ममता वाढू लागली...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018
Total Views |


 

भाजपविरोधी सगळ्यांबरोबर ममत्व वाढविण्याचे ममतांचे उद्योग एका भाबड्या समजुतीतून आहेत. लोकसभेनंतर लगेचच बंगालची विधानसभा निवडणूक असेल, पण विरोधकांचा हा अमिबा निवडणूक रंजक करेल, यात शंका नाही.
 

ममता बॅनर्जी नावाचे सनसनाटी व्यक्तिमत्व सध्या राजधानी दिल्लीभोवती घिरट्या घालू लागले आहे. अशा घिरट्या त्यांनी मुंबईतही घातल्या होत्या आणि सत्तेत राहून विरोधात असल्यासारख्या वागणाऱ्या पितापुत्रांनी जाऊन त्यांची भेटही घेतली होती. दिल्लीत फरक एवढाच की, दिल्लीतल्या माय-लेकराला भेटायला जायला ममता बॅनर्जींना त्यांच्या घरी जावे लागले. इथले लाचार दुडुदुडु धावत ममता ज्या हॉटेलमध्ये राहात होत्या, तिथे जाऊन पोहोचले होते. पितापुत्रांचे मग अदबीने कुर्निसात करतानाचे फोटोही प्रसिद्ध झाले होते. तशा ममता बॅनर्जी कर्तृत्ववानच. पश्चिम बंगालमधून डाव्यांचा कणा ढिला करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा. सत्तेचा कुठलाही कौटुंबिक वारसा लाभलेला नसताना अत्यंत कडवटपणे संघर्ष करीत त्यांनी आधी काँग्रेसमधून फारकत घेतली आणि स्वत:चा पक्ष काढत डाव्यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. या कर्तृत्वामुळेच की काय, सध्या वारसा हक्काने मिळालेल्या राजकीय पक्षांचे सर्वच प्रमुख ममतांच्या अवतीभवती गोळा व्हायला लागले आहेत. बापजाद्यांच्या कर्तृत्वाने मिळालेला पक्ष आणि त्यामुळे ‘सत्ता आमचीच असली पाहिजे,’ असे दिवास्वप्न घेऊन जगणारी ही सगळी मंडळी आहेत.

 

डाव्यांशी संघर्ष करून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या खऱ्या , पण आपण मुख्यमंत्रिपदावर कायम राहावे म्हणून त्यांनी सुरू केलेले दाढ्या कुरवाळण्याचे राजकारण काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाशी स्पर्धा करण्याचेच राहिले. कोलकात्यामधील दुर्गापूजेचा विषय असो किंवा मालदा, इलमबजार, हाजीनगर, घुलगड, जालंगी, मिदनपूर, बुर्दवान इथल्या दंगली; ममतांचे वर्तन पूर्णपणे हिंदूविरोधीच राहिले. अगदी परवाच्या एनआरसी यादीच्या विरोधात प्रथम प्रतिक्रिया देणाऱ्या ममता बॅनर्जीच होत्या. यातला ताजा कलम असा की, आसामची यादी अद्याप नक्की झालेली नसली तरी त्यावर कांगावा करणार्यांच्या टोळ्यांनी रान उठविले आहे. खुद्द आसाम सरकारने पुन्हा कागदपत्र सादर करण्यासाठी जवळपास महिन्याभराचा कालावधी दिलेला असताना या कावळ्यांची कावकाव मात्र सुरूच आहे. ममतांच्या आदेशानुसार तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन आपल्या शिष्टमंडळासह सिलचर विमानतळावर जाऊन पोहोचलेसुद्धा. यांचा आमदार, खासदारांचा जत्था जिथे रोखला गेला. तिथेच ठाण मांडून या मंडळींनी जो काही कांगावा केला त्याला तोड नाही. ममता बॅनर्जींनी याला ‘सुपर एमरजन्सी’ म्हटले आहे. कालपरवा त्या दिल्लीत जिथे पोहोचल्या होत्या, त्या गांधी घराण्यातल्या इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती, हे बहुदा ममता बॅनर्जी विसरल्या असाव्या. ममतांचा दुटप्पीपणा असा की, त्यांचे आमदार-खासदार बोंबलत आसामला पोहोचू शकतात. मात्र, कोलकात्यामध्ये अमित शाह यांनी रॅली करायचे म्हटले की, ममता बॅनर्जी थयथयाट करायला सुरुवात करणार.

 

डावे सोडून जे काही राजकीय असंतुष्ट आज या देशात आहेत, त्या सगळ्यांनाच भेटायचा सिलसिला ममता बॅनर्जींनी लावला आहे. भाजपमधल्या बिनकामाच्या मंडळींनाही त्या भेटल्या आहेत. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, पोपटपंची खासदार शत्रुघ्न सिन्हा. नक्की कुणाच्या सोबत आणि विरोधात आहेत हे न समजणारे राम जेठमलानी अशी मंडळी ममतांच्या मैत्रबनात सध्या बागडत आहेत. ममतांच्या भाजपविरोधी रॅलीत या सगळ्यांनी सामील व्हावे म्हणून त्या सध्या सगळे उंबरे झिजवत आहेत. काँग्रेसने संघ व भाजप सोडून कुणालाही पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याचे मान्य केले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीची पुण्याई गाठीशी असलेल्या या पक्षाचे प्रमुखपद एका नासमज माणसाच्या हाती सोपविल्यानंतर पक्षाचे यापेक्षा वेगळे काही होऊ शकत नाहीच. कर्नाटकातही राहुल गांधी ते करून मोकळे झाले. त्यामुळे अनेकांच्या महत्त्वाकांक्षा उंचावल्या आहेत. “आपल्याला पंतप्रधानपदाच्या आशा नाहीत, आधी आम्ही भाजपला संपवू मग काय तो निर्णय घेऊ,” असे ममता म्हणतात. गंमत म्हणजे, तिकडे कर्नाटकात देवेगौडाही असेच म्हणतात. महाराष्ट्रात शरद पवारही असेच म्हणतात आणि मुलायमसिंगांचा सूरही हाच आहे. ही सगळी मंडळी ही अशी निःस्वार्थ आहेत. खरंतर या सगळ्यांकडे कोणताच अजेंडा नाही. केवळ मोदीद्वेषाच्या आधारावर आकारास आलेला हा अमिबा २०१९ पर्यंत वाढतच जाणार आहे. शिवसेनेसारखे संधीसाधू लोक यात दोन्हीकडे असतील. सारथ्य कोणाच्या हाती द्यायचे याचा निकाल न लागता जी गाडी चालविण्याचा प्रयत्न ही सर्वच मंडळी करीत आहेत, ती खड्ड्यात जाणार हे समजायला भारतीय जनता मूर्ख नाही. कधीच आकारास न आलेल्या तिसर्या आघाडीचेच दुसरे स्वरूप उभे करण्याचा प्रयत्न ममता करीत आहेत. आता मुद्दा असा की, डावे या सगळ्या नाटकाला कसा प्रतिसाद देणार? कारण, डाव्यांचे बंगालमधले वतन खालसा करण्याचे काम ममतांनीच केले आहे. २०१४ च्या विजयानंतर नंतर मोदी-शाह द्वयीने एकामागोमाग एक अशी राज्ये पादाक्रांत केली. त्यामुळे या सगळ्याच मंडळींसमोर आता अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे आपले अही-नकुलाचे वैर विसरून डावेही ममतांच्या जोडीने या अमिबात सहभागी झाले तर त्यात नवल वाटायचे कारण नाही. अमित शाहंची बंगालमध्ये होणारी रॅली, त्यापूर्वी ममतांनी केलेले दाढ्या कुरवाळण्याचे उद्योग या दोन्हींचे होऊ शकणारे संभाव्य परिणाम यामुळे ममता हादरल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकींनतर लगेचच बंगालच्या निवडणुका लागतील. लोकसभा निवडणुकीत आपण मोदींना रोखू शकलो तर नंतर येणार्या निवडणुकीत आपण बंगाल राखू शकू, अशी त्यांची भाबडी आशा आहे. त्यातून भाजपविरोधी सगळ्यांसोबतचे ममत्व वाढविण्याचे उद्योग ममता करीत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@