतसर या ठिकाणी हिंदू – मुस्लिम चकमकी झाल्या होत्या. मात्र रात्रीचा काळोख या संपूर्ण प्रदेशाला गिळू लागल्याबरोबर, क्षितिजावर आगीच्या मोठमोठ्या पेटलेल्या ज्वाळा दिसू लागल्या.
 
 
दोन ऑगस्टची ही रात्र अशांतच असणार होती...!
 
 
प्रशांत पोळ
‘मैत्र’, ११२६, समाधान हॉस्पिटल च्या बाजूला,
राईट टाऊन,
जबलपुर – ४८२ ००२
भ्रमणध्वनी : ०९४२५१ ५५५५१ ई-मेल : [email protected]

 
मागील लेख तुमच्या वाचनातून राहिला असेल तर त्याची लिंक खालीलप्रमाणे : १ ऑगस्ट १९४७ 
 
 
@@AUTHORINFO_V1@@