व्यसनमुक्तीच्या वाटेवर चालताना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2018
Total Views |





 

 

 

व्यसनमुक्तीमुळे जणू काही माझा नव्याने जन्मच झाला आहे, असे मला वाटते. त्यामुळे आता मला मिळालेला हा पुनर्जन्म वाया जाऊ न देता, अनेक वाट चुकलेल्या व्यसनाधीनांना मी केवळ योग्य वाट दाखवण्याचे काम करतो आहे.

 

समाजात आजकाल अनेक तरुण-तरुणी व्यसनांच्या विळख्यात सापडलेले दिसतात. व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होतात. पण अशा व्यसनाधीनांना मदतीचा हात देऊन त्यांना व्यसनमुक्त करण्याचे थोर कार्य रमेश सांगळे यांनी हाती घेतले आहे. आज त्यांच्या मदतीने सुमारे १०० ते १२५ लोक व्यसनमुक्त होऊन आपल्या कुटुंबात सुखाने आयुष्य जगत आहेत. ‘मिरॅकल फाऊंडेशन’च्या अंतर्गत त्यांचे हे समाजकार्य सुरू आहे. व्यसनमुक्तीबद्दल रमेश सांगतात की, “ते स्वत: आधी व्यसनाधीन होते. ते इतके व्यसनाधीन झाले होते की एकेकाळी समाजाने त्यांना झिडकारले होते. दारुच्या ते इतके आहारी गेले होते, एकदा तर त्यांच्या पत्नीने दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्यांनी पत्नीला जाळण्याचा प्रयत्नही केला होता.” पुढे त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात आले. २४ मार्च १९९२ साली रमेश पूर्णत: व्यसनमुक्त झाले. ते स्वत: व्यसनमुक्त तर झालेच पण त्याचसोबत त्यांनी संपूर्ण समाजाला व्यसनमुक्त करण्याचा विडा उचलला. एक व्यसनाधीनच आधी स्वत: व्यसनमुक्त होऊन समाजात व्यसनमुक्तीचा चांगला बदल घडवून आणू शकतो, हे त्यांनी आज दाखवून दिले आहे. या सामाजिक कार्यासाठी २०१३ साली महाराष्ट्र शासनाने रमेश सांगळे यांना ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान केला.
 
 
रमेश सांगतात, “माझ्या दारूच्या व्यसनामुळे माझ्या कुटुंबालाही खूप त्रास भोगावा लागला. माझे नातेवाईक व मित्र माझ्यापासून दूर पळायचे. माझ्या बाबतीत जे काही झाले ते इतरांच्या बाबतीत होऊ नये म्हणून मी हे व्यसनमुक्तीचे कार्य हाती घेतले आहे”. या कार्याची सुरुवात त्यांनी आपल्या कंपनीतील सहकार्‍यांपासून केली. रमेश सांगळे हे ‘एल अँड टी’ या कंपनीत काम करत होते. २०१० साली रमेश यांनी कंपनीतून व्हीआरएस घेतली व व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले. सुरुवातीच्या काळात कंपनीतील आपल्या व्यसनाधीन सहकाऱ्यांना समुपदेशन करून त्यांची व्यसनमुक्ती रमेश यांनी घडवून आणली. व्यसनाधीन असल्यापासून ते व्यसनमुक्त होईपर्यंतच्या आपल्या या प्रवासाबद्दल रमेश सांगतात की, “ज्याप्रमाणे त्यांच्या आचरणातून ते वाईट मार्गाला जात आहेत, हे सर्वांना दिसून आले होते. त्याचप्रमाणे त्यानंतर त्यांनी स्वत:मध्ये केलेली सुधारणादेखील त्यांच्या आचरणातूनच सर्वांना दिसून आली.”

 

रमेश सांगळेंनी नार्कोटिक्स विभागातदेखील व्यसनमुक्तीचे काम केले आहे. जेव्हा रमेश सांगळेंनी हे समाजकार्य हाती घेण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्यांच्या घरात कमावणारे ते एकटेच होते. त्यांचा मुलगा हा मतिमंद असल्याने सांगळेंवरच घराची संपूर्ण जबाबदारी होती. पण ‘‘पत्नी नंदाच्या साथीमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे.’ असे नमूद करायला ते विसरत नाहीत. रमेश सांगळे आज अनेक शाळा व महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे देतात. ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी त्यांना अनेक ठिकाणी बोलावले जाते. सांगळे यांनी नाशिक व भायखळा कारागृहात जाऊन कारागृहातील कैद्यांनादेखील व्यसनमुक्तीवर व्याख्यान दिले आहे. आपले अनुभव ते या व्याख्यानाच्या माध्यमातून सांगतात. तसेच त्यांच्या अनुभवातून इतरांनी शिकवण घ्यावी असा त्यांचा आग्रह असतो. रमेश हे एक प्रभावी वक्ते आहेत. त्यांचे व्याख्यान ऐकताना श्रोते अक्षरश: मंत्रमुग्ध होतात. व्यसनमुक्तीच्या या समाजकार्यासाठी आजवर सांगळेंना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. परंतु रमेश यांना मिळालेल्या एका पुरस्काराच्या १५ हजार रुपयांच्या रक्कमेत त्यांनी स्वत:कडून १० हजार रुपयांची भर घातली. आपल्या गावातील विद्यार्थ्यांना संगणक वापरता यावा यासाठी त्यांनी ही रक्कम देणगी म्हणून दिली.

 

“व्यसनमुक्तीमुळे जणू काही माझा नव्याने जन्मच झाला आहे, असे मला वाटते. त्यामुळे आता मला मिळालेला हा पुनर्जन्म वाया जाऊ न देता, अनेक वाट चुकलेल्या व्यसनाधीनांना मी केवळ योग्य वाट दाखवण्याचे काम करतो आहे. मी केवळ वाटाड्या आहे. योग्य वाट दाखवणे हे माझे काम आहे. परंतु त्या वाटेवरून जायचे की नाही हे मात्र तुमचे तुम्हाला ठरवायचे आहे.” असे सांगळे समुपदेशन करताना सांगतात. “खरेतर समाजातील प्रत्येकानेच ही व्यसनमुक्तीची जबाबदारी घ्यायला हवी, असे माझे वैयक्तिक मत आहे. प्रत्येकानेच आपल्या जवळपासच्या व्यसनाधीन व्यक्तींना जगण्याची नवी उमेद द्यावी व त्यांना व्यसनमुक्त करावे. असे केले तरच पुढे जाऊन आपला समाज खर्‍या अर्थाने व्यसनमुक्त होईल.” असे रमेश सांगळे सांगतात. रमेश पुढे सांगतात की, “आजची युवापिढी ही व्यसनांच्या विळख्यात अडकलेली आहे. बहुतांश तरुण-तरुणी हे मित्रमैत्रिणींच्या वाईट संगतीमुळे व्यसने करू लागतात. सुरुवातीला अधूनमधून व्यसने करणारी ही तरुण मंडळी हळूहळू या व्यसनांना आपल्या नित्य दिनक्रमाचा एक भाग करतात. एकदा मजा म्हणून घेतलेला दारूचा घोट हा त्यांच्यासाठी कधी विषाचा पेला बनत जातो, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. म्हणूनच युवापिढीला माझे हे कळकळीचे आवाहन आहे की, त्यांनी व्यसनाधीन होऊ नये. युवापिढीने आपले कर्तृत्व घडवावे. आपले आयुष्य सत्कारणी लावावे.”
 
 
 
- साईली भाटकर
@@AUTHORINFO_V1@@