‘नागरी सहकारी बँकासंबंधी धोरण निश्चितीसाठी मुंबई विद्यापीठ सहकार्य करेल’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2018
Total Views |





मुंबई: “नागरी सहकारी बँका आणि सहकारी क्षेत्र यांची उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांच्या कार्यक्षम संचालनासाठी न्याय देणारे धोरण अस्तित्वात येणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ‘मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिसी रिसर्च’ हा मुंबई विद्यापीठाचा विभाग आवश्यक ते सर्व सहकार्य देईल.” असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी दिले.  सतीश मराठे यांची रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल ‘विवेक संवाद’ व ‘मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिसी रिसर्च’ यांच्यावतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

 

सत्काराला उत्तर देत असताना सतीश मराठे यांनी आपल्या भाषणात भविष्य काळातील सहकारी चळवळींचे महत्त्व अधोरेखीत केले व हे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र शासन व रिझर्व्ह बँक यांनी आपल्या धोरणांची निश्चिती केली पाहिजे, असे आग्रहपूर्वक त्यांनी प्रतिपादन केले. यासाठी आपण प्रयत्नशील राहूच. परंतु, या धोरण निश्चितीमध्ये मुंबई विद्यापीठानेही आपला सहभाग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ‘आर्थिक प्रगती तळागाळापर्यंत पोहोचायची असेल, तर सहभागातून विकास या सहकारी तत्त्वाचा अंगीकार केल्याशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले.

 

या कार्यकमात विविध सहकारी बँकांमधील पदाधिकारी उपस्थित होते व त्यांनीही सहकारी बँकांसमोरील प्रश्‍नांची चर्चा केली. कार्यकमाच्या प्रारंभी ‘विवेक संवाद’च्यावतीने दिलीप करंबेळकर यांनी सतीश मराठे यांचा परिचय करून दिला. डॉ. नीरज हातेकर यांनी याप्रसंगी ‘मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पब्लिक पॉलिसी’ या संस्थेद्वारे चालणार्‍या कामांचा परिचय करून दिला. संजय ढवळीकर यांनी कार्यकमाचे सूत्रसंचालन केले. मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते सतीश मराठे यांचा सत्कार करण्यात आला.

@@AUTHORINFO_V1@@