नकाशा बदलविणारा भूकंप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2018   
Total Views |



 

भूकंप हा कोणत्याही परीस्थितीत नेहमीच विध्वंसकारी ठरतो. अनेकांचे घरसंसार उघड्यावर आणण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अनेक घटकांपैकी भूकंप एक महत्त्वपूर्ण घटक आहे.
 
 
क्षणात होत्याचे नव्हते करणाऱ्या भूकंपाची झळ किल्लारीच्या रूपाने महाराष्ट्रानेदेखील सोसली आहे. भूज येथील भूकंपामुळे अजूनही तेथील नागरिक सावरलेले नाहीत. भूकंप जसा मानवी जीवनावर परिणाम साधतो तसाच तो भौगोलिक स्थानांवरदेखील मोठा परिणाम साधतो. भूगर्भात होणाऱ्या भूपट्टीच्या हालचालींमुळे भूपृष्ठावरील मानवी जीवन उद्ध्वस्त होते, हे आपण जाणतोच. भूकंपामुळे जिथे भूकंप झाला आहे, तेथील भौगोलिक नकाशाच बदलून जातो. नुकताच इंडोनेशिया या भूकंपप्रवण बेटावर झालेल्या धरणीकंपाने तेथील नकाशाच बदलून टाकला आहे. येथील लोम्बोक बेट हे या भूकंपाचे केंद्रबिंदू होते. ते या भूकंपाच्या झटक्यांमुळे पृष्ठभागापासून २५ सेमी. वर उचलले गेले आहे. उद्ध्वस्त झालेल्या क्षेत्राची मांडणी करून अमेरिकेच्या संशोधकांनी प्रत्यक्ष भेटीद्वारे हा निष्कर्ष काढला आहे. पूर्वी सपाट असलेल्या या बेटाला आता ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
 
 
‘नासा’ या अमेरिकन अंतराळ संस्थेने आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी संयुक्त अभ्यासात भूकंपानंतरच्या उद्ध्वस्त प्रदेशाचे सखोल निरीक्षण नोंदविले आहे. संशोधकांनी उपग्रहाच्या मदतीने काढलेल्या छायाचित्रात लोम्बोक बेटाची बदललेली स्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे. इंडोनेशियामधील पश्चिमेकडील नुसा टेंगारा प्रांतातील लोम्बोक हे एक बेट आहे. बृहत् सुदान बेटाचा हा विस्तारित भाग आहे. लोम्बोक बेटामुळे बाली आणि आलास सामुद्रधुनी वेगळे होतात. लोम्बोक बेटाचा विस्तार या दरम्यान साधारणत: ७० किमी, शेपटीच्या आकाराचा आहेनैऋत्येकडील भागात भूकंपाच्या केंद्रबिंदूवर हा बदल दिसून आला आहे. लोम्बोकचा पृष्ठभागाचा एक चतुर्थांश भाग काही मीटर वर उचलला गेला आहे, तर लोम्बोकच्या ईशान्येकडील भागात ५ ते १५ सेमी. जमीन धसली आहे. या भूकंपामुळे लोम्बोकचे जनजीवन विस्कळीत तर झालेच आहे, मात्र अशा बदलणार्‍या भौगोलिक भूरूपांमुळे तेथील नागरिक त्रस्त झाले आहेत. अगदी कालपरवापर्यंत असणारे आपले हक्काचे ठिकाण आज एकदम बदललेल्या अवस्थेत येथील नागरिकांना पाहावे लागत असल्याचे विदारक वास्तव इंडोनेशियाच्या नशिबी आले आहे.
 
 
तसे पाहाता जावा, सुमात्रा, बाली आणि इंडोनेशिया या बेटांना यापूर्वीही अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीतून कसे बाहेर यायचे, याची कल्पना येथील नागरिकांना असणे स्वाभाविक आहे. मात्र यावेळच्या भूकंपाने तेथील भूरूपच बदलले असल्याने अशा स्थितीचा सामना तेथील नागरिक कसे करतात, हाच मोठा प्रश्न आहे. लोम्बोक बेट पर्यटकांचे आवडीचे ठिकाण असल्याने जगभरातील लोक तेथे येत असतात. मात्र आजमितीस तेथील ९० टक्के घरे ही मोडकळीस आली आहेत. तसेच अनेक ढिगारे येथे निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्याच्याखाली अजून काय दडले आहे, याची मोजदाद समोर आलीच नाहीय. आतापर्यंत ३९७ नागरिक मृत्युमुखी पडल्याचे अधिकृतरित्या समोर आले असले तरी ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नकाशात झालेल्या बदलाबरोबरच पर्यटन सौंदर्यातदेखील कुरूपता आल्याने येथील नागरिक दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र समोर येत आहे. तसेच, या भूकंपामुळे तेथील भूगर्भ आणि भूरूपे यात बदल झाल्याने मूळचे लोम्बोक, पर्यटकांना भुलविणारे लोम्बोक आता पुन्हा पाहावयास मिळेल का, हाच प्रश्न उभा ठाकला आहे५ ऑगस्टला आलेल्या भूकंपानंतर लोम्बोकमध्ये तब्बल ५०० धक्के जाणवले. त्यात ६८ हजार घरांची पडझड झाली आहे. बेटावरील ४६८ शाळा, ६ सेतू, २० कार्यालये, १५ मशिदी, १३ आरोग्यकेंद्रे ही अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे आधीच अविकसित असणारा इंडोनेशिया अजून समस्यांच्या गर्तेत अडकला असल्याचे पाहावयास मिळत आहे.
@@AUTHORINFO_V1@@