मायाजाल की आठवणींचा गोफ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Aug-2018
Total Views |




 


माझ्या मुलीने चार दिवसांच्या सुट्टीत चार्ली चॅप्लिनचं आत्मचरित्र ‘हसरे दुःख’ पूर्ण वाचलं.”

मी गेल्या रविवारी मुलाबरोबर सायकल सहल केली. काय स्टॅमिना आहे लेकाचा!”

मुलीने भरतनाट्यमच्या गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त एक सुंदर पत्र लिहिलं. वाचून त्या खूपच भारावून गेल्या.”

परवा आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मुलांनी सगळा स्वयंपाक करून आम्हाला सरप्राईझ दिलं.”

काल रात्री छोट्याने मला पत्त्यांची जादू शिकवली. एकदम भारी वाटलं.”

माझ्या पुतणीने मित्रमंडळींच्या नकला छान करून दाखवल्या. पक्ष्यांचे आवाज पण एकदम हुबेहूब काढते ती.”

 

 
समाधानी पालकत्वाच्या सत्रात, “तुम्हाला समाधान देणारी गेल्या महिन्याभरातली तुमच्या मुलाची एखादी उपलब्धी (अचिव्हमेंट) सांगा,” अशी सुरुवात करून दिल्यावर पालकांनी हा असा भरभरून प्रतिसाद दिला. मुलांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या छोट्या-मोठ्या यशाचे वर्णन करताना पालकांचा उत्साह अवर्णनीय होता. या आनंदाच्या व्याख्यांमध्ये एरवी दुर्लक्षित होऊ शकणार्या कितीतरी छोट्या छोट्या क्षणांचा समावेश होता; या गोष्टीचे मी मनापासून समाधान व्यक्त केल्यावर पालक अंतर्मुख झाले. 'इंटरनेट, गॅजेट्सचे मुलांमध्ये वाढणारे वेडअसा विषय असलेल्या या सत्राची सुरुवात तर छान सकारात्मक झाली होती.

 

 
 स्मार्टफोन, सोशल मीडिया या गोष्टी आजच्या पालकांच्या आयुष्यात साधारणपणे आठ-दहा वर्षांपूर्वी आल्या असतील. तरीही प्रामाणिकपणे विचार केला की जाणवते की, या सगळ्या गोष्टींवर दिवसाकाठी आपला बराच वेळ आणि ऊर्जा व्यतीत होते. बरेच पालक मनापासून कबूल करतात की त्यांना गॅजेट्स, सोशल मीडिया या गोष्टींचे आकर्षण वाटते; त्यावर ८० टक्के वेळ तरी विनाकारण (अनप्रोडक्टिव्ह) व्यतीत होतो. इतकेच काय, ज्यांच्या आयुष्यात वयाच्या साठीनंतर स्मार्टफोनने एन्ट्री घेतली असे आजी-आजोबा पण त्यात मनापासून गुंतून जातात. मग जर काहीच वर्षांपूर्वी आपल्या आयुष्यात दाखल झालेली गोष्ट आपले आयुष्य इतके व्यापून टाकत असेल, तर मुलांच्या आयुष्यात त्यांच्या जन्मापासून असलेल्या या सार्‍या गोष्टींकडे ती आकृष्ट होतील तर त्यात नवल ते काय? बरे, मुलांना लहानपणापासून गॅजेट्स लीलया हाताळता येतात याचे कौतुकही आपणच करत असतो!

 

 
अंतरजाल (इंटरनेट) हे आगीसारखे आहे. योग्य वापरले तर काम सुलभ होते आणि अयोग्य वापर वणवा पेटवू शकतो. योग्य आणि अयोग्याचे भान येईपर्यंत मुलांचा गॅजेट्सचा वापर पालकांच्या सुजाण नजरेखालीच झाला पाहिजे. एरवी एकदम चुणचुणीत आणि उत्फुल्ल असणार्‍या एखाद्या मुलाचे व्हिडिओ बघताना निरीक्षण केले आहे का? त्याच्या चेहऱ्यावर मंद भाव आलेले दिसतील. हा फक्त चेहऱ्यावरच्या भावांमधला बदल नाही तर मनावर होणारा दूरगामी परिणाम आहे. धडपड करत, प्रयोग करून वेगवेगळ्या माध्यमांतून शिकण्याच्या या वयात इंटरनेटमुळे मुलांच्या ज्ञानेंद्रियांवर अनावश्यक व रेडिमेड माहिती सातत्याने आदळत असते. यातून मग हळूहळू आयुष्यातल्या छोट्या क्षणांचे अप्रूप कमी होते. सातत्याने नवनवीन माहिती मिळवत राहिल्याने एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो. तयार चित्रे आकर्षकरित्या समोर दिसत असल्याने कल्पनाविस्ताराचे कौशल्य कमी होऊ शकते. पौगंडावस्थेतील व तरुण मुलांमधील इंटरनेटचे व्यसन ही तर वाढती समस्या आहे.

 

 
लेकीला वाचनाची आवड लागावी या उद्देशाने आम्ही घरात एक उपक्रम सुरु केला. संध्याकाळी तासभर आम्ही स्वतःच पुस्तके वाचायला सुरुवात केली. कधी आईच्या, कधी बाबाच्या पुस्तकात डोकावत ती आता स्वतःची पुस्तके वाचू लागली आहे. त्यानिमित्ताने आमचे वाचन पुन्हा नियमित सुरु झाले हा त्याचा जास्त महत्त्वाचा फायदा. काही पालक आपल्या मुलांबरोबर करत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल आवर्जून बोलतात. ट्रेकिंग, खेळ, बागकाम, झाडे लावणे, नृत्य शिकणे, दिवाळीचा किल्ला, आकाशकंदील बनवणे, पावसाळी सहली, स्वयंपाक करणे, श्लोक पाठ करणे अशा अनेक गोष्टी मुलांना बरोबर घेऊन नियमितपणे करण्यासाठी पालक वेळ काढतात. त्यातून मिळालेला आनंद आणि ऊर्जा त्यांना स्वतःला खूप उपयोगी पडते, असेही सांगतात. आपल्या बालपणात डोकावून पाहिले तर जाणवेल की पालकांनी कळत-नकळत मुलांसोबत वेचलेले असे क्षण आयुष्यभरासाठी आठवणींची पुंजी होतात.

गुंजन कुलकर्णी

(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)

7775092277

[email protected]

@@AUTHORINFO_V1@@