३०३ उमेदवारांचे भवितव्य मशिनबंद!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018
Total Views |

जळगाव मनपासाठी रात्री उशिरापर्यंत मतदान, १९ प्रभागातील ७५ जागांसाठी मतदारांनी बजावला हक्क

जळगाव 
जळगाव महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०१८ साठी बुधवारी (१ ऑगस्ट) मतदान प्रक्रिया पार पडली. १९ प्रभागातील ७५ जागांसाठी मतदारांनी आपला हक्क बजावला. रिंगणात ३०३ उमेदवार आहेत. मतदानाची वेळ संपत असताना अगदी शेवटच्या दीड तासात असंख्य मतदारांनी मतदानासाठी अचानक गर्दी केल्याने प्रशासनाला रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू ठेवावे लागले.
 
 
शहरातील ४६९ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदानासाठी प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक सरसावले तर वय वर्षे पन्नाशीच्या आतील काही सुशिक्षित वर्गात अनुत्साह दिसून आला. दुपारी दीड वाजेपर्यंत केवळ २२.२४ मतदान झाले. ही आकडेवारी पाहून सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले. मतदानाची टक्केवारी एवढी कमी राहील, याचा अंदाज त्यांनी बांधलेला नव्हता. मग मतदारांना मतदानासाठी ‘प्रोत्साहित’ करण्याची कसरत सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली. त्यानंतर दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र सर्वच मतदान केंद्रात दिसत होते. हातावर पोट असणारे, तसेच चारचाकी वाहनातून फिरणारेही यात होते. दुपारी ३.३० वाजेपर्यंत अवघे ३४ टक्के मतदान झाले होते.
 
५५ ते ६०% मतदानाचा अंदाज
निवडणुकीत अंदाजे ५५ ते ६०% दरम्यान मतदान झाल्याची प्राथमिक माहिती उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी दिली आहे. निवडणुकीत एकूण ३ लाख ६५ हजार ७२ मतदार होते.
 
 
मतदारांमधील अनुत्साह चिंताजनक भ्रमनिरास, अपेक्षाभंग हेही एक कारण?
जळगाव :
निवडणुका जेवढ्या स्थानिक पातळीवर असतात, तेवढी चुरस जास्त असते. शिवाय उमेदवार परिचित, त्यांच्याकडून मिळणारी प्रलोभनं, आश्‍वासन आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यास प्रवृत्त करण्याचे प्रमाण जास्त असते. हा नेहमीचा अनुभव पाहाता यावेळी वरवर पाहता शिवसेना व भाजप यांच्यात जोरदार चुरस असूनही मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी राहिला. याचे कारण सुशिक्षित मध्यमवर्गीय, प्रतिष्ठित, सुखवस्तू मतदार काहीसा उदासिन राहिला, सायंकाळी चारपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी म्हणजे ३४ ते ३५-३६ टक्के राहिली.
 
 
नागरी सुविधांचा अभाव आणि भविष्यातही त्या मिळतील, याबाबतची साशंकता आणि तेच तेच चेहरे, त्यातही अनेक जण स्वार्थासाठी तडजोड करणारे आणि होणारा अपेक्षाभंगाचा हा परिणाम असावा, असे मत रोटरी क्लब जळगाव वेस्टचे पदाधिकारी आणि मतदार जागृती अभियानातील अग्रणी गनी मेमन यांनी तरुण भारतने साधलेल्या संवादात सांगितले. त्यांच्यासह विविध क्षेत्रातील सुमारे ४० सामाजिक कार्यकर्ते प्रशासनाने आज मानसेवीरित्या नियुक्त केले होते. त्यातील २-३ जणांचे गट सर्वच मतदान केंद्रावर जात-येत निरीक्षण नोंदवित सहकार्यही करीत होते. दुपारी चारनंतर बहुसंख्य केंद्रावर लक्ष्मीदर्शनप्राप्त मतदारांची गर्दी उसळली, असे निरीक्षणही नोंदवल्याचे गनी मेमन यांनी नमूद केले. एकूणच चित्र भारतीय लोकशाही व राजकारण्यांवरील विश्‍वास उडवणारे, चिंता-वेदना निर्माण करणारे असल्याची व्यथाही या सहभागी कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@